“गुणरत्न सदावर्तेंमुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ”; कृती समितीच्या सदस्यांची संतप्त प्रतिक्रिया

0 33

ब्दराज ऑनलाईन,दि 10 ः
राज्यातील अनेक एसटी संघटनांनी संपातून माघार घेतल्यानंतरही विलीनीकरणाची मागणी लावून धरणाऱ्या अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी चांगलीच आगपाखड केली आहे. अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या आक्रस्तळेपणामुळे सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आल्याची टीका या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन कर्मचाऱ्यांच्या मनात भ्रम निर्माण केला. त्यांच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे, हे माहिती नाही. ते सांगतात की, एसटी कर्मचारी नैराश्यात गेले आहेत. पण आम्हाला गुणरत्न सदावर्ते हेच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे वाटतात, अशी टीका कास्ट ट्राईब परिवहन संघटनेचे सरचिटणीस सुनील निर्भवणे यांनी केली.
गुणरत्न सदावर्ते कामगारांना चुकीच्या पद्धतीने भडकावत आहेत. आम्ही शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच अजूनही कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही वाचणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपला रोजीरोटी वाचवली पाहिजे. एसटी टिकली तरच त्यांचा रोजगार टिकणार आहे, ही गोष्ट कर्मचाऱ्यांना ध्यानात ठेवावी, असेही सुनील निर्भवणे यांनी सांगितले.
गुणरत्न सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. वकील सतीश पेंडसे यांच्याकडे आता युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती पत्रकारपरिषदेत देण्यात आली.

error: Content is protected !!