तुका म्हणे : भाग १८ : देहसंपदा

0 140

तरुण , रुबाबदार हेमंत पडक्या चेहऱ्यानेच ऑफिसमधून बाहेर पडला. समोरून येणाऱ्या मित्राने त्यास ख्यालखुशाली विचारल्यास, त्याने आयुष्यात काही उरलच नाही अशी सुरवात केली आणि पुढे त्याने न न चा पाढाच वाचला. थोड्याच अंतरावर दोन मूकबधिर व्यक्ती त्यांच्या लिपीमध्ये संवाद साधत होते व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. बाजूलाच एक आजोबा उभे होते , त्यांनी हेमंतला म्हटले तुझ्याकडे सर्वकाही असतानाही तू दुःखी आहेस आणि ती मूकबधिर दोघे आनंदी बघ . तुकाराम महाराजांनी याबद्दल खूप छान सांगितले आहे , ते असे

तुका म्हणे,

सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥१॥
मुखीं वाणी कानीं कीर्ती । डोळे मूर्ती देखावया ॥ध्रु.॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळ ॥२॥
घरा आंगी लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥३॥
तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥४॥

तुकाराम महाराज म्हणतात , अहो , तुम्ही मोठे भाग्यवान आहात. तुम्हाला शरीराचे सर्व काही अवयव आहेत म्हणजे काम करण्यास हात आहेत , चालण्यास पाय आहेत !!१!! बोलण्यास मुखामध्ये वाणी आहे, चांगले श्रवण करण्यास कान आहेत. तसेच हरीची मूर्ती पाहण्यास तुम्हाला व्यवस्थित डोळे आहेत !!२!! विश्वात आजपर्यंत असंख्य लोक आंधळी, पांगळी, मुके-बहिरे होऊन ते सर्व या गोष्टीना मुकले आहेत !!३!! आपल्या घराला स्वत:च आग लावून आपण घरामध्ये सावध असतानाही जो माणूस पळणार नाही , तो कधीही वाचणार नाही !!४!! तुकाराम महाराज म्हणतात चांगले कार्य करण्यासाठी सर्व इंद्रिये अद्याप कार्यक्षम आहेत. तर भौतिक सुखाची भडकती आग लागलेली आहे. अशा परिस्थितीत आपल्या हिताच्याविषयी जागे रहा !!५!!

आजोबा हेमंतला ओवीचा अर्थ समजावून सांगू लागले , ते त्यास म्हणाले ,

आयुष्याची किंमत काय ? : विनासायास मिळालेल्या गोष्टींची किंमत आपणास काहीच नसते. मनुष्य जन्मास येताना त्यास स्वतःला काहीच कष्ट घ्यावे लागत नाही. त्यामुळेच बहुदा बहुतांशजण आपल्या मिळालेल्या आयुष्याची किंमत इतर भौतिक सुखाच्या गोष्टींच्या किमतीपेक्षा कमी लेखू लागतो. आजुबाजुला थोडी नजर फिरवल्यास एक संवाद नेहमीच कानी पडतो, “माझ्याकडे हे नाही , माझ्याकडे ते नाही त्यामुळे माझ्या आयुष्याला काही किंमतच नाही…”

आयुष्याची खरी किंमत : थ्री इडियट सिनेमामधील “मेरे दोसो डॉलर के शूज” म्हणणारा प्राईस टँग आपणास आजूबाजूस अनेक मिळतील. परंतु माझे इतक्या डॉलरचे आयुष्य म्हणणारा एकही मिळणार नाही.. आयुष्याची खरी किंमत जाणून घ्यायची असेल तर एखाद्या आय सी यु मधील ऑक्सीजनवर , सलाईनवर अस्वस्थ अवस्थेत असलेल्या पेशंटकडे पहावे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्याचे आयुष्य मिळाले व धडधाकट शरीर मिळाले यातच सर्वप्रथम आपण भाग्यवान आहोत.

देहसंपदा : आपल्याकडे जे आहे त्याची किंमत आपणास लवकर केव्हाच कळत नाही व जे आपल्याकडे नाही ते मिळवण्यासाठी आपण खूप खटपट करत असतो. निसर्गतः बहुतांश जणांना दोन हात, दोन पाय, कान , नाक , तोंड व इतर सर्व अवयव धडधाकटरीत्या मिळालेले असतात. यासच आपण देहसंपदा म्हणतो. संपदा हा शब्द कळून घेण्यासाठी आपणास जो आंधळा आहे त्यास डोळ्यांची किंमत, जो लंगडा आहे त्यास पायाची किंमत, ज्यांची किडनी खराब झाली आहे व किडनी आवश्यक आहे अशास किडनीची किंमत, ज्यास लिव्हर खराब असताना प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या लिव्हरची किंमत विचारावी लागेल. आपण या सर्व अवयवांची यादी केली आणि त्याची किंमत ठरवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी एकच शब्द येईल – अनमोल…

आयुष्य जगायचं कसं , कन्हत कन्हत की मजेत जगत ? :
बहुतांश जण माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणून रडत रडत जगत असतात, आयुष्याची किंमत भौतिक सुखात मोजत असतात. भौतिक गरजा आयुष्य सुखकारक करण्यासाठी आहेत, आयुष्य सुलभ करण्यासाठी त्या मिळवण्याचा प्रयत्न करणे ठीक, परंतु न मिळाल्यास दुःखी होणे योग्य नव्हे. कारण मनुष्याच्या आयुष्याचा उद्देश वाढण, प्रगति करणे , प्रगल्भ होण व त्यातून आनंद मिळवण हाच. मग आपणास धडधाकट शरीर मिळाले असेल तर निसर्गतः आपला आनंद मिळवण्याचा मार्ग सुलभच. मग आपणच ठरवायच आयुष्य कन्हत कन्हत जगायचं की मस्त मजेत जगायचं. तसं पाहिलं तर कृत्रिम पाय लावून नृत्य करणारी सुधा चंद्रण, खुर्चीवर बसून कृष्णविवरांच्या शोध लावणारे डॉ. स्टीफन हॉकिंग यांच्याकडे पाहिले तर असे जाणवते, शरीरामध्ये काही दोष असला तरीही माणूस आनंदी जगूच शकतो, फक्त हवा तो आनंद मिळवण्याचा दृष्टीकोन. मग कोणी म्हणेल धष्ट-पुष्ट शरीर मिळाले म्हणजेच आपण आनंदी राहू का, भौतिक सुख नकोच का ? मनुष्य हा आदिमकालापासून प्रगतिशील, पुढे पाऊल टाकणारा, आयुष्य सुखकारक करण्याचा प्रयत्न करणारा प्राणी आहे. सुखकारक आयुष्य करणं योग्यच परंतू प्रत्येक गोष्ट मिळायलाच हवी असा अट्टाहास करणं हे दुःखाचं मूळ कारण. त्यामुळे भौतिक सुख व भावनिक सुख या दोन्ही सुखांची योग्य सांगड घालता आली म्हणजे आनंद मिळवणं सोप. शेवटी आनंद कोणाजवळ चालून येत नसतो तो आपणास मिळवावा लागतो.

म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, आपल्याजवळ जे नाही त्यात दुःख मानत बसण्यापेक्षा, आपणास मिळालेल्या धडधाकट शरीराचा सदउपयोग करून आनंदी जगणे हेच योग्य. ते असे

तुका म्हणे,

सदैव तुम्हां अवघें आहे ! हातपाय चालाया !!
मुखी वाणी कानी कीर्ती ! डोळे मूर्ती देखावया !!

डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
मानसोपचरतज्ज्ञ, मन हॉस्पिटल, परभणी : ९४२२१०९२००

error: Content is protected !!