मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरु करा:प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

0 45
परभणी,दि.21(प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेने शहरामध्ये मान्सूनपूर्व नाले सफाईची कामे तात्काळ सुरु करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मान्सून अवघ्या 10 दिवसांवर येवून ठेपला असतांनाही महानगरपालिका प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत आहे. अद्यापही शहरातील मुख्य नाले व इतर नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. दरवर्षी ही नालेसफाई मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरु होवून तीसर्या आठवड्यापर्यंत संपते. परंतु, यावर्षी मे महिना संपत आला असतांनाही महानगरपालिकेच्यावतीने अद्यापही नाले सफाईची कामे झाली नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
शहरातील नाल्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून थोड्याफार प्रमाणात जरी पाऊस पडला तरी नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावरुन वाहू लागते. मागील वर्षी नाल्यांची सफाई योग्यरीत्या न झाल्यामुळे शहरातील अनेक भागामध्ये नागरीकांच्या घरात पाणी शिरले होते. परिणामी नागरीकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या बाबीची माहिती असतांनासुध्दा यावर्षीही नाले सफाईची कामे अद्याप सुरु झाली नाहीत. शहरातील सर्वच प्रमुख नाल्यांमध्ये झाडे उगवली आहेत. जागोजागी प्लास्टिक जमा झाले असून त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. परंतु, याकडे महापालिका प्रशासनाद्वारे अक्षरशः दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही प्रहारने निवेदनाद्वारे केला आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, सर्कल प्रमुख शाम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, धमेंद्र तुपसमिंद्रे, शेख बशीर यांच्या स्वाक्षर्या आहेत.
error: Content is protected !!