भुजबळांसारखा दुसरा कलंकित मंत्री राज्यात असूच शकत नाही-मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

0 36

राज्यात छगन भुजबळ यांच्यासारखा दुसरा कलंकित मंत्री असूच शकत नाही. मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, त्यानंतर मी त्यांचा कार्यक्रमच करतो, असा रोखठोक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद थांबायचं नाव घेत नाहीये. दोघांकडून एकमेकांवर जोरदार टीकास्र सोडलं जात आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मनोज जरांगेंच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.

यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वैयक्तिक वाद सुरू झाला आहे. दोघांकडून एकमेकांवर वैयक्तिक टीका केली जात आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो, असा अप्रत्यक्ष इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.उमरखेड येथील सभेतून मराठा समाजाला उद्देशून केलेल्या भाषणात मनोज जरांगे म्हणाले, “विरोध करणाऱ्यांचा तुम्ही ताण घेऊ नका. त्यांना मी एकटाच खंबीर आहे. एकदा आरक्षण मिळू द्या, त्याचा (छगन भुजबळ) कार्यक्रमच वाजवतो. इतक्या उच्च दर्जाचा मंत्री, एक पुढारी साध्या साध्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळतंय तर तो आडवा येतोय. याच्यासारखा कलंकित मंत्री या राज्यात दुसरा असूच शकत नाही.”

सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे, अशी सूचक वक्तव्यं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

error: Content is protected !!