बापानेच केला मुलाचा खुन; प्रवरासंगम येथील घटना

0 381

नेवासा, अमोल मांडण – तालुक्यातील प्रवरासंगम येथील बापानेच स्वतःच्या ९ वर्षांच्या मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी नेवासा पोलिसांनी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे . नेवासा न्यायालयाने त्यास २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

दरम्यान , या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . सदर खुनाचा प्रकार १३ ऑक्टोबरला घडला असून , गुन्हा मात्र १६ ऑक्टोबरला दाखल करण्यात आला आहे . सागर शंकर पवार असे खून झालेल्या मुलाचे , तर शंकर रामनाथ पवार असे आरोपीचे नाव आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , नेवासा तालुक्यातील प्रवरासंगमजवळ गोदावरी नदी परिसरात राहणाऱ्या शंकर रामनाथ पवार याने अज्ञात कारणावरून आपला ९ वर्षांचा मुलगा सागर याला १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास हातापाय दोरीने बांधून काठीने बेदम मारहाण केली . या मारहाणीत सागर बेशुद्ध होऊन मयत झाला .
त्यानंतर तो झाडावरून पडून बेशुद्ध झाल्याची खोटी बतावणी करून त्याला नेवासा फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले . त्यानंतर बापाने कोणालाही काही न सांगता परस्पर गोदावरी नदी परिसरातील जुन्या डाक बंगल्याजवळ खड्डा खोदून त्याचा दफनविधी करीत विल्हेवाट लावली . दरम्यान , १३ तारखेला ही घटना झाल्यापासूनच प्रवरासंगम परिसरात या घटनेची चर्चा होत होती . नेवासा पोलिसांना याबाबत सुगावा लागला .
पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दोन दिवस चौकशी केली . दोन साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेतला . प्रारंभी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली . घटनेची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी प्रवरासंगम – टोका प्राथमिक आरोग्य अधिकारी सुरेंद्र पवार व शासकीय दफनविधी अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या घटनास्थळी जाऊन मयत सागरचा मृतदेह बाहेर काढला . पंचनामा करून घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले . आरोग्य अधिकाऱ्यांनी मारहाणीत सागरचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे .त्यानंतर सागरचा बाप शंकर रामनाथ पवार याला अटक करण्यात आली आहे . त्याच्या विरूद्ध पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाड यांच्या फिर्यादीवरून खुनासह परस्पर दफनविधी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे . त्याला काल नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे . याबाबत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे तपास करीत आहेत .

error: Content is protected !!