सोहम पब्लिकेशनचे काव्यसंमेलन म्हणजे साहित्यिकांची मांदियाळी-रज्जाक शेख
श्रीरामपूर, प्रतिनिधी – वर्षाऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच काळा गणपती सभागृह भक्तीनगर सिडको औरंगाबाद येथे सोहम पब्लिकेशन आणि षट्कोळी साहित्यप्रेमी विचार मंचाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि बहारदार काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
या सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक बाबासाहेब मंडलिक,उद्घाटक कॉम्रेड बाबा आरगडे, तर प्रमुख अतिथी गझलकार विजय काकडे,शहादेव सुरासे,जीवन गौरव मासिकाचे सहसंपादक गझलकार रज्जाक शेख ,कांचन ठाकूर आदी उपस्थित होते.यानिमित्ताने सोहम पब्लिकेशनचे काव्यसंमेलन म्हणजे साहित्यिकांची मांदियाळी असते असे मत रज्जाक शेख यांनी मांडले. महाराष्ट्र राज्यातून अनेक साहित्यिक व कवी याठिकाणी उपस्थित होते. आयोजक नितीन गायके आणि संध्याराणी कोल्हे यांच्यावतीने कला,क्रीडा,समाजसेवा,राजकीय,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ आणि कोल्हापुरी फेटा बांधून सन्मान करण्यात आला.आयोजकांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित केला.
साहित्य आपले वय विसरायला लावते असे अध्यक्ष बाबासाहेब मंडलिक म्हणाले.कॉम्रेड बाबा आरगडे यांनी जुन्या काळातील रचना,कविता सादरीकरण आणि आताच्या साहित्यिक रचना यांचा फरक सांगितला आणि आयोजकांनी हा साहित्यवसा पुढे चालवावा असे आवाहन केले. कार्यक्रमात सहभागी निमंत्रित कवींनी आपल्या एकापेक्षा एक दर्जेदार रचना सादर करून दिवसभर प्रफुल्लित वातावरण ठेवले.काहींच्या गझल मनाला स्पर्शून गेल्या.काहींच्या पहाडी आवाजातल्या भारुडानी भक्तिमय वातावरण निर्माण केले.कुणी प्रेमकविता सादरीकरण करून जुन्या आठवणींना उजाळा दिला तर काहींच्या हास्यरचनेनी सभागृहात हास्यांचे फवारे निर्माण झाले.
या सुंदर कार्यक्रमात दुपारी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता आला. सर्व साहित्याकांनी पुन्हा असे सहकार्य करावे ही अपेक्षा नितीन गायके व संध्याराणी कोल्हे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रपट गीतकार गुलाबराजा फुलमाळी आणि कवयित्री आस यांनी केले.