दुधना नदीवरील राजवाडी येथील पुलाची उंची वाढवावी; दबाव गटाची मागणी

0 147

 

सेलू, प्रतिनिधी – वालुर रस्त्यावरील राजवाडी गावाजवळ दुधना नदीवर असलेल्या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील दबाव गटाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुखमंत्र्यांकडे निवेदन पाठवून करण्यात आली आहे.

 

सेलू – वालुर रस्त्यावर राजवाडी गावाजवळ असलेला सदरील पूल नदीपात्रापासून कमी उंचीचा आहे व या पुलावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. तसेच वालुर ही उपबाजारपेठ असून हाच रस्ता पुढे जिंतूर – संभाजीनगर या महामार्गास मिळतो. वालुर – बोरी मार्गावर नुकताच साखर कारखाना सुरू झाला असून पुढील वर्षी मोठ्याप्रमाणात गाळप सुरू होणार आहे . या परिसरातील जवळपास १५ ते २० खेड्याना सेलू येथे येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो.

 

मात्र पावसाळ्यात अतिवृष्टी झाली किंवा लोअर दुधना धरणातून नदीपात्रात पाणी सोडले तर लगेच सदरील पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होते. नसता जीव मुठित घेऊन पाण्यातून नाविलाजास्तव प्रवास करावा लागतो व पाणी पातळी जास्त वाढली तर मात्र शेतकरी ,विद्यार्थी तसेच रुग्णांची अत्यंत गैरसोय होते. त्यामुळे वाढती वाहतूक लक्षात घेता तातडीने सदरील पुलाची उंची वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

 

तरी या भागातील जनतेच्या या आवश्यक व जिव्हाळ्याच्या प्रश्नी लक्ष घालून संबंधित विभागाला पुलाची उंची वाढवण्याचे आदेशीत करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे .या निवेदनावर दबाव गटाचे अध्यक्ष ऍड श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, ऍड उमेश काष्टे, ऍड योगेश सूर्यवंशी, ऍड देवराव दळवे, दिलीप मगर, सतीश काकडे, मुकुंद टेकाळे, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र आघाव, रौफ भाई, हत्तराव कागणे, चंद्रकांत चौधरी, अजित मंडलिक, राजेंद्र केवारे, विजय मंत्री, किरण डुघरेकर, दिलीप शेवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

error: Content is protected !!