उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

0 302

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर ही याचिका कोर्टाकडून स्वीकारण्यात आली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.

 

एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवरील निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. सुप्रीम कोर्ट १ ऑगस्टला इतर याचिकांसह शिवसेनेच्या या मागणीवरही सुनावणी घेणार आहे.

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही दावा केला आहे. त्यामुळे धनुष्यबाण कुणाकडे राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेल्याने निवडणूक आयोगाने २७ ऑगस्टपर्यंत शिवसेनेला प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश दिले होते.

 

तसेच ८ ऑगस्टपर्यंत शिवसेना कुणाची याबाबत पुरावे, कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना केल्या होत्या.

 

निवडणूक आयोगाच्या याच आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे, असे शिवसेनेने म्हटले होते. आता याप्रकरणावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालायने परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्ट रोजी इतर याचिकांसह या मागणीवरही सुनावणी होणार आहे.

 

शिवसेनेनं याचिकेत नेमकं काय म्हटलं आहे?
शिंदे गट बेकायदेशीरपणे संख्या वाढवून संघटनेत कृत्रिम बहुमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित आहे. निवडणूक आयोग या प्रकरणावर पुढे गेल्यास अपरिमित नुकसान होईल, जे न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. जे प्रकरण न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे त्याची चौकशी करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असंही ठाकरे गटाचे म्हणणं आहे.

error: Content is protected !!