सावित्री फातिमा मंचचे पुण्यात उद्घाटन संपन्न

0 17

 

पुणे, प्रतिनिधी – समाजबंध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मासिक पाळीवर प्रबोधन, संशोधन आणि प्रशिक्षण करण्यासाठी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून काल दि. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या प्रकल्पाचे उद्घाटन घोरपडी, पुणे येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण उपायुक्त वृषाली शिंदे, लेखिका तमन्ना इनामदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड आणि लोकबिरादरी मित्रमंडळच्या ऐश्वर्या चपळगावकर उपस्थित होत्या. समाजातील अनिष्ट गोष्टींचा फुगा फोडत त्यामागील विवेकी विचारांचे वाचन करत विधायक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी २५ हजार प्रतींचे वितरण झालेल्या ‘प-पाळीचा’ या पुस्तिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच लोकबिरादरी मित्रमंडळ पुणे व समाजबंध निर्मित मासिक पाळीविषयी नियोजन व माहितीदर्शक अशा मराठीतील पहिल्या ‘ऋतुसंवाद दिनदर्शिका २०२२’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले. ‘साऊ पेटती मशाल’ हे क्रांतिगीत म्हणत सर्वांनी सावित्रीमाईला अभिवादन केले. पाळीविषयीचे आपले अनुभव सांगत संस्था आणि शासन यांनी मिळून हे प्रबोधनात्मक काम केले पाहिजे असे यावेळी वृषालीताई म्हणाल्या. सावित्री – फातिमा या जोडीच्या अफलातून कामाची माहिती देत स्वतःपासून बदलाची सुरुवात करा असे आवाहन तमन्ना इनामदार यांनी केले. समाजबंधच्या या प्रकल्पासाठी नगरसेविका लताताई धायरकर व किशोर धायरकर यांनी जागा उपलब्ध करून दिली असून या प्रकल्पात सध्या १० महिलांना कापडी पॅड शिलाईच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच विविध संस्था व व्यक्ती यांना मासिक पाळी संवादक प्रशिक्षण तसेच कापडी पॅड निर्मिती प्रशिक्षण ही दिले जात आहे. समाजातील पाळीची वस्तुस्थिती समजण्यासाठी १० हजार महिलांचे सर्वेक्षण ही सुरू आहे असे प्रकल्प समन्वयक वैभव शोभा महादेव यांनी सांगितले. यावेळी प्रकल्पातील महिला, लोकबिरादरी मित्रमंडळ व समाजबंधचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!