मानवत तालुक्यात प्रायोगिक तत्वावर होणार मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प
परभणी – नागरी – ग्रामीण समन्वयातून मानवत पंचायत समिती अंतर्गत प्रायोगिक तत्वावर मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरु आहे. या कामाचा एक भाग म्हणून मंगळवार दि.26 नोव्हेंबर 2024 रोजी मानवत पंचायत समिती मध्ये तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींची स्वच्छ भारत मिशन चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद बैठक संपन्न झाली.
यावेळी संवाद बैठकीसाठी मानवत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री मधुकर कदम, युनिसेफ मुंबईचे राज्य सल्लागार श्री जयंत देशपांडे आर सी यु इ एस संस्थेचे श्री सागर पाटील, नगर पालिकेचे श्री गवारे, विस्तार अधिकारी श्री पोद्दार, श्री गव्हाणे, श्री विश्वंभरे, ग्रामपंचायत अधिकारी, समाजशास्त्रज्ञ श्री परमेश्वर हलगे, समूह समन्वयक श्री महेंद्र डोंगरे, ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक, स्वच्छाग्रही, पंचायत समिती मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यासाठी करण्यात आले संवाद बैठकीचे आयोजन
ग्रामीण भागातील सेप्टिक शौचालयाचे व्यवस्थापन व्हावे, तसेच निवडलेल्या ग्रामपंचायतीमधील शौचालयाचे सर्वेक्षण मोबाईल अँप्लिकेशन च्या माध्यमातून कसे करायचे, मैला गाळ व्यवस्थापन प्रक्रिया नेमकी कशी कार्यान्वित होणार आहे यासाठी सादर संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मैला गाळ व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे, त्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत इत्यादी बाबत युनिसेफ मुंबईचे राज्य सल्लागार श्री जयंत देशपांडे आर सी यु इ एस संस्थेचे श्री सागर पाटील यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
संवाद बैठकीमध्ये सहभागी ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मैला गाळ प्रक्रिया केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन नागरी – ग्रामीण मैला गाळ व्यवस्थापन प्रक्रिया व्यवस्थित समजावून घेतली. त्याच बरोबर दुसऱ्या टप्प्यात ज्या ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्या बाबत आपले प्रशिक्षण पूर्ण केले या ग्रामपंचायती व्यतिरिक्त गाव पातळीवर सेप्टिक टॅंक चे शौचालय असणाऱ्या कुटुंबाना संवाद साधण्यासाठी संवादकांच्या प्रशिक्षणाचे नियोजन मानवत पंचायत समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.