एमआयएम बाबतच्या राजेश टोपेंच्या विधानाने शिवसेनेची कोंडी?

0 81

शब्दराज ऑनलाईन,दि 19: एमआयएमने  महाविकास आघाडीत सामिल होण्याचा प्रस्ताव दिला आहे. एमआयएमचा हा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावलेला असतानाच एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांनी केलं आहे. टोपे यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. टोपे यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत एमआयएमच्या समावेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एमआयएमबाबत राष्ट्रवादीचा सॉफ्ट कॉर्नर असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. तर, एमआयएमने महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना हिरवी सेना झाल्याची खोचक टीका भाजपमधून होत आहे.

एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. खासदार इम्तियाज जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत, असं जलील यांनी सांगितलं. त्यांनी फक्त प्रस्ताव ठेवला. मी फक्त ऐकून घेतलं. दॅट्स ऑल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

नेते घेतील तो निर्णय मान्य असेल

मला वाटतं की पक्षश्रेष्ठीचं याबाबत ठरवेल. मला याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. राऊत नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारची आघाडी नाकारली असेल तर त्याबाबत राऊतांना अधिकार आहे. जे काही एमआयएमला बोलायचं असेल तर त्यांनी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बोलावं. ते निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असं त्यांनी सांगितलं. अल्पसंख्याकांना आम्ही कधी बाजूला सारलं नाही किंवा टाकलं नाही. त्यांनाही मुख्यप्रवाहात आणण्याचं आमचं काम सुरू आहे, असंही जलील यांना सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकी चर्चा काय?

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे काल खासदार जलील यांच्या भेटीसाठी औरंगाबादेत आले होते. जलील यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी टोपे औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप एमआयएमवर करण्यात आला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत शामिल होण्याचा प्रस्ताव देतोय, असे खासदार जलील म्हणाले. तसेच महाविकास आघाडीवर खोचक टीका करताना ते म्हणाले, ‘ तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय..’

error: Content is protected !!