शाळेत मन रमेना म्हणून सुरू केला व्यवसाय; 17 व्या वर्षीच लाखोंची कमाई

0 42

उस्मानाबाद, 11 ऑगस्ट : आपल्या आवडीनुसार मेहनत चिकाटी आणि जिद्दीने काम केलं तर यश मिळतेच. याचाच प्रत्यय जिल्ह्यातील एका तरुणामुळे आला आहे. वयाच्या 17 व्या वर्षीच महिना 40 हजारांची तर वार्षिक जवळपास 5 लाखांची कमाई करायला तरुणाने सुरुवात केली आहे. तेही गाईच्या दुधापासून. आजकालच्या तरुणांना शेती किंवा शेतीशी निगडित जोडधंदा करायला नको वाटत आहे. पशुपालनासारखा व्यवसाय स्वीकारण्यास तरूण टाळाटाळ करतात. मात्र, समाधान काळे या तरूणाने कमी वयात पशुपालन व्यवसाय  सुरू केला असून तो यशस्वी करून दाखवला आहे.

वाशी शहराजवळ झिन्नर शिवारात विष्णू काळे यांची 6 एकर शेती आहे. शेतीतून त्यांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा समाधान काळे याने वयाच्या 17 व्या वर्षी शेतीला जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला. या दुग्ध व्यवसायातून त्यांना महिन्याला 40 हजारांचा निव्वळ नफा होत आहे. दुग्ध व्यवसायासाठी 6 एकर पैकी अर्धा एकर क्षेत्रावर जनावरांसाठी चारा लावण्यात आला आहे.

दोन गायींच्या चार गायी

समाधान विष्णू काळे याचे शिक्षण हे दहावी पर्यंत झाले आहे. दहावीमध्ये समाधानकारक गुण न मिळाल्याने आणि लॉकडाऊनच्या काळानंतर समाधानचे मन शिक्षणात काही रमले नाही. त्याने आपल्या वडिलांकडे एका गायीची मागणी केली. सुरुवातीच्या काळात विष्णू काळे यांनी समाधानला 70 हजारांची जरसी प्रजातीची एक गाय खरेदी करून दिली. ही गाय एका वेळेला 16 ते 17 लीटर दूध देत असायची. म्हणजे दिवसातून दोन वेळा असे 30 ते 31 लीटर दुधाचा खवा होऊ लागला. या एका गायीच्या नफ्यावर नंतर समाधानने दुसरी आणखी एक गाय खरेदी केली आणि दुधात आणखी भर पडली. कालांतराने दोन गायींच्या चार गायी झाल्या. सुरुवातीच्या कालावधीत यात फारसा नफा झाला नाही. मात्र तोटाही होत नसल्याचं लक्षात आल्याने समाधानच्या मनाचे खच्चीकरण देखील झाले नाही. शिवाय चारा घरचाच असल्याने चारा खरेदी करण्याचा खर्च वाचतो.

महिन्याला 40 हजार रुपयांचा निव्वळ नफा

चाऱ्यासाठी 6 एकर पैकी अर्धा एकरवर समाधानने मेथी गवत आणि घास गवताची लागवड केली आहे. शेतीचे उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणावर असल्याने शेतीतून नफा होईलच यावर अवलंबून न राहता, गेल्या दोन वर्षापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय सुरू केला. 4 गायींचे दूध समाधान हा स्व:ताच्या हाताने काढतो. सध्या प्रत्येक दिवशी 90 ते 100 लीटर दुधाचा 20 ते 22 किलो खवा तयार होतो. प्रति किलो 145 रुपये दराने खव्याची विक्री होते. सरासरी नोकरी पेक्षाही समाधान व्यवसायातून कमाई करत आहे. गायींसाठी होणारा खर्च वगळता महिन्याला 40 हजार रुपयांचा निव्वळ नफा समाधानला मिळत आहे.

असा आहे पोषक आहार 

आज या गोठ्यात 5 दुभती जनावरं आहेत. यात 4 जरसी गायी, 1 गावरान गायींचा समावेश आहे. रोज होणारं दूध संकलन हे 100 लीटरपेक्षा अधिक आहे. गायींवर होणारा रोजचा खर्च वजा करता रोजचा निव्वळ नफा दीड ते दोन हजार रुपये आहे. वर्षाला हा नफा पाच ते साडे पाच लाखापर्यंत होतो. असे समाधान याने सांगितलं. सर्वच गायींना हा सुग्रास, घास गवत, मका, ज्वारी, खापरी पेंड असा पोषक आहार देण्यात येतो. गायींच्या आरोग्याच्या काळजीसाठी समाधान सतत एका डॉक्टरांचा सल्ला घेतो. जनावरांच्या शेणापासून खत निर्मित करण्यात येते.

मुलगा व्यवसाय करायचं म्हणाला

शिकत असताना समाधानचं मन त्यात लागलं नाही. मला एकेदिवशी म्हणाला, गायी पाळून गायीचा व्यवसाय करायचा. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी त्याला 10 – 12 गायी घेऊन देईल. माझ्याकडे जेवढे पैसे होते त्यात एकच गाय आली. आता त्याला म्हणलं, आता तू वाढव गायी. त्याने दोन वर्षातच 1 च्या 5 गायी केल्या. घरात पण आता चांगला पैसा येतोय. बाकीच्या शेतात जेवढे उत्पन्न मिळते त्यापेक्षा जास्त या व्यवसायामधून मिळत असल्याचे शेतकरी, विष्णू काळे ( संपर्क क्रमांक 7498303919 ) यांनी सांगितले.

error: Content is protected !!