..म्हणून गृहमंत्रीपद नाकारलं? जयंत पाटलांकडून आबांच्या ‘त्या’ सल्ल्याचा खुलासा

0 48

शब्दराज ऑनलाईन,दि 19 ः
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. जयंत पाटील यांनी गृहमंत्रिपद का नाकारलं याचं कारण सांगितलं आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी जयंत पाटील बोलत होते.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर भाष्य करत त्यांनी गृहमंत्रीपद का नाकारलं होतं याचा खुलासा केलाय. यावेळी त्यांनी राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांना दिलेल्या सल्ल्याचीही आठवण सांगितली. आबांना गृहखातं कसं आहे विचारलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा बीपी आणि शुगर आहे का विचारलं. मी अजिबात नाही म्हटल्यावर हे खातं घ्या मग होईल, असं सांगत सूचक इशारा दिल्याचं, जयंत पाटील यांनी सांगितलं. सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील हे बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार यांनी सांगितलं की जयंत पाटलांना गृह खात्याविषयी विचारलं तर त्यांचा बीपी वाढला. खरंच तसंच झालं होतं. मी गृहमंत्री व्हायच्या आधी मी आणि अनिल बाबर एका लग्नात गेलो. आर. आर. पाटील देखील या लग्नाला होते. २००९ ला आर. आर. आबांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता. तेव्हा मला पक्षानं सांगितलं होतं की तुम्हाला हे खातं घ्यायचं आहे. मी आबांना विचारलं की हे कसं खातं आहे? तेव्हा आबांनी विचारलं, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? मी म्हटलं अजिबात नाही. डायबेटिस आहे का? अजिबात नाही. मग आर. आर. पाटील म्हणाले, गृहखातं घ्या, या दोन्ही गोष्टी होतील.”

“मंत्र्यांना इतका तणाव असेल, तर पोलीस किती तणावात असतील

“त्या काळात मला ब्लड प्रेशर झाला. माझ्या खासगी सचिवांना दोन्ही आजार झाले. इतकं तणावाचं काम असतं. त्यामुळे तेव्हापासून माझं मत आहे की ब्ल प्रेशर झालाय आता डायबेटिस मागे लागून घ्यायचा नाही. मंत्र्यांना इतका तणाव असेल तर पोलीस किती तणावात असतील याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांच्या सदृढतेकडे लक्ष देणं, त्यांना थोडा तरी दिलासा दिला पाहिजे. तो तणाव दूर करण्यासाठी उपक्रम राबवा. त्यांना ३-४ दिवस फिरण्यासाठी सुट्टी द्या,” अशा सूचनाही जयंत पाटील यांनी यावेळी दिल्या.

“गेल्या काही वर्षांत राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्याकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे, बदली करण्याची धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. यातून केवळ समोरच्याचे समाधान होते, परंतु पोलिसांना त्यांचे काम करू द्या. पोलिसांचं मनोधैर्य वाढवावे लागेल. राजकीय नेत्यांनी त्यांना पाठबळ द्यावे लागेल. केसेस आणि बदली कामा पुरतेच पोलीस ठाण्यात येऊ नका, पोलिसांना पाठबळ देण्यासाठी पण या,” अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

error: Content is protected !!