तुका म्हणे : भाग १६ : वाद – विवाद ते कलह 

0 146

सकाळी बॅडमिंटन खेळून झाल्यावर ‘ हॉटेल अपणा ‘ वर आम्ही मित्र मंडळी चहाचा आस्वाद घेत होतो . नुकतीच वीसी ओलांडलेल्या मुलांचा एक गट हसत-खेळत   ‘आपणा ‘ वर  आला . सुरुवातीस काहीतरी चर्चेचा सुर चालू असल्याचे जाणवत होते, पाच-दहा मिनिटांनी मात्र चर्चेपासून वादापर्यंत स्वर वाढत गेला आणि थोड्याच वेळात त्याचे अगदी रुपांतर भांडणात झाले . कसेबसे भांडण सोडवले, कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर कळाले माझा राजकीय पक्ष श्रेष्ठ की तुझा या वादातून तयार झालेले हे भांडण.. हे सर्व चालू असताना बाजुलाच एक वयस्कर बाबा बसले होते ते म्हणाले, या वादाचा काय उपयोग रे तुकाराम महाराजांनी हे केव्हाच सांगून ठेवले आहे , ते असे

तुका म्हणे,
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥
कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥२॥
तुका म्हणे लागे हातां । काय मंथिलें घुसिळतां ॥३॥

तुकोबाराय म्हणतात,
शब्दशः अर्थ करण्यात मिमांसक गुंतले आहे. ते विधीनिषेधाच्या फेऱ्यात सापडतात. सांख्यवादी आहेत ते नेहमी खंडन-मंडनाच्या वादात गुंतलेले असतात. दंभाच्या संकटामध्ये बापुडे फसलेले असतात. धान्य निवडताना धान्य टाकून दिले आणि भुसा तर वाऱ्यासोबत उडून गेले तर दोन्ही बाजूने नुकसान आपलेच होते. तुकाराम महाराज म्हणतात लोणी काढून घेतल्यानंतर ताक घुसळन्यात अर्थ काय हो…
आपण समाजात जगत असताना मतभिन्नता असणे स्वाभाविकच. परंतु त्याचे रूपांतर वादविवादात आणि विकोपाला जाणे वाईटच. रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक नात्यात वाद-विवाद होतात नातं कोणतेही असो पती-पत्नी, भाऊ-बहीण, बाप लेक , मित्र मित्र. छोट्या कारणाने सुरू झालेला वाद मोठे रूप घेतो. कधी कधी तर त्याचं रूपांतर भांडणातही होतं. वाद विवाद तोच योग्य ठरतो ज्यातून काहीतरी सरस बाहेर येत. भारतीय इतिहास पाहिला तर असे समजते की जुन्या काळामध्ये राजदरबारामध्ये अनेक विद्वान बऱ्याच वेळा भिन्न धर्मीय मंडळी सामाजिक, राजकीय , धार्मिक , आध्यात्मिक अशा अनेक विषयांवर वादविवाद करत व त्यातून ज्ञानविकास , सामाजिक विकास, राजकीय विकास साधत.
वाद – विवाद ते कलह होतातच का ?

 १) माझ तेच खरं हा हटवाद :
       आपण आपले स्वतःचे मत बनवतो ते आपल्या ज्ञानानुसार, अनुभवानुसार, इतर स्व:कियांच्या अनुभवानुसार. बऱ्याच वेळा एखाद्या बाबतची माहिती आपणास संपूर्ण माहिती आहे व तीच खरी असे मानतो व त्याबाबत आपण आपले मत पक्के बनवतो ज्यास आपण पक्क मत म्हणजेच opinion म्हणतो. अश्या मताचे रुपांतर ठाम मतामध्ये होते तेंव्हा त्यास आपण धारणा म्हणजेच belief म्हणतो. ज्यावेळी एखाद्या गोष्टीबद्दल आपण ठाम मतावर पोहजातो, त्यावेळी माझं ते खरं या हट्टवादी भूमिकेवर आपण पोहजतो व इतरांचे म्हणणे आपण सफसेल अमान्य करतो.

 २) पूर्वग्रहदूषित दृष्टीकोण :
एखाद्या व्यक्तीबद्दल आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो त्यानुसार आपण त्या व्यक्तीबद्दलचे मत ठरवतो. अमुक अमुक व्यक्ती असाच आहे असे मानून त्याच्याशी माझी मते कधीच जुळणार नाही असे मनात पक्के ठरवून ज्यावेळी आपण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहतो, त्यावेळी आपण अशा व्यक्तीस प्रत्येकवेळी विरोधकच समजत असतो.

 ३) इतरांच्या मतांचा अस्वीकार :
            निसर्गतः प्रत्येक व्यक्ती इतरांपासून वेगळा असतो , हा वेगळेपणा ज्ञानामध्ये , संस्कारांमध्ये,  स्वभावामध्ये अशा अनेक बाबींमध्ये असतो. मग पुढच्या व्यक्तीच्या भावना , विचार, मते सर्वस्वी आपल्या मताला सहमत होणारीच कशी असावी, यातही फरक स्वाभाविकच ना…मग तो व्यक्ती आपले बहीण – भाऊ , आई – वडील , मित्र मैत्रीण असो. मात्र ज्यावेळी आपण इतर व्यक्तींच्या मताचा अस्वीकार करतो त्यावेळी वादविवादातून कलह उद्भवतात. इतरांच्या मतांच्या अस्वीकाराचे आणखी एक कारण म्हणजे स्वतःतील मीपणा ज्यास तुकोबाराय दंभपणा म्हणतात.

 वाद विवाद ते कलह कसे टाळावे ?
 १) विवेकी विचारधारणा ( Rational Thoughts and Beliefs ) : आपल्या मताबद्दल, विचारसूत्राबद्दल जर खात्री, विश्वास असेल तरीही तो केवळ वरवरचा तर नाही ना हे अभ्यासातून आपण मत व्यक्त करण्याआधी समजून घेतले पाहिजे. आपण जी मते मांडणार आहोत ती मते विवेकी दृष्टिकोनातून हडसून खडसून पाहायला हवी.

२) माझेच खरे यातील “च” अट्टाहास टाळणे :  माझी विचारधारणा ही शाश्वत सत्य आहे असं म्हणणं म्हणजेच “च” अट्टाहास. तसे पाहिले तर कोणतेही मत किंवा विचारधारा शाश्वत सत्य नसते ती काळानुरूप, घटनेनुसार ,परिस्थितीनुसार व व्यक्तिसापेक्ष बदलत असते. आपण आपल्या अभ्यासानुसार आपले मत ठामपणे निश्चित मांडू शकतो परंतु पुढील व्यक्ती चुकीचा व आपणच सत्य असे म्हणणे योग्य नव्हे.

 ३) पूर्वग्रह टाळणे :
   आपले मत पूर्वग्रहदूषित असेल तर मनातील ठिणगी आपण अगोदरच पेटवून ठेवत असतो. इतरांबद्दल असलेले पूर्वग्रहाचे ढग बाजूला सारले तरच आपण त्या व्यक्तींच्या मताबद्दल मनमोकळेपणाने अभ्यास करू शकतो, त्याबद्दल मत मांडू शकतो.

 ४) इतरांच्या मतांचा स्वीकार व आदर करणे :
     आपणास नेहमी असे वाटते आपल्या मतांचा सर्वांनी आदर करावा तसेच इतरांनाही वाटत असते. त्यामुळे मतभिन्न असले तरी आपण इतरांच्या मतांचा आदर करणे आवश्यक असते. विरोधच करायचा असेल तर फक्त वैचारिक पातळीवर करावा, त्या संपूर्ण व्यक्तीला विरोधक असे लेबल लावून नको..

 ५) जाणीवपूर्वक काही बाबींकडे दुर्लक्ष :
    बऱ्याच वेळा वादविवादाचे फलित शून्य असते. उलट त्यातून आपले नातेसंबंध, सामाजिक संबंध दुरावतात. मग अश्यावेळी वाद विवादाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय.. कारण ज्या वाद विवादातून आऊटपुट शून्य असेल त्यावर वाद घालने म्हणजे ताकातून लोणी बाहेर येईल अशी अपेक्षा ठेवण्यासारखे आहे. वाद विवादातून काहीच फलित होत नसेल उलट नुकसानच होत असेल तर अश्या प्रकारचे वाद विवाद टाळावे, म्हणूनच तुकोबाराय म्हणतात
” कुशळ गुंतले निषेधा ! वादी प्रवर्तले वादा !!

तुका म्हणे लागे हाता ! काय मंथिले घुसिळता !!

लेखक- डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
     मानसोपारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल
         परभणी ९४२२१०९२००

error: Content is protected !!