साप : समज-अपसमज-वाचा सर्पमित्र रणजित कारेगावकर काय लिहीतात

0 181

 

साप म्हटले की भय, कुतूहल आणि जमले तर त्याला मारणे. इतकेच विचार आजही घट्टपणे सापांच्या बाबतीत लोकांच्या मनात रूजले आहेत. सापांच्या ब-याच हत्या नित्य कुठे ना कुठे विनाकारण किंवा भिती व अज्ञानापोटी होत असतात. इतर अनेक प्राणी माणसावर प्राणघातक हल्ला करत असतात पण माणूस फक्त सापाला दिसता क्षणीच मारण्याचा विचार करतो. ग्रामीण भागात काही महाभाग फक्त साप मारण्यासाठीच ओळखले जातात. त्यांना सापांना निर्दयीपणे मारून टाकण्यात फार मर्दुमकी वाटते. साप मारण्यात मर्दुमकी नसून तो वाचवण्यात खरी माणुसकी आहे. अशा घटना अजूनही सापांबद्दलचे समाजात असलेले अज्ञान दर्शवतात. एकीकडे नागपंचमी सापांचा सण आहे म्हणून पुजा करायची आणि दुसरीकडे तो दिसताच दगड किंवा काठी उचलून ठार मारायचा विचार डोक्यात आणायचा. हे कुठेतरी थांबायला हवे. चित्रपट, टिव्ही सिरियल सारख्या माध्यमांनी तर सापांबद्दलचे गैरसमज वाढवण्यात खुप वाईट भुमीका बजावली आहे. पण जागरूक सर्पअभ्यासक, सर्पमित्र, वर्तमानपत्रातील लेख व पुस्तकांमुळे हे गैरसमज दुर होण्यास मदत होत आहे. जेष्ठ सर्पअभ्यासक निलीमकुमार खैरे यांचे ‘साप’, डाॅ.पी.जे. देवरस यांचे ‘ स्नेक्स ऑफ इंडिया ‘, रोम्युलस व्हिटेकर यांचे मारूती चित्तमपल्ली यांनी अनुवादीत केलेले ‘आपल्या भारतातील साप ‘, भालचंद्र मयेकर यांचे ‘साप: समज-गैरसमज’, व राहूल शिंदे यांचे ‘महाराष्ट्रातील साप’ ईत्यादी पुस्तके अभ्यासू सर्पअभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत.
साप हा निसर्गातील महत्वाचा दुवा असून इतर प्राणीमात्राप्रमाणे तोही महत्वाचा घटक आहे. जगभरात सुमारे २५०० जातीचे साप आढळतात पैकी २१६ भारतात आढळतात व त्यात 52 विषारी आहेत असं डाॅ.पी.जे. देवरस आपल्या स्नेक्स ऑफ ईडिया (इसवी1965आवृत्ती) पुस्तकात म्हणतात. तर सर्पअभ्यासक निलीमकुमार खैरे यांच्या अभ्यासानुसार भारतात ३१० जातीचे साप आढळतात( साप नवीन आवृत्ती २०२१).
साप हा मुळातच भित्रा प्राणी आहे. शत्रू समोर आल्यास तो पळून जाणेच पसंद करतो. तो अतिशय आळशी व शीत रक्तीय प्राणी आहे. त्यांना अतिउष्ण व अतिथंड तापमान सहन होत नाही. भक्ष्याच्या शोधात जाणे सोडले तर इतर वेळी तो निपचीत पडून राहतो. विषाचा संदर्भात सापाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते- बिनविषारी, निमविषारीव विषारी. निमविषारी व विषारी हे दोन्ही प्रत्यक्षात विषारीच असतात. परंतु निमविषारी सापाच्या विषापासून माणसाला सहसा धोका संभवत नाही. असे निरिक्षण निलीमकुमार खैरे यांनी ‘ साप ‘ या पुस्तकात केले आहे.
तो स्वतःहुन कोणाच्याही वाटेला जात नाही. त्याला जोपर्यंत जीवाला धोका वाटत नाही तोपर्यंत तो कधीच दंश करत नाही. पण प्रत्येक साप विषारीच आहे हा समजच मुळात चुकीचा आहे. म्हणून आपल्या परिसरात आढळणारे कोणते साप विषारी आणि कोणते बिनविषारी यांची ओळख करून घेणे, देणे हे अधिक महत्वाचे आहे आणि सर्पमित्र हे काम नित्य करत असतात. कुठेही साप दिसला की आता पुर्वीपेक्षा सापांची हत्या करण्याचे प्रमाण खुप कमी झाले आहे. आजही साप चावला की माणूस संपला हाच समज आहे. पण तसे नाही, विषारी सर्पदंश झाला असेल तर त्वरीत उपचाराने रूग्ण वाचत आहेत. महाराष्ट्रात पुढील प्रकारचे विषारी साप आढळतात. त्यात नाग ( Cobra), मण्यार( Comman krait), वाॅल्स सींध मण्यार (Sindh Krait), घोणस( Russell’s Viper), फुरसे (Saw-Scaled Viper) , चापडा (Pit Viper), पोवळा( Slender Coral Snake) , समुद्रसाप( Sea Snake). बिनविषारी मध्ये अजगर, धामण, कवड्या, दिवड, तस्कर, कुकरी, रसेल कुकरी, वाळा, धूळनागीण, मांडूळ, नानेटी, काळतोंड्या, खापरखवल्या, गवत्या, रजत बन्सी, गजरा, चित्रांग नायकूळ, रूका, आदी साप. तर निमविषारी सापांमध्ये मांज-या, हरणटोळ, सोनसर्प, रेती सर्प, अंडीखाऊ साप, झिलाण, श्वानमुखी हे साप आढळतात. त्यामुळे साप दिसताच घाबरून न जाता व त्यांना न मारता सर्पमित्राला बोलवावे.
सापांची ओळख:
नाग : जहाल विषारी साप. गव्हाळी, पिवळसर, तपकिरी, राखाडी किंवा काळा रंग. अंगावर गव्हासारखे गुळगुळीत खवले. डोक्याचा भाग मोठा, डोळे काळे व मोठे. फण्यामागे मराठी दहाच्या आकड्यासारखा हूड मार्क असतो. काही नागांना ही नक्षी नसते. लांबी सरासरी तीन ते चार फूट किंवा जास्तीतजास्त सात फूट तीन इंच असू शकते.
एप्रिल ते जुलै दरम्यान नागीण 10 ते 15 अंडी घालते. ही अंडी उबवायला 60 दिवस लागतात तोपर्यंत मादी अंड्यांचे संरक्षण करत अन्नपाण्यावाचून तिथेच थांबते व अंडी उबवते. नागाची पिल्ले नागासारखीच दिसतात. जन्मताच ती विषारी असतात. नागाचे खाद्य लहान किटक, बेडूक, सरडे, उंदीर व लहान साप हे आहेत. भारतात नाग सर्वत्र आढळतो. वास्तव्य – मुख्यत: धान्याची कोठारे, पडकी घरे, विटा,दगडाचे ढीग व जिथे उंदरांचे जास्त वास्तव्य आहे अशा ठिकाणी. हा दिवसा व रात्रीही आढळतो. माणसांचा संपर्क सहसा टाळतो. डिवचला किंवा चवताळला तर हिस्स हिस आवाज काढत फणा काढून घाबरवतो. आपल्याकडील नागांना चावल्यावरच विष सोडता येते. फक्त अफ्रिकेतील नाग हवेतून दातांद्वारे विष फेकतात. इतर सापांप्रमाणे नाग देखील पावसाळ्यात जास्त सक्रीय असतो. नागाचे विष अत्यंत जहाल असून त्याचा माणसाच्या मज्जातंतूवर परिणाम होऊन श्वसनक्रिया व हृदयक्रिया बंद पडते. नागदंशाने रूग्ण त्वरीत मरत नाही. याच्या विषाचा हळूहळू शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे रूग्णाला त्वरित दवाखान्यात दाखल करणे गरजेचे असते. योग्य उपचाराने रूग्ण वाचू शकतो. नागाच्या विषापासून वेदनाशामक औषधे तयार केली जातात.
घोणस* : हा देखील अत्यंत विषारी साप असून याची ओळख म्हणजे याच्या पाठीवर पांढरी किनार असलेल्या तपकिरी रंगाच्या गोल ठिपक्यांच्या तीन रांगा. डोके तपकिरी अंग खवलेदार. डोके त्रिकोणी नाकपुड्या, मोठे उभे डोळे. लांबी ३ ते ५ फुटापर्य॔त. मे ते जुलै दरम्यान मादी ६ ते ६० पिलांना जन्म देते. पिल्ले देखील मोठ्या परड प्रमाणेच दिसतात. ते जन्मताच विषारी असतात. बरेचजण यांना अजगराचे पिल्लू समजून चकतात व हातळतात आणि दंश करून घेतात. हे जिवावर बेतू शकते. घोणस (परड)चे खाद्य उंदीर, सरडे व इतर सस्तन प्राणी.
स्वभावाने हा सुस्त असला तरी  डिवचल्यास वेटोळे करून कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज काढून घाबरवतो. घोणस किंवा परड सापाबाबत एक गैरसमज आहे की हा फुकल्याने माणसाचे शरीर फुगते. पण तो चावून विष सोडल्याने रक्त गोठून अंगावर गाठी येतात. याच्या हल्ल्याचा वेग सेकंदाला आठ फुटापर्यंत असू शकतो म्हणून हा चावल्याचे कधीकधी लक्षातही येत नाही. याच्या अंगावर पाय पडल्यास हा दंश करतो. सध्या शेतात निंदणी चालू असते तेव्हा हात लागून ते चावू शकतात. सोयाबीन व कापसाच्या बुढाला हे बसलेले असू शकतात. म्हणून सावधपणे काम करावे. शेतकरी बांधवांनी नेहमी शेतात काम व फवारणी करताना पायात नेहमी उंच बुट घालायला हवेत. हा चावल्यास वेळ न घालवता त्वरित दवाखान्यात जायला हवे. याचे विष रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्वरित उपचार  मिळाल्यास रुग्ण वाचू शकतो. कधी कधी हा कोरडा चावाही करतो म्हणजे विष सोडत नाही म्हणून घाबरून न जाता उपचारासाठी दवाखाना जवळ करावा.
याचे विष त्वरीत रक्तात मिसळते, म्हणून रक्तस्राव थांबवण्याकरीता जी औषधे वापरली जातात त्यात घोणसच्या विषाचा वापर करतात.
मण्यार : हा मुख्यतः रात्री वावरणारा निशाचर अत्यंत विषारी साप आहे. यात साधा  मण्यार आणि वाल्स सिंध मण्यार हे दोन प्रकार आढळतात. दिवसापेक्षा रात्री यांचा वेग जास्त आणि आक्रमक असतो. एक नर मण्यार दुस-या नर मण्यारला आपल्या क्षेत्रात प्रवेश करू देत नाही. यासाठी तो आपल्या क्षेत्राचे सतर्कतेने रक्षण करतो. दिसायला काळसर निळा किंवा गडद तपकिरी चकचकीत. पाठीवर आडवे पांढरे जोडीदार पट्टे. डोक्याकडे फिकट तर शेपटीकडे गडद पट्टे. ओठ व पोट पांढरे आखूड शेपूट.लांबी ३ ते ५.५ फूट.  मार्च मे महिन्यात मादी ८ ते १२ अंडी घालते. नागिणीप्रमाणेच याची मादीही अंड्यांचे रक्षण करते. याचे खाद्य म्हणजे इतर साप , छोटे मण्यारचेच पिल्ले, उंदीर, सरडे,बेडूक, साधा गवती साप व पाली. हा मानवी वस्तीजवळ राहणारा साप. कधी कधी घरात घुसतो व अंथरुणात घुसून माणसाची हालचाल झाली तर कडकडून चावा घेतो. याचे विष मज्जासंस्थेवर हल्ला करते. रूग्ण हळूहळू कोमात जाऊ लागतो. त्वरित उपचार केल्यास वाचू शकतो.
# बिनविषारी साप : मुख्यत अजगर, धामण, कवड्या, पट्टेरी कवड्या, दिवड, तष्कर, कुकरी, वाळा, डुरक्या घोणस, मांडुळ,  धुळनागीन, नानेटी, गवत्या, काळतोंड्या आढळतात. अजगर दिसायला खूप मोठा असल्याकारणाने त्याला बघताच लोक घाबरतात. धामणच्या बाबतीतही हेच, ती खुप लांब म्हणजे ७ ते ११- ७”  वाढत असल्याने आणि नागासारखे शरीर असल्या कारणाने लोक घाबरतात व मारायला धावतात. खुपच चपळ असणारा दिनचर साप. धामण मार्च – मे मध्ये ८ ते २० अंडी घालते. सहसा याच सापाची लागन लोकांच्या नजरेस पडते. ‘ शेपटावर उभे राहून आळीपिळे देतात ते नर मादी नसून फक्त दोन नर भांडत असतात ‘, असे रोम्युलस विटेकर भारतातील साप या पुस्तकात लिहीतात. जुन जुलै मध्ये पिले बाहेर पडतात. हिचे मुख्य खाद्य उंदीर, घुशी, सरडे, बेडूक, पक्षी, खारी, वटवाघळे आणि साप. शेतक-यांसाठी अत्यंत मदतनीस असणारा साप पण गैरसमजाने सर्वात जास्त विनाकारण मारल्या जाणारा बिनविषारी साप म्हणजे धामण.हा साप वारूळे, उंदराची बिळे, झाडाझुडपात, गवताळ भागात व नागरी वस्तीत आढळतो.

कवड्या हा बिनविषारी,  भिंतीवर सहज चढणारा निशाचर साप. मण्यारसारखा दिसतो. कवड्यात दोन प्रकार आहेत. एक साधा लालसर तपकिरी अंगावर पांढरे आडवे पट्टे आणि दुसरा पट्टेरी कवड्या, पिवळसर पांढ-या  ठिपक्यांचा. काही लोक कवड्याला कवड्या नाग म्हणतात. कवड्याची मादी मार्च- मे मध्ये ४ ते १२ अंडी घालते. सापसुरळी,पाली, किटक खायला घरात भिंतीवर चढतो. भिंतीवरील फोटो, कपडे अडकवायची जागा  याठिकाणी असतो आणि कपडे ठेवताना,काढताना चावतो. दंश थोडा वेदनादायी असतो. म्हणून दंश झालेले लोक खुप घाबरतात. असचे डुरक्याघोणस बाबतीतही , तो दिसायला घोणस ( परड) सारखा असतो. याचा दंशही वेदनादायी असतो.   दिवड हा घाण पाण्यात राहणारा काळसर, शेवाळी किंवा राखाडी रंगाच्या खवल्यात पांढरे, पिवळे ठिपके. नागरी वस्तीत नाली जवळ निघणारा साप. हाताळला असता शरीरातून घाण वास सोडतो.कडकडून चावतो. रात्री जमिनीवर राहतो. वाळा हा सुद्बा बिनविषारी यालाच सामान्यतः सळई म्हणून लोक ओळखतात. पाऊस पडला की घरात, पटांगणात छोटे छोटे सापाचे पिल्ले निघतात तो म्हणजे हा वाळा साप. सापांमध्ये हा सर्वात लहान साप म्हणून ओळखला जातो. मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी , अळ्या खाणारा साप. यालाही लोक घाबरतात व मारतात. कुकरी याचे दात तिक्ष्ण व बाकदार असतात म्हणून याला कुकरी नाव पडले.
सापाबद्दल अनेक गैरसमज- अपसमज प्रचलीत आहेत. साप डुख धरतो, नागाला सर्पमणी असतो, याच्या अंगाखालची माती, वाळू घरात टाकली तर घरात साप येत नाही. धामण गोल चक्र करून पाठलाग करते, धामण म्हशीचे दुध पिते. ईथे एक गोष्ट महत्वाची साप हे शाकाहारी नसून पुर्णपणे मांसाहारी आहेत. साप मेलेली शिकार खात नाहीत. प्रत्येक सापाचे एक वेगळे वैशिष्टय आहे. परड, नाग विष फुकतात. असे अनेक गैरसमज आहेत. जे साफ चूकीचे आहेत. फक्त विणीच्या हंगामात नर मादीच्या शोधात फिरत असतो तेव्हा ते वारंवार एका मागे एक नजरेस पडत असतात. तसेच जेव्हा एखादा साप मारल्या जातो तेव्हा तो गुदद्वारावाटे एक विशिष्ट गंध सोडतो आणि त्या गंधाच्या वासाने दुसरा साप तिथे येऊ शकतो यातून गैरसमज पसरतो की जोडीतला दुसरा साप बदला घ्यायला आला.  पण जोपर्यंत आपण सापाला अपाय करत नाही किंवा धोकादायक वाटत नाही तोपर्यंत ते आपल्याला स्वतःहून अपाय करत नाहीत.
साप डूख धरतो, बदला घेतो या विषयावर प्रकाश टाकताना रानमित्र या पुस्तकात डाॅ. प्रकाश आमटे यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. ते म्हणतात साप डूख धरतो, बदला घेतो या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. सापाला तुमच्यामुळे दुखापत झाली तर तो त्याची प्रतिक्रिया त्याच वेळी देतो. मेटींगच्या वेळी मारलं तर दुसरा साप बदला घ्यायला येतो यातही काही तथ्य नाही. मेटींगच्यावेळी साप एक विशिष्ट गंध सोडत असतो त्यावेळी एखादा साप मारला गेला तर दुसरा साप त्या गंधाच्या आधारे तिथे येऊ शकतो. असाच एका प्रसंगाचा अनुभव मलाही परभणीतील कारेगाव रोडवरील सागर नगरात आला होता. 28 ऑगष्ट 2020 रोजी दोन मोठ्ठे साप खेळत असलेले तरूणांनी बघितले. मला फोन केला, मी येईपर्यंत एक पळून गेला तर दुसरा काही अतिउत्साही मुलांनी विनाकारण मारला. मी जवळच पोचलो होतो.. पण जाईपर्यंत तो बिनविषारी धामण साप मारला गेला होता. थोड्या वेळाने अजून एक मोठ्ठा साप त्या सापाजवळ आला व सारखा त्या सापाच्या आजूबाजूलाच घुटमळू लागला… मी यापुढे कृपया सापाला मारू नका अशी विनंती केली व साप का एकमेकामागे येतात याची माहीती उपस्थित भयभीत जनतेला दिली आणि सांगितले की धामण ही सापाची जात बिनविषारी आहे. आणि कुठलाच साप डूख धरत नाही आणि हा तर बिनविषारी आहे. हा काही अपाय करत नाही पण यापूढे कुठलाही साप दिसला तर मारू नका त्वरीत सर्पमित्राला बोलवा. अशाप्रकारे बरेच बिनविषारी साप लोकांद्वारे विनाकारण भितीपोटी मारले जातात. मग ते बिनविषारी साप डूख धरून काय अपाय करतील बरं.!
विषारी साप तर चारच प्रकारचे असतात. याचा अर्थ असा नाही की विषारी साप मारावेत. ते तर माणसासाठी खुप फायद्याचे आहेत. त्यांचे विष अनेक आजारात उपयोगी पडते. त्यांच्या कातीचा उपयोग दम्यासारखा आजार बरा करण्यासाठी करतात. सर्पविषाचा उपयोग कर्करोग( कॅन्सर) उपचारासाठी गुणकारी असल्याचे आढळून आले आहे. हृदयरोगावरही या विषाचा वापर करून गुणकारी औषधे केली जातात. होमिओपॅथी उपचारातही सर्पविषापासून औषधे केली जातात. घोणस व फुरसेच्या विषाचा वापर रक्ताच्या आजारात वापरतात. घोणसच्या विषाचा वापर हिमोफोलिया या आजारात होतो. असं पी.जे. देवरस व भालचंद्र मयेकर लिहितात.
स्नेक्स ऑफ इंडिया पुस्तकाचे लेखक डाॅ. पी.जे. देवरस म्हणतात की, साप ज्याला चावला असेल त्याने विष टोचले असेलच असे नाही. विषारी साप ज्याला चावला आहे तो विषाचा प्राणघातक डोस देऊ शकतो असे नेहमीच नाही. या दोन्ही प्रकरणांमध्ये रुग्ण कोणत्याही उपचारांशिवाय जिवंत राहू शकतो. साप एका दंशानंतर लगेच विषाचा प्राणघातक डोस देऊ शकतो. हे देखील आहे की ज्या सापाचे विषारी दात काढून टाकले गेले आहे तो त्याशिवाय विषाचा प्राणघातक डोस चावू शकतो. किंग कोब्राच्या (ज्याचे दात काढून टाकले होते ) ज्याने उंदीर साप गिळण्यापूर्वी त्याला पकडले आणि चघळले त्याच्या बाबतीत हे देवरस सरांच्या लक्षात आले.
डाॅ. प्रकाश आमटे असही म्हणतात की, चावण्याआधी विषारी सापाने काही खाल्ल असेल तर विष संपून गेलेलं असतं. त्यामुळे कधी कधी विषारी साप चावूनही माणसाला फारसा त्रास होत नाही. तर “साप समज गैरसमज” पुस्तकात भालचंद्र मयेकर म्हणतात की काही ठिकाणी सापाने भक्षावर किंवा शत्रूवर हल्ला केल्यास विष बाहेर पडते, असा साप काही काळाने दुस-या वेळी जेव्हा माणसाला चावतो तेव्हा त्याच्या विषग्रंथीमध्ये पुरेशा प्रमाणात विष निर्माण झालेले नसते.
कधी कधी साप चावताना विष टोचत नाही त्या चाव्यास कोरडा ( Dry Bite) म्हणतात, या चाव्यामुळे माणसाच्या जिवितास हानी नसते असं निलीमकुमार खैरे आपल्या ‘साप’ या पुस्तकात लिहितात. असे विषारी सापाचे दंश झालेले अनेक रूग्ण आम्ही परभणीतल्या सरकारी व इतर रूग्णालयात बघितले आहेत की ज्याना विषारी साप तर चावलाय पण त्रास काहीच नाही.
साप चावल्यास त्वरीत नजिकचा दवाखाना जवळ करावा. दूर असाल तर प्रथमोचार म्हणून 1) जखम स्वच्छ धुवावी, 2)बॅन्डेज किंवा कापड एक बोट किंवा पेन जाईल असे बांधावे. दंश झालेला भाग स्थिर ठेवावा त्यासाठी फळी किंवा सरळ काठीचा वापर करावा. डाॅक्टरकडे पोहचेपर्यंत ही पट्टी काढू नये. घोणस किंवा फुरसे चावला असेल तर मात्र बॅन्डेज बांधू नये. 3) रूग्णास मानसिक आधार द्यावा. चालणे, बोलणे असे श्रम करू नये. त्यास गाडीवर व खुर्चीवर बसवून दवाखान्यात न्यावे. दंश झालेल्या जागी काप देऊन रक्त वाहू देण्याची पद्धत पूर्वी रूढ होती. पण ती पद्धत चूक आहे. ही बाब वेदनादायी व जास्त रक्त वाहून गेले तर नुकसानच होते. कित्येकदा साप बिनविषारी असतात किंवा विषारी सापाने कोरडा चावाही केलेला असू शकतो.
सापाच्या शरीरात 70% पाणीच असते. त्यामुळे सापांना अन्न कमी आणि पाणीच जास्त लागते. पिलांची वाढ झपाट्याने होत असल्याने त्यांचे कात टाकण्याचे प्रमाण अधिक असते. कात टाकण्यापुर्वी साप काही काळ अन्न घेत नाही. डोळ्यावर पांढरट पडदा आलेला असतो त्यामुळे त्यांना अस्पष्ट दिसू लागते. या कालावधीत ते अधिक रागीट बनतात असं निलीमकुमार खैरे म्हणतात. ते असही म्हणतात की सापाला माणसांना चावण्यात थोडाही रस नसतो कारण माणूस त्याचे भक्षच नाही. अपघाताने तो चावतो. भक्ष्याला ठार मारण्यासाठी व ते पचवण्यासाठी विषाची आवश्यकता असते. बिनविषारी सापांचे पाचकरस हे अत्यंत प्रभावी असतात. म्हणून मोठमोठे भक्ष्य ते सहज पचवतात. ते विळखा घालून भक्ष ठार करतात व नंतर गिळतात. इतरांनी मारलेले भक्ष्य साप खात नाहीत. मेलेलेही भक्ष तो खात नाही. साप आळशी प्राणी आहे. पण तो स्वतःची शिकार स्वतःच करतो. थंड वातावरणात तो शित निद्रा घेतो. या दरम्यान शरीरात साठवलेल्या प्रथिनांतून तो आपली गरज भागवतो.
मयेकर लिहितात मुगूस, गरूड, घार, गिधाड, बहीरी ससाणा, बगळा, घुबड, रानडक्कर, रानमांजरे, मगर हे सापाची शिकार करतात. नागराज व मण्यार सारखे काही साप हे सापांनाच खातात. तर अजगर हा देखील विषारी सापांना आवळून मारतो व खातो. मासे देखील पाणसर्पासारख्या सापाला गटाने हल्ला करून खातात. घोरपडी सापाची अंडी खातात. शॅमेलियन सरडे सुद्धा साप खातात. रोगजंतूदेखील सापाचे आयुष्य कमी करण्यास कारणीभूत ठरतात. गोचीड सापांवर चिकटून त्यांचे रक्त पितात.
घरात किंवा परिसरात साप दिसलाच तर घाबरून न जाता त्यावर लक्ष ठेवावे. सर्पमित्राला बोलवावे. काही नागरिक प्रसंगावधान दाखवतात. परभणी शहरातील मथुरा नगरातील एका महिलेने मध्यरात्री घरात जहाल विषारी मन्यार साप दिसताच न घाबरता सावधपणे त्यावर टोपले झाकून सर्पमित्राला पाचारण केले. विहिरीत अजगर,नाग खुप दिवसापासून पडलेला बघुन त्याला वाचवण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेत सर्पमित्राला पाचारण केले व त्याला वाचवले. वझूर येथे कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या मरणासन्न अजगराला वाचवण्यासाठी तेथील तरूण शेतक-यांनी दाखवलेली तत्परता दखलपात्रच. मनपाचे कर्मचारी साफसफाई करत असताना भरवस्तीत निघालेला विषारी घोणस त्यांच्याच सतर्कतेने तो साप पकडण्यात यश आले आणि नगरातील नागरिकही भयमुक्त झाले. झोपडीत आलेला भलामोठा नाग बलसा गावातील तरूणांनी लक्ष देऊन पकडायला मदत केली. खानापूर व वनामकृवी येथेही राहत्या घरातील माळ्यावर मध्यरात्री निघालेला विषारी नाग पकडण्यात नागरिकांच्या सतर्कतेमुळेच यश आले. इतकेच काय शौचालयातील वापरातील कमोडमध्ये नाग पकडून त्या परिवाराला भयमुक्त करण्यात आले. राहत्या घरात अंथरूणाखाली पहाटे मण्यार गेल्याचे बघून जाग आलेल्या आजीने नातू, सुनेला उठवून आम्हा सर्पमित्राला कळवले तो पकडून त्या परिवारालाही भयमुक्त करण्यात आले. वापरात नसलेल्या बोअरमध्ये पडलेला नाग बाहेर काढून त्यालाही जीवदान देण्यात आले. असे सर्प वाचवण्याचे कार्य करत असताना कुठचाही मोबदला न घेता आम्ही हे कार्य निस्वार्थपणे करत असतो.
सापांचा आदर करणे व त्याला इजा न होऊ न देता कुशलतेने स्टीकच्या सहाय्याने व्यवस्थित पकडणे सोबतच लोकांना सर्पसाक्षर करणे ही ख-या सर्पमित्राची ओळख आहे. सर्पमित्र असणे गरजेचेच पण ते प्रशिक्षितही हवेत.
मानवी वस्तीत पकडलेले साप निर्जन स्थळी सोडताना सर्पमित्रांनी रात्री विषारी व दिवसा बिनविषारी साप सोडावेत असं लेखक राहूल शिंदे ‘महाराष्ट्रातील साप’ या पुस्तकात म्हणतात.
सर्प वाचवून सर्पसाक्षरता करण्यात सर्पमित्रांचे मोलाचे योगदान आहे.
लाॅकडाऊनच्या काळातही सर्पसंवर्धन आणि सर्परक्षण करत नागरिकांना भयमुक्त करण्याची सर्पमित्रांची निस्वार्थ सेवा चालूच होती हेही महत्वाचे.

टिप : साप दिसताच घाबरू नका, मारू नका फक्त लक्ष ठेवून सर्पमित्राला एक फोन लावून कळवा.

सर्पमित्र, सर्पअभ्यासक रणजित कारेगांवकर 
परभणी
मो; ९८२२२ ६३९२८

error: Content is protected !!