मासिक पाळीमुळे मुलीला वृक्षारोपणापासून रोखणाऱ्या शिक्षकांची गाडीच झाली पलटी

0 41

नाशिक:मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला शाळेतील वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी होण्यास मनाई केल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. राज्य महिला आयोगापासून ते शिक्षण विभागापर्यंत सगळ्यांनीच या घटनेची गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर या आश्रमशाळेतील संबंधित शिक्षकांवर कारवाईच्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच या शाळेतील काही शिक्षकांचा अपघात झाला आहे. हे शिक्षक शाळेत येत असताना त्यांची कार पलटी झाली. यामध्ये तीन शिक्षकांना दुखापत झाली आहे.

संबंधित मुलीच्या तक्रारीनंतर मंगळवारपासून कारवाईची चक्रे हालायला सुरुवात झाली होती. ही घटना समोर आल्यानंतर गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर प्रकल्प अधिकारी बुधवारी भल्या पहाटे या शाळेत पोहोचले. अधिकारी शाळेत दाखल होताच शिक्षकांची एकच पळापळ सुरु झाली. नियमानुसार आश्रमशाळेतील शिक्षकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक असते. मात्र, अनेक शिक्षक आपापल्या घरून येऊन-जाऊन आश्रमशाळेत शिकवत असल्याचा प्रकार यावेळी समोर आला. प्रकल्प अधिकारी शाळेत पोहोचले तेव्हा अनेक शिक्षक घरी होते. अधिकारी आल्याचे समजताच हे शिक्षक तातडीने शाळेकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी देवगाव घोटी रस्त्यावर शिक्षकांच्या कारला अपघात झाला. या अपघातामध्ये कार पलटी झाली. यामध्ये आश्रमशाळेतील तीन शिक्षिका जखमी झाल्या आहेत.
नेमका प्रकार काय?

देवगाव येथील शासकीय आश्रमशाळेने गेल्या आठवड्यात वृक्षारोपण अभियान राबवले. देवगाव आश्रमशाळेतील १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला एका शिक्षकाने ‘तुला मासिक पाळी असल्याने, तू वृक्षारोपण करू नको’ असे म्हणत इतर मुलींसमोर अपमानित केले. तसेच, वृक्षारोपणापासूनही रोखले. संबंधित विद्यार्थिनीने मंगळवारी नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्तांची भेट घेत घडला प्रकार कथन केला. या मुलीच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली असून, संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली होती.

त्यावेळी शाळेच्या एका शिक्षकाने, ‘ज्या मुलींना मासिक पाळी असेल, त्यांनी वृक्षारोपण करू नका. त्यांनी लावलेले झाड जगणार नाही, असा फतवाच काढला होता. विशेष म्हणजे आपले हे अजब तत्त्वज्ञान त्यांनी १२ वी विज्ञानशाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस ऐकवले आणि तिला झाडाचे रोप लावण्यास मनाई केली होती. याबाबत मानसिक ठेच पोहोचलेल्या या विद्यार्थिनीने रविवारी श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान मधे यांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार कथन केला. मधे यांनी तातडीने आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांना दूरध्वनीवरून घडलेला प्रकार सांगितला. मात्र, त्यानंतरही शासन यंत्रणा हालली नाही. अखेर मंगळवारी संबंधित मुलीने मंगळवारी थेट अप्पर आयुक्त यांची भेट घेत घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर सरकारी स्तरावरून कारवाईची सूत्रे हालायला सुरुवात झाली.

error: Content is protected !!