जन्माची शिदोरी माती

0 21

भूवासी शालिनीताई नामदेवराव देशमुख यांना ०५ जुलै रोजी भूमातेने आपल्या पोटात कायमचा आसरा दिला . त्या अनुषंगाने मला वाटले, स्मृतिशेष त्यांच्या नावे कीर्तनाचा जागर होईल. या संदर्भाने मी नामदेवराव यांना विचारले, कीर्तनाचे काय ? ते म्हणाले , मी ते करणार नाही . मी विचारले , का ? दुःखातही ते माझ्याशी बोलले, मी जन्माची शिदोरी माती मानणाऱ्या आणि जगणाऱ्या माझ्या धर्म पत्नीची रक्षा माझ्या शेतात नेऊन टाकली . गंगेत टाकून प्रदूषणाचा अंश टाळला . मला ते एका अर्थाने पटले . ऐवढे बोलून त्यांनी माझी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. ते मला म्हणाले,’ कीर्तनाबद्दल तुम्हांला काय जाणवले ?’ त्यांच्या या भेदक प्रश्नाने कीर्तनाच्या अनुषंगाने माझे आकलन मी त्यांना सांगू लागलो . ‘नामदेव कीर्तन करी , पुढे नाचे पांडुरंग’ अशी दस्तुरखुद्द नामदेव महाराजांची अनुभूती आहे . कीर्तनाच्या सुखे , सुखी होतो देव। कोणते वैभव , वाणी आता ॥
अंत्यज आणि जातीवंता ।
मुखी नाम घेता , उडी घाली ।।
बैसोनी आसनी आळविता नाम । उभा सर्वोत्तम , तयापुढे ॥
प्रेमाचिया भरे , उभ्याने गर्जता । नाचे हा अनंत , तयासवें ॥
नामा म्हणे , तया कीर्तनाची गोडी । घालीतसे उडी , नेटेपोटे ।।
तर देवाला सुद्धा कीर्तनाची गोडी असते . जिथे त्याचे नामसंकीर्तन सुरू असेल तिथे विश्वात्मक असलेला देव त्वरेने उपस्थित होतो. संत नामदेवांनी देवाची गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. कीर्तन म्हणजे हरिनामाचा गजर. आपल्यासाठी देवाचा आदर . कीर्तन म्हणजे लोकवर्तन सुधारणारी कर्मशाळा . कर्मशाळेला धर्माची जोड . स्वधर्माला जागून कृतार्थ झालेल्या शालिनीताई यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो अनुपम्य सोहळा ठरला असता .
मी पुढे सांगू लागलो , कीर्तन- विचारांचा प्रवाह करणारा लोकांच्या मनातील लोकझरा आहे . ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥’ संत नामदेवांनी अशी दिलेली ग्वाही विद्वानांनाही भावते . सामान्यांना आवडते . विद्वान आणि सामान्य कीर्तनात एकाच पातळीवर येतात म्हणून तर कीर्तन असामान्य ठरते .
‘ज्ञान धावते पण शहाणपण रांगते ‘ अशी एक म्हण आहे . माहिती वेगळी . ज्ञान आणि शहाणपण वेगळे असते. माहिती जगण्याला विस्तारते . ज्ञान जगण्यासाठी कौशल्य देते तर शहाणपण हे आयुष्य कसे जगावे हे शिकवते . ज्ञान भाकरी मिळायला उपयोगी पडते . तर शहाणपण मिळालेल्या भाकरीचा उपयोग कसा करायचा हे शिकवते. ज्ञान (लेकाला गणिततज्ञ, लेकीला न्यायदान क्षेत्रात नौकरी) देऊन शालिनीताईंनी भाकरीचा उपयोग कुटुंबाला आणि स्वतः शेतात राबून समाजाला करून दिला . शिक्षणाचा वसाही त्यांनी घेतला . म्हणून नामदेवराव ज्ञानाने धावायलेत पण मातीला कसदार करणारे त्यांची मुलं मातीशी रांगत राहिले . म्हणून ‘ज्ञान धावते पण शहाणपण रांगते ‘. त्यांना ते पटू लागले . नामदेवराव मला म्हणाले , आणखीन तुमचे आकलन सांगा ? मी व्यक्त होत होतो, ‘चांगला वागे संसारी । त्यास जरा न ये लौकरी ॥’ जरा म्हणजे म्हातारपण , लौकरी म्हणजे ताबडतोब . शालिनीताईला म्हातारपण लवकर आलेच नाही . ताई ५३ व्या वर्षी जग सोडून गेल्या . *कोणाचे हे घर, हा देह कोणाचा
आत्माराम त्याचा, तोचि जाणे ।।
मी तू हा विचार , विवेके शोधावा । गोविंद माधवा , याची देही ॥
ध्येय आता ध्यान , त्रिपुरी वेगळा ।
सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा ॥
ज्ञानदेव म्हणे , नयनाची ज्योती ।
या नावे रूपे , ती तुम्ही जाणा ॥
जीव सूर्याच्या बारा कला आणि चंद्राच्या १६ कला ओलांडून पुढे जातो . सूर्याच्या बारा कलांमध्ये शक्तीचा निवास असतो. सहस्त्रार चंद्राच्या १६ कलांमध्ये शिवाचे स्थान असते . डोळ्यांनी बाह्यविश्वाच्या आभासात न अडकता आपल्या अंतरीच्या चैतन्याचा वेध घ्यावा , असे ज्ञानदेव सांगतात . शालिनीताईंचे लक्ष डॉक्टर आपल्यावर इलाज काय करतात याकडे वीस वर्षांपूर्वी गुजरातच्या महिलेने दिलेली किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर सातत्याने होते . रोगाच्या कळा शोषून शिक्षणाचा मळा त्यांनी बहरला होता . शेतीच्या कामाच्या अंतरीच्या चैतन्याचा वेध घेऊन त्या शेवटपर्यंत माती या घटकाचा विचार करत राहिल्या . निवृत्त झाल्यानंतर सुद्धा आलेल्या पैशातून हट्टा या गावाजवळ त्यांनी सहा एकर जमिनीचा तुकडा घेतला . ‘कोणाचे हे घर, हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा , तोचि जाणे ॥’ या अनुषंगाने त्यांचा आत्माराम माती होती . आपण लक्षात घेऊ , पृथ्वी , आप ( पाणी ), तेज , वायू , आकाश या पाच तत्त्वांपासून मानवी शरीर बनलेले आहे . संत तुकाराम महाराजांचा दाखला आहे . ‘पंचमहाभूतांचा गोंधळ । केला एके ठायी मेळ ।
लावीला संबळ । अहंकार त्या पाठी ॥ संत तुकारामांनी शरीराला ‘पंचमहाभूतांचा गोंधळ ‘ म्हटले आहे . मानवी जन्म मनातील अतृप्त इच्छा – आकांक्षामुळे होतो . पंचमहाभूतांचा मेळ जमला की , शरीर जन्माला येते . मात्र त्यामागे अहंकार लागतो . तो लागू दिला नाही तर माणूस आनंदास आणि आदरास पात्र होतो. हेच काम शालिनीताईंनी केले . वावरातील गडी दत्तराव , घरकाम करणाऱ्या बाया यांना आनंद देताना त्या भरभरून वागल्या . त्यामुळे त्या सर्वांच्या आदरास आदर्श शिक्षिका म्हणून पात्र ठरल्या.
इच्छा वाढविते वेल । खुंटावा तो खरा बोल ।
तुका म्हणे मोल । झाकले ते पावेल ॥’ माणसाने व्यवहारात जागे राहून आयुष्याची काळजी घ्यावी . आपल्या भवताल ‘खेळपत्री आणि गावकुत्री ‘ असतात . त्याचा वारा लागू देऊ नये .
संत नामदेव सांगतात, ‘हे गे आयुष्य हातोहाती गेले ।
आंगी आदळले जन्म मरण ॥’
संत ज्ञानेश्वर आपल्याला जीतेपणी जागे करताना सांगतात, “लटिका व्यवहार सर्व हा संसार
वाया येरझार हरिवीण ॥”
देवाचे गुण घ्या . देव होणे कसोटीचे आहे . पण माणसाने देवमाणूस होणे चांगले आहे . ‘माकडाचे परी हालविती मान ।
दावी थोरपण जगामध्ये ॥’
असे संत चोखामेळा सांगतात. कुठंबी जाऊन माकडासारखी मान हालविण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेल्या कामात रमून जावे . अन लोकांनी काम चांगले झाले म्हणून मान डोलवावी . शालिनीताई दुःखातही हेच करत राहिल्या. त्या शाळेत काम करायच्या , रानात काम करायच्या जाणारे येणारे त्यांना न्याहाळायचे. लोकांना आनंद वाटायचा. महाराजांनी चांगले कीर्तन केल्यानंतर आपण सर्वजण मान डालवतो. का ? तर ‘आम्हा सापडले वर्म । करू भागवत धर्म ।’ असे संत नामदेव म्हणाले ते इथे आपण अनुभवले . आपल्याला आपला स्वतःचा धर्म म्हणजे कर्मधर्मच लागतो . नाहीतर मग आपण गेल्यावर भा . रा. तांबे सांगतात,’ जन पळभर म्हणतील हाय हाय ‘. ग. दि. माडगूळकरांनी गीतरामायणात हेच मांडले आहे . ते लिहितात, ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा नाही पुन्हा गाठ ‘ आपले असेच आहे . जगताना मृत्यूचा विसर पडू देऊन जमणारच नाही . संत तुकाराम महाराज बजावतात ‘जन हे सुखाचे , दिल्या घेतल्याचे
अंत हे काळीचे नाही कोणी’ कबीराच्या दोह्याचे मराठीत भाषांतर झालेले एक गीत आहे, ‘माती सांगे कुंभाराला का मज पायी तुडवीशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी’ म्हणून आपण माती आणि मातीवरची माणसं यांना जन्माची शिदोरी मानून माणुसकी जपली पाहिजे. माझे म्हणणे त्यांना पटू लागले .
शरीराची होय माती । कोणी न येती सांगाती
सारी अवघी कामे खोटी । अंती जाणे मसणवाटी
गोत घरे टाकून सारी । शेवटी गावाचे बाहेरी
स्वजन आणि गणगोत । उपाय नाही हो चालत
ऐसे स्वप्नवत असार । नरहरी जोडत असे कर
असे संत नरहरी सोनार महाराज हात जोडून सांगतात . जीवनाचा शेवटचा खरा सोबती मृत्यूच आहे . जीव -जीवन आणि मरण ठरलेले आहे . आयुष्यात काय करावे ? संत तुकाराम महाराज सांगतात ,
गूळ सांडूनि गोडी घ्यावी
मीठ सांडून चवी चाखावी
ऐसा प्रपंच सांडुनि द्यावा
मग परमार्थ जोडावा।
पहिल्यानं म्हणच होती बघा,’पैसा मोडावा अन सोयरा जोडावा ‘. आता पैसाच नाही तर मोडावे काय ? ‘सोयरा घडावा आणि पैसा पसरावा ‘ असा आता काळ आहे. कृष्णाला मारण्याची प्रतिज्ञा करणारा कंस , सुईच्या टोकावर मावेल एवढी ही भूमी पांडवांना देणार नाही असा म्हणणारा दुर्योधन , सीतेचे हरण करून रामाशी वैर घेणारा कुबेर – धनवान रावण हे सर्व निर्धन झाले . आपण तर साधी माणसं , गावभर कणसं. आपल्या आयुष्याचा उतारा किती येईल ? आयुष्याला कधी उतार लागेल सांगता येत नाही . नामदेवराव , गावाकडच्या बायका सांगतात,’रांधलेले सरते नि बोललेले उरते. एकमेकांना मन लावून बोलू . ‘जुने सूप शेणाने घट्ट , म्हातारा माणूस खाण्याने घट्ट ‘. आपण म्हातारे होण्याअगोदर तरण्याताठ्या असणाऱ्या म्हातार्‍यांना खाऊ – पिऊ घालून सेवा करू . नव्यांना आधार देऊ . चांगल्यांना घडवू . आपले शरीर दहा दरवाजे असलेला पिंजरा आहे . १) दोन डोळे २) दोन कान ३) दोन नाकपुड्या ४) एक तोंड ५) बेंबी ६) योगीमार्ग ७) गुद्दद्वार आहे . त्यात प्राणरूपी पक्षी राहतो . तो उडून गेला की हाडामासांचा पिंजरा . म्हणून आपण गणागोताला धरून राहू . गावाला धरून राहू . जीवाला धरून जगू आणि जाऊ. नामदेवरावांना हे पटू लागले . ते म्हणाले मी बाईची स्मृती म्हणून शेतात राख टाकली, तिथं आंब्याचं झाड लावणार आहे . मला बाईच्या कथेपेक्षा कामाची आठवण देईल . मला ही गोष्ट अभूतपूर्व वाटली. कारण आजपर्यंत कोण्याही नवऱ्याने ‘आहेवमरण’ आलेल्या बाईची राख आपल्या शेतात टाकलेली मी ऐकलेले नाही . माझा अनुभवही नाही . स्मृती जपाव्या त्या नव्या काळानुसार अशा . परिवर्तनाची नांदी आपल्या घरापासून सुरू करावी हा वस्तूपाठ बाईच्या वागण्याने घालून दिला . नामदेवराव कर्म आणि कीर्तन यांची सांगड घालू लागले . स्वतःहून मला म्हणाले, आणखीन काय सांगाल ? मी म्हणालो , मी काहीच सांगत नाही संत साहित्याचा अभ्यासक असल्याने तुम्हाला निळोबारायांचा अभंग माझ्या सोबतीला सदैव असलेला सांगतो . तो असा,
एवढासा माझा भाव तो काई । तेवढाचि तुमचिये ठेविला पायी ।
परी तुमचे अगाध देणे । जाणवले यावरि उदारपणे ।
एवढीशी माझी मति ते किती । तेवढीची वाढवुनी केली सरती ।
एवढेसे तुम्हा गाईले जी देवा । तेवढेची स्वीकारूनी तोषविले भावा ।
एवढीची माझी वाचा ते किती । तेवढीची आपुलिये लाविली स्तुती |
एवढासा निळा एवढीशी भक्ती । अपारचि तुम्ही मानिली प्रीती ।
सध्या माणसांच्या ‘उठावाचे’ सुगीचे दिवस आहेत. माणसांचे नाव घेण्यालायक आपल्या भारतात- महाराष्ट्रात आता काही मजा नाही . ते म्हणाले , काहीतरी म्हणा . मी म्हणालो, मातीसारखा माझा पांडुरंग , माझा जीव आहे.
जय विठ्ठल
जय जय विठ्ठल
जय जय राम कृष्णहरी.
नामदेवराव मान डोलावू लागले . ते स्वतःच्या शेताच्या मातीत – पत्नीच्या राखेत झाड लावून निसर्गाचे सोयरे होताहेत, यातच सर्व काही आले.
-अरुण चव्हाळ
📞: ७७७५८४१४२४
ई-मेल : aniketchaval@gmail.com

error: Content is protected !!