तेजाचा टिळा

0 145

कवी इंद्रजित भालेराव यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त्य ‘शब्दकृतज्ञता’.
शेतकरी कवीची शेती-साहित्य अनुबंधाने शेतकरी विद्यार्थी-मित्राची अनुभवांची ओल…
संदर्भमूल्यांचे मोल करणारी…

इंद्रजित भालेराव यांच्या जन्मषष्ठ्यब्दीचे वर्ष ०१ जानेवारी २०२१ पासून सुरु झालेले आहे. कुणीही जर कवी इंद्रजित भालेराव यांच्याकडे ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नजर टाकली तरी त्यांचा चेहरा तेजोमय दिसतोय असाच अनुभव असणार आहे. कवीच्या काळजातील कविता आणि बाह्यचेहरा सदैव तेजोमय राहिलेला असून आपणांसही तो टवटवीत दृष्टी दाखवतोय. आपण आणि आपल्यांना ‘तेजाचा टिळा’ लावणारा हा सर्वमुखी कवी अखिल भारतीय मराठी कवितेत त्यामुळे ताजेतवाणेपणा देणारा आहे. विचार आणि आचार जपून कवितेसह अनेकांच्या जीवनाला अर्थ आणि आशय देणारे गुरुजी सर्वांनाच प्रभावीत करतात, हे विशेष!

ते माझे गुरुजी आहेत. त्यांनी मला माझा विद्यार्थी आणि मित्र म्हणून जपलेले आहे. २१ वर्षांपूर्वी माझे वडील गेल्यानंतर वडिलांनी परभणीजवळ घेतलेला ०९ एकर जमिनीचा तुकडा मी कसू लागलो. तेव्हा मी फारच एकटा राहत असे. दिवसभर शाळा आणि संध्याकाळी ०५ वाजेच्या नंतर वावरात अंधारपडोस्तोवर गड्यासोबत राबत असे. वावराला ‘मळा’ करण्याच्या नादापायी आई आणि मी एकापाठोपाठ अकाली गेलेल्या भावाची आणि वडिलांची स्मृती जतन करत रानात मरमर करीत असू. त्यावेळी भालेराव गुरूजी घरी आले.
प्रत्यक्षात महाविद्यालयीन जीवनात मी त्यांच्या वर्गात एकदाही शिकायला बसलेलो नाही. पण ते घरी आले आणि माझी जीवन शाळा समृद्ध करून गेले. ‘श्रमातून-निगुतीने राब आणि शब्दांशी दोस्ती कर’, अशी साधी पण सात्विक साद घालून गेले. शब्दांचा बाप असलेल्या माणसाने अशी साद घातल्यानंतर मी अधिकच कष्टवंत झालो. अनेक प्रकारचे वाचन करत गेलो. शब्दांना आपले मानत गेलो. दु:खातून बाहेर पडलो. विद्यार्थीदशेत ते सर्व विद्यार्थ्यांना ३०० पुस्तकांची यादी देऊन त्यांचे वाचन करून घेत. मीबी सखोल वाचन करून त्यांच्या तळकाळजात जाऊन बसलो. ते मला त्यांच्या काव्यवाचनाच्या व साहित्यिक उपक्रमांच्या-कार्यक्रमाला घेऊन जायचे. त्यांच्यासोबत त्यांच्यात मी एकरूप व्हायचो. गाडीत बसल्यावर ते एकदम खुलायचे. ‘आम्हा घरी धन शब्दांचीचं रत्ने’ ही गो. पु. देशपांडे यांनी संशोधन व निरूपण केलेली/ ज्योती सुभाष यांचे दिग्दर्शन लाभलेली आणि ठासीव संगीताने संगीत उज्ज्वल करणारी संगीतकार समीर दुबळे यांची ध्वनिमुद्रिका त्यांनी मला प्रथमतः ऐकवली. लता मंगेशकर यांची ‘शिवकल्याणराजा’ ऐकवून त्यांनी माझ्या कानाची नीट मशागत करून घेतली. गाडी मौसमात येऊन पळायला लागली की, ते ही मूडमध्ये यायचे. गाणी-गोष्टी छान रंगायच्या. नंतर शेकडो गझला- लोकगीतं-भावगीतं-भक्तिगीतं-क्रांतिगीतं-कविता-नाट्यपदं ऐकवली. शब्दांनी आणि संगीताने न्हाऊ, माखू घातल्यामुळे मन आणि मेंदूला उधाण यायचे. महाराष्ट्रात सतत१२ वर्षे मला त्यांनी बीजभाषणं, साहित्यमेळा, साहित्यपरिषदा, व्याख्यानमाला-प्रचारसभा-
पुस्तकांच्या दुकानांना भेटीगाठीसाठी नेले. अनेक विषयांवरच्या गप्पाटप्पा-अनुभव आणि अंदाज यातून मी स्वतःला संपन्न करू शकलो. त्यांचा चांगला सहवास माझी ऊर्जा बनली.

वडील गेल्यावर मी पाच वर्षे कुठेच गेलो नाही आणि कुणाला भेटलोही नाही. शाळा-मळा करत करत कुटुंबासह भावाला सांभाळत होतो. असेच एकदा भालेराव गुरुजी रस्त्यात भेटले. ‘भेटच नाही?कुठे भटकायलास?’ असे बोलले ‘काही नाही, असतो मळ्यात’, मी उत्तर देवोस्तोवर लगेच ते पुन्हा धबधबले, ‘काय-काय केलंस मळ्यात?’ ‘गुलाबाची शेती-पेरू-आंबे-सीताफळ-हनुमानफळ आणि सागवान लागवड मस्त आणलीय भरात’ आदबीने सांगितले. स्वतः ‘बाई नेनंता गुराखी’ असल्यामुळे उतावीळपणाने, ‘मळ्यात नेशील का?’ या प्रश्नातून त्यांची मळा भेटीची ओढबी दिसली. ‘जाऊ की धूळवडीला’ म्हणालो. त्यांनी अट घातली की, आपण आपले दोघंच घरून डब्बे घेऊन जाऊ. सकाळी-सकाळीच मळ्यात डब्बे घेऊन गेलो. वडील गेल्यानंतर (०९ मे २००१) चाळीस दिवसांनी (१९ जून २००१) बांधून काढलेली विहीर, विहिरीजवळ असलेले कडूलिंबाचे डेरेदार -हिरवेगार झाड, बाजूला गार झिलान म्हणून त्या झाडाखाली बसून दोघंजण दिवसभर मनमोकळेपणाने महत्त्वाचे बोलत राहिलो. त्याआधी बेसणभाकर खाताना त्यांना मी झनगं ठेचा खाऊ घातला, त्यावेळी या नाजूकसाजूक कवीच्या डोळ्यांतून पाणी आले, लगेच पाणी पाजले अन् स्वतःच्या हाताने पेढ्याचा तुकडा त्यांच्या तोंडात दिला. पाणी गेले-कवी गोड झाले आणि माझ्या वाटयाला झनगं कविता आल्या. ‘शेतामधी माझी खोप |तिला बोराटीची झाप’ मला खूपच भावली. नंतर तिथेच मी ना. धों. महानोर यांना सीताफळ शेतीच्या संदर्भाने पाठवलेले दीर्घ पत्र त्यांनी मन लावून वाचले. पठ्ठे बापूराव आणि पवळावरचे पुस्तक त्यांनी वाचून काढले. कवीला मी कलाकलाने, ते स्वतः कवितेने उकलत होताना पाहिले.

‘तुझे अनुभव चांगले जमलेले आहेत, लिहून काढ?’ ते तेव्हाच म्हणालेले आहेत. खरोखरंच त्यांची माझ्यावर आणि माझ्या लेखनावर आजपर्यंत नजर आहे. पण खरं सांगतो- मी त्याकाळी भर मे च्या उन्हात राबत असे. भर दुपारी बाभळीच्या झाडाखाली बूडाला टेकून बसल्यावर मरमर केल्यामुळे डोळा लागे. डोक्याखाली किंवा अंगाखाली साधं पोतं किंवा चवाळंही नसे. भूईतून येणारी गरमागरम वाफ- वार्यातल्या झळा मला एसीतल्या गारण्यापेक्षा दाहक असूनबी भारी वाटायच्या. मळा निर्मितीचा आनंदच मनाला गारवा द्यायचा. मी उत्पादित केलेली सीताफळं -हनुमानफळं एक ते दीड किलोग्रॅम वजनाची होऊन मुंबई-अमृतसर-दुबईच्या बाजारात जाऊन लगोलग विकायची.अर्धा किलोग्रॅम वजनाचे गर्रेदार पेरू खाऊन भले-भले खूश व्हायचे. लालेलाल व रंगीत गुलाब पाहून ‘कास पठार’ माझ्या मळ्यात दिसायचे. सागातील फुलपाखरांची नैसर्गिक उधळण पाहणाऱ्याला भावायची…
एकदम फुललेला ‘रानमेवा मळा…’ भावाचे आणि वडिलांचे कायमचे जीवन संपणे… त्यांच्यापाठोपाठ आजी आम्हाला सोडून जाणे… आईचे उघडे कपाळ… आनंद आणि दुःखाचे आंदण मी रानात अनुभवत असे… ते असे…
एकदा मी भूईवर आडवा झालो आणि डोळाही लागला…नागाने जमिनीच्या भळीतून गर्मीने वर येऊन भोकरणीच्या झाडाच्या फांदीच्या-पानांच्या फटीतून माझ्या तोंडावर पडणाऱ्या उन्हाच्या तिरपीवर धरलेला फणा.. तेवढ्यात डोळे उघडलेले अन् मरणागत झालेलो मी… नंतर तो नाग अनेक वर्षे मळ्यातच फिरत असे… प्राचार्य वामनराव सूर्यवंशी यांच्या गाडीसमोरच तो एकदा आडवा आलेला.. वर्गात गरदा करून पोरांना शिकवणारे त्या एका नागापुढे गप्पगार झालेले… प्राचार्य मौनात…असे प्रसंग…
ऐन दसऱ्याच्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून ते झाकड पडेपर्यंत – सातवाजेपर्यंत अशी चौदा तासांची सागवानाची खरड छाटणी.. रक्ताळलेले तळवे पाहून… चवताळून कातवणारी आई.. दसऱ्याला ‘सोनं’ न लुटताच घरातल्या लहान पोरांना घरातच ठेवलेले… तेव्हा घरभर पसरलेली भयाण शांतता…
मळ्यातील सालदार शेखलालच्या अय्युबची मळ्यात आखाडया वरच केलेली सुंता… त्यानिमित्त त्याचे केलेले फूलदान… भल्या-भल्यांनी मळ्यात त्याचे केलेले स्वागत… आमरस-पुरणपोळीचे वनभोजन.. सुरेखा पुणेकरांना मळ्यात नेऊन केलेले औक्षण… भेट दिलेले बुट्ट्याचे लुगडे व चोळीचा खण… त्यांनी दिलेला ‘लावणीचा नाद कर पण लावण्यवतीचा नको…’ हा सल्ला…
त्याकाळचा व आज-आत्ताही भवतालच्या आखाड्यावर असलेला सुंदर शेळके नावाचा सालदार… त्यावेळी तो मळ्यात हायब्रीड ज्वारीच्या धसकटाचे शेत नांगराताना बळीरामाच्या… नांगराच्या फाळाने तासात आलेल्या नागाचे झालेले दोन तुकडे… मुंडके घेऊन बैलांकडे पळणारा नाग… त्याला पळून लावण्यासाठी चाबूक हातात घेऊन पळणारा सुंदर… ढेकळं फेकून मारणारा मी… अर्धा नाग वळमणीत पळविला… पुढे तो जाता येताना सतत दोन वर्ष भेटायचा… पुन्हा त्याचे अर्धे शरीर वाढलेले… पण पुन्हा कधीच न दिसलेला… पण अचानक पेरू तोडताना निर्मळ रानात आईच्या पायाजवळून जाणारा नाग…सुंदरचाच आंबादास नावाचा पोरगा… आज चांगला लग्नाचा झालेला… तेव्हा जन्मल्यानंतर काही दिवसांनी अंगाला अचानक झटके येऊन मरणाच्या दारात च गेलेला… त्याच्या आईने फोडलेला हंबरडा… त्याला मोटारसायकलवर परभणीच्या सरकारी रुग्णालयात नेताना… त्याने डोळे पांढरेफटक करून अंगभर केलेले जुलाब.. उल्टी.. मळवटासारखे अंगभर मिरवत… त्याच्यावर धावतपळत करायला लावलेले उपचार… त्याचा वाचलेला जीव… त्याच्या संगतीला आज येणारा परका दुसरा जीव… जीवाला दिलेला जीव… अन् जीवासाठी येणारा जीव…

अशा… अशा… असंख्य गोष्टी- घटनांचे तपशील आणि त्यांची कलात्मक बांधणी करून मी कविता – कथा-कादंबरी-कथन लिहिले असते.
पण… पिढ्यान् पिढया मातीत राबून कधीही कष्टाचे अन् कशाचेच भांडवल न करणारे जगभरातील शेतकरी मायबाप मला फार मोठे मौनी साहित्यिक वाटतात. मी त्यांच्या पायवाटेने चाललो आहे काय?

सर्वच संतांच्या साहित्यात शेतीचा आलेला संदर्भ व त्यासाठी त्यांनी कष्टप्रद जगलेले जीवन मला निके वाटते. आजचे शेती व शेतकर्यांबद्दलचे फिके लिहून झाल्यावर बाकी काय ? पुस्तकं- पुरस्कारांची लड प्रकाशित होते. आपण मोठे झाल्याची आरास आभासी होते. आणि ऑर्वेलचे ‘अॅनिमल फार्म’ सारखे लेखन पाहिजे, अशी समज पक्की होते. व्यक्ती आणि प्रकृतीनुसार जो-तो लेखनाकडे बघतो. आपण आपले पाहतो, एवढेच ! भालेराव गुरुजींच्या कवितेतील एक ओळ ‘आम्ही कष्टाचंच खातो’, मला मौलिक वाटते. हे अमरतत्त्व जगताना जपले तर कुणाचीच हरकत नसते.

ते म्हणतात, ‘कुणब्याच्या पोरा लढायला शिक’. मी अनेक गोष्टींशी पंगा घेतला आणि पटले नाहीतर घेत राहील. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन् भीमनगर मोहल्ला’ नाटकास परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरणास परवानगी नाकारली. ‘लढायला शिक…’ मी लढलो. परभणीत अभूतपूर्व दर्दी व गर्दीचा उच्चांक या नाटकास लाभला.

मळ्यातील सुबाभळीचा पाला चोरून नेणारा चोर पकडून नीट केला. अनेकदा ‘काट्याकुट्याचा रस्ता’ तुडवीत गेलो. जीवनातले काटे-कुटे मोडून काढले. माणसांना ‘लळा’ लावण्याचे त्यांच्याकडून शिकलो. शेतीत चांगले करण्याच्या वेडापायी महाराष्ट्र व देशभरातले ‘सारे रान’ पालथे घातले. ‘पीकपाणी’ बहरास आणले. ‘माझा शेतकरी बाप’ गाणे संग्रह लोकमतासाठी लेख लिहून लोकार्पण करण्याचे धाडस केले. रा. रं. बोराडे सरांनी लेख वाचून ध्वनीफीत मागवली. ‘तिफणसाज’ असाच साजीवंत केला. ‘गाऊ जिजाऊस आम्ही’ म्हणून शाळेत मुलांकडून ‘एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भालाफेक’ ची पारायणं केली. स्मृतिरंजनात अडकून न पडता मुलगी ‘इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसीन’ किरगिस्तान येथे डॉक्टर होण्यासाठी पाठवली. भालेराव गुरुजींचे अनेक शिष्योत्तम लढणारे आहेत. ज्यात ज्यांनी मला मित्र केलेले कथाकार आसाराम लोमटे, कवी केशव खटिंग, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, कथालेखक बबन आव्हाड, कवी व आकाशवाणी निवेदक सुरेश हिवाळे, नाटककार त्र्यंबक वडस्कर ही नावं प्रातिनिधीक आहेत.

जगाच्या जंजाळात न अडकणारे कवी शब्दांच्या गोतावळ्यात सदोदीत रमतात. कधी-कधी स्वतःची बायको शारीरिक दुखण्याने रात्री-बेरात्री एकटीच निपचित पडून राहताना कवी मात्र मनासारखे शब्द लिहिल्यानंतर किंवा वाचन केल्यानंतर समाधीस्थ व्हायचे. ‘कुणी हे लिहिले, ते वाचले’ म्हटल्यानंतर चट्कन त्याच्याशी एकरूप होणारे हे इतर संसाराधीनांच्याकडे निर्विकारपणे नुसतेच पाहणार. त्यांचा चेहरा मासूम वाटतो पण ते ज्यास्तच तेजस्वी आहेत. या माणसाने शब्दाखातर जगण्यासाठी अनेकांना प्रसंगोचित फटकारलेही. फणफण करून शब्दांत तनमनरूपी होण्यात ते अतिशय एकटेच शब्दलुब्ध !

बुडबुडया जगात शब्दांचे झरे वाहते ठेवत जगणाऱ्या, शब्दांसाठी भटकंती करणाऱ्या, सृष्टीतील गवत- दगडानांही वाचा देणाऱ्या या कवीला आत्ताही जन्माने माणसात राहावे लागते नाहीतर हा ‘रानसखा’ आहे. या माणसाशी फक्त अन् फक्त शब्दांमुळेच दोस्ती किंवा बोलती राहते. शब्दाबाहेरच्या गोष्टीत ‘मला काय कळतंय ते’ किंवा ‘तू-तुम्ही यासाठी तिकडे जा. त्यांना ते कळतंय’, असे म्हणून आपल्याला नकळत पण जाणीवपूर्वक दूर करणारे ते सौम्य शब्दांत समज देणार. स्वत: ढोरं वळल्यामुळे ‘वासराला दोस्त’ म्हणणार. ‘माणसापरीस वासरं बरी’ हे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यावरून आपणांस जाणवणार. जन्माने खेड्यात-मातीत राबल्यामुळे आता शहरात येऊन मातीचे तेथील सर्वच जित्राबाचे जगणे जगास सांगताना हा माणूस पुन्हा गावाकडे आताही वेधकपणे पाहतोय. मातीच्याच माणसांनी ‘स्वयंभूपण’ टिकवले तर ‘खाउजा’ ला चपराक बसेल, ते त्यांना पक्के कळतंय. पण बेगडी दुनियेला आपली लिपाछीप दुसर्‍यांच्या रंगात रंगून करावी वाटते.

झिंगलेली माणसं अन् गुंगलेल्या बाया, चिंतामणी दगडासारखी इकडच्या-तिकडच्या बाजूला वळून रमणारी पोरं गावच्या परक्यापणाला ‘आम-दार’ ‘खास-दार’ ‘नाम-दार’ अशी कवाडं करून कोरायलीत हे त्यांना स्पष्ट दिसतंय. इथूनच नव्याने ‘गाव करी ते राव काय करी?’ ची मशाल पेटवण्यासाठी त्यांचे शब्द काही पोरांना कळू लागलीत. कुठल्याही गोष्टीत ‘कळणं… शहाणं होणं…’ हे समृद्धीकडे जाणारे असते. यासाठी कवीचा व्यासंग घेऊन-नवी मेख हातात घेऊन पिढी चालत आहे. हेच शब्दांचे थोरपण महत्वाचे आहे. कवीला त्याचेच समाधान आहे.

गंभीर कवीला आणि कवितांना त्यामुळे मंचीय आणि पुस्तकीय साद योग्य लाभते. मंचीय कविता सादरीकरणात कवी नारायण सुर्वेनंतर आब राखणारे कवी इंद्रजित भालेराव वाटतात. कवी आणि रसिक एकमेकांत गुंफणे हे या दोघांना लाभले.
पण… १७ सप्टेंबर २०२१ रोजी ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन’ निमित्त्य कवी इंद्रजित भालेराव यांच्या प्रतिकांशिवाय प्रतिमांच्या शोधार्थ कविता गंभीर भासल्या. जीवनातील व्यवहार आणि तत्वांची मोडतोड या बाबतीत समर्थपणे काही सांगू पाहणाऱ्या, ‘सद्गुणांनाही शत्रू असतात’, ‘आपण’,’ वाद’ या रचना काळीज चिरणार्या होत्या. जळजळीत वास्तव अनुभवणे आणि आपल्या ‘मार्गाने’ मार्गस्थ होणाऱ्या खऱ्या माणासाला त्या सूचक कवितांची दाहकता कळली. पोटच्या आणि पाठच्यांच्या उपेक्षेचे दु:ख त्यातून मला दिसू लागले. पण मनात प्रश्न निर्माण झाला की, सरळ लिहिणारा/जगणारा माणूस अशा शब्दांचा धनी कसा? मी त्या कवितांबद्दल संत तुकारामांचा एक अभंग लक्षात घेतला. अभंग असा-
दुर्बळाचे कोण। ऐके घालूनिया मन॥
राहिले कारण। तयावाचून काय तें॥
हे तो नोव्हे उचित। नुपेक्षांचे शरणागत॥
तुका म्हणे रीत।तुमची आम्हा न कळे॥

 

या कवीच्या बाबतीत मला एक प्रयोग करायचा होता. त्यांच्यावर सर्व प्रकारचे लेखन/संशोधन/माहितीपट आलेले आहेत. या कवीचे चित्रमय चरित्र अर्थात, फोटो बायोग्राफीज्(इंद्रजित भालेराव जीवनकाव्य) मला प्रसिद्ध करायचे होते. २० जानेवारी २०२१ रोजी या अनुषंगाने मी त्यांच्याकडे फोटोंची मागणी केलेली होती. अरूण शेवते (संपर्क क्रमांक:९८९२४३८५७४) यांना गळ घालून त्याचे प्रकाशन कवी गुलजार यांच्या हस्ते करण्याचा माझा इरादा पक्का होता. पण ‘वयोमान, प्रकृतिमर्यादा यामुळे गुलजार लाभणार नाहीत’, असे शेवतेंनी स्पष्ट सांगितले. हा एकलहाती प्रयोग असाच एकटा राहिला!कवीसाठी माझ्या दृष्टीने ही कृतज्ञता साध्य झाली नाही, याची काळजातली आस मला सदैव भळभळेल. चित्रप्रकल्प पु.ल. देशपांडे, सुधीर फडके, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांचे आलेले आहेत…आणि आता जर इंद्रजित भालेराव यांचे आले असते तर…

रसिकता-मानवता-वैचारिकता- गंभीरता-प्रामाणिकपणा-संशोधन- गुणग्राहकता-कृतज्ञता जपणारी मांदियाळी त्यांनी निर्माण केली. मराठी कवितेसाठी ‘शब्दसह्याद्री साहित्य सन्मान’ चळवळ सुरू केली. लाखो रुपये मदत करूनही सहजता जपली. ते जिथे-तिथे गेले की, वाचन- लेखन करणाऱ्याला भेटत-आपलेसे करतात. द. ता. भोसले, किशोर कदम उर्फ सौमित्र, नारायण सुर्वे, उत्तम कांबळे, अनुराधा पाटील, आर. आर. पाटील अशा दिग्गजांना भेटायला जाताना त्यांनी मलासोबत-मुलासारखे नेले. त्या माणसांचे वाचन-वागणे मला भावले. माणूस म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचे ते क्षण मला आजही आठवतात.

कधी-कधी ते मला ‘आतंकवादी’ म्हणायचे. ‘धडपडया’, ‘गडबडया’, ‘पागल’, ‘सरफिर्या’ शब्दांनी मला ते हाक मारत. मला ते कधीही वेगळे वाटले नाही. ‘आई तुझ्यामुळे मी’ त्यांनी काढलेल्या पुस्तकाचा प्रकाशक मला केले. परदेशी कलावंत बर्ट आणि पखावजवादक उद्धवबापू आपेगावकर यांच्या ‘सतारपखावज’ जुगलबंदीला स्वतःची आई जाऊन तिसरा दिवस झालेला असताना ते माझ्यामायेपोटी उद्‌घाटक म्हणून उपस्थित राहिले. मी भाषण खराब करतो आणि निवेदन चांगले करतो, असे एकदा त्यांनी सांगितले. पण उत्तम कांबळे, श्रीकांत देशमुख, फ. मुं. शिंदे यांच्याविषयी – साहित्याविषयी बोललो, इटोलीच्या आश्रमशाळेत त्यांच्या अगोदर माझे भाषण त्यांनीच ठेवले. बबन आव्हाडांचे वडील मारोतराव यांच्या स्मृतिशेष मी अप्रतिम भाषण वाचन केल्याची नोंद त्यांनीच केलेली. कधीमधी समीक्षात्मक लिहिले; प्रासंगिक लेखन केले की; त्यांनी आवडल्याचे कळविलेले आहे. मग निवेदन चांगले आणि भाषण.. हा विरोधाभास माझ्या लक्षात आला. मानसिक आणि प्रासंगिक घडणारा हा घोटाळा क्षणीक असल्याचेही मी पक्के लक्षात ठेवले आहे. कवी असल्यामुळे ही गडबड होत असावी. माधव पुटवाड यांनी कवी इंद्रजित भालेराव यांच्या वैचारिक भूमिकेतील विसंगती सांगितलेली अशी-
कोण कुठे कधी
जन्मतो वाढतो
सर्वांना गाडतो
इतिहास
रामापाठोपाठ
बाबरही गेला
थडग्यांना आला
भाव आता
मढे उकरून
जगतात जे जे
गाडले पाहिजे.
त्यांनी आधी ( दूर राहिला गाव, पृ. ४५)

-असे म्हणणारा कवी जेव्हा-
भज नेमानं देवाला
जाय पारावं पोथीला
तुह्या सपनी येवु दें
राजा शिवाजी रातीला
…रीन मातीचं फेडाया
देवराया झाला राजी
…वरदान देन्यासाठी

उभे भवताली देव (आम्ही काबाडाचे धनी, पृ.४२,४३)
असे लिहू लागतो तेव्हा कवीच्या वैचारिक भूमिकेतील विसंगतीही उमटून दिसते. मात्र हे तात्कालिक… कालातीत कवीपण आहे…
त्यांच्या घराच्या पुढे-मागे मी लावलेले आंब्यांचे-चिकूचे झाड त्यांनी माझ्यासारखेच चांगले ठेवलेले आहे. त्यांनी मला भरभरून दिलेले आहे. किमान ५०० ध्वनीमुद्रिका पोत्यात भरून मला त्यांनी भेट दिलेल्या आहेत. माझ्या आईला कर्करोग झाल्यानंतर त्यांनी घरी येऊन आतून उपचाराचा-व्यवस्थेचा स्वतःच्या डोळ्यादेखत आढावा घेतलेला आहे. शाळेच्या वेळेत प्रशिक्षण काळात शहरात दिसल्यावर ‘ इकडे काय करायलास?’ अशी कडक पण गोड शब्दांत विचारपूस करून ‘शिकवताना तत्पर राहा’ असा इशाराही केलेला आहे. ‘चिंतनीत’ नेताना चिंतनाचा तळ खोल-खोल करताना जैविक गरजातून मुक्तीकडे नेण्याचा प्रयत्नही केलेला आहे. बाईमाणसाचे ‘समर्पण’ जपून ठेवण्याचे सल्लेही दिलेले आहेत. मळ्याला ‘ढाबा’ होऊ देऊ नको, असा आदेश त्यांचाच. घराला विचारून बाहेर पैसे खर्च कर, अशी समज देऊन अनुपालन करायला लावणारे तेच. बोलताना एक्साईट होतो,जाणीव करून देणारे ते मार्गदर्शक. नैतिकता शाबूत ठेवली त्यांनीच. मी त्यांना ‘तुम्ही आमचे आदर्श’ आहात, अशा म्हणणाऱ्यांची यादी आणि आठवणी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘तसे नसते रे… सर्वजण मोठे होणे आदर्शाचे पूर्ण रूप आहे’. किती मोठे मन त्यांचे ! आपली माणसं ‘मैत्र जीवांचे’ मानून परक्यांनाही आपला माणूस वाटणारे कवी वैश्विकदृष्टीने मोठा असलेले मला मनातून मोठे वाटतात.

केंब्रिज विद्यापीठात त्यांची कविता पोहचली. भारतीय संसदेत त्यांच्या कवितेने शेतकऱ्यांना वाचा दिली. शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात त्यांच्या कवितेने कार्यकर्त्यांना बळ दिले. पुस्तकांचे पानं-मुलांचे भावविश्व, आयाबायांच्या भावना, थोरामोठ्यांचे व बापाचे-माईचे मोठेपण साकारून त्यांनी कागदाला अमर केले. अमेरिकेत कविता ऐकून भारतीय बहिणींना माहेरपणाची पाठभिंत त्यांची कविता वाटली. विद्यापीठाच्या ग्रंथात तिने पोरांना अभ्यासाबरोबर प्रेरणा दिली. झाडाखाली बसून शेषेराव मोहिते, रंगनाथ पाठारे, अरुण शेवते, यशवंतराव गडाख त्यांच्या कवितेचे आस्वादक होताना मी अनुभवलेले आहेत. विद्या बाळ व एन. डी. पाटील यांनी ‘ऐसे कवी’ मनात जपून ठेवलेले आहेत. कवीश्रेष्ठ संत तुकारामांवर कवीची एक कविता अशी आहे-

तुला एकांताची चाड /
वृक्षवेलींची आवड
तरी माणसाला तुच्छ /
नाही लाविलेस पुच्छ
कान पिळून बाळाचा /
मुका घेतसे गालाचा
जनाप्रति तुझा भाव /
तसा निर्मळ स्वभाव (वेचलेल्या कविता पृ. १०)
पण ती त्यांच्या स्वभावाची मला खात्री वाटते. त्यावर विश्वास बसतो. ते तत्त्वाने व सत्त्वाने जगणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या ‘ तेजाचा टिळा’ ठळक आहे.

-अरूण चव्हाळ, परभणी.
📞:7775841424/
9156767605
ई-मेल: aniketchaval@gmail.com

error: Content is protected !!