तुका म्हणे : भाग २८ : अनुभव

0 95

एका कट्ट्यावर तरुणांमध्ये एक विषय खूपच रंगला होता. एक तरुण त्वेषाने सांगू लागला, दोन राजांमध्ये महायुद्ध चालू झाले. एक राजा जो पूर्वाश्रमीचा सैन्य गुप्तहेर संघटनेचा प्रमुख होता, तो अगदी शांतपणे युद्धाची पूर्वतयारी करत होता. तर दुसरा राजा जो पूर्वीचा नाटककार होता तो राजा पुढील राजास नष्ट करण्याच्या धमक्या देण्यात व्यस्त होता. युद्धास सुरुवात झाली व पहिला राजा नाटककार राजाच्या राजधानीपर्यंत हळुवारपणे पोहोचला व अगदी कमी सैन्य हानी होता युद्ध जिंकले. ही चर्चा त्या तरुणांच्या बाजूला उभे राहून सैन्यातील रिटायर्ड मेजर जनरल ऐकत होते. त्यांनी तरुणांना या युद्धातील सर्वात महत्त्वाची गोष्ट विचारली, कोणी म्हणाले सैन्यदल तर कोणी शस्त्रास्त्रे… रिटायर्ड मेजर जनरल शांतपणे म्हणाले, हे युद्ध जिंकण्याची किंवा कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे “अनुभव…” ते पुढे म्हणाले, तुकाराम महाराजांनी अनुभवाबद्दल खूप छान सांगितले आहे. ते असे,
तुका म्हणे,
अनुभवे आलें अंगा । तें या जगा देतसे ॥१॥
नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥
उतरूनि दिसे कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥२॥
तुका म्हणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, मला जो अनुभव आला आहे तो मी या जगाला देत आहे. माझे हे शब्द म्हणजे नुकतेच हातात काहीतरी दयावे व अंदाजेच त्याचे वर्णन करावे अशापैकी नाहीतर ते शब्द म्हणजे माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि त्या शब्दात त्या शब्दाच्या मुळात माझ्या अंतरीचा ओलावा आहे. माझे हे शब्द म्हणजे मी घेतलेल्या अनुभवाच्या कसावर खरे उतरलेले आहेत आणि त्याची मान्यताही महान लोकांनी दिलेली आहे हे शब्द म्हणजे शुध्द शांतरस आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे शब्द म्हणजे सिध्दांतावाचून दुसरे काहीच नाहीत याविषयी प्रत्यक्ष साक्ष देऊन मी हे तुमच्यापुढे ठेवले आहे ती साक्ष म्हणजे माझ्या अनुभवाची आहे.”आपण बऱ्याचवेळा अनुभवाच्या कसोटीवर न उतरताच एखादी गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो व त्या कार्यात अपयशी होतो. तसेच काही गोष्टींचा काहीही अनुभव नसताना बढाया मारण्याच्या नादात वरवरच्या ज्ञानावर गप्पा मारतो व अशा ठिकाणी फजितीस सामोरे जावे लागते. म्हणूनच तुकोबाराय वेळोवेळी अनुभवाचे महत्व अनेक ओव्यांमधून सांगताना दिसतात.
१) स्व: अनुभव : आपणास अनेक गोष्टीची जाणीव होते स्पर्शातून, दृष्टीतून, वासातून, चवीनुसार ई ..परंतु या सर्वांचे आकलन होण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्व:अनुभव. इतरांच्या सांगीव गोष्टीवरून आपणास त्याबद्दल माहिती मिळू शकते परंतु त्याचे संपूर्ण आकलन होणे अशक्यच.
जसे तुकाराम महाराज एका ओवीमध्ये म्हणतात, “ढेकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥ हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥” म्हणजे भोजनाच्या प्राप्तीनंतर दिलेला ढेकर खरी असते पण जेवण न करता दिलेला ढेकर हे ढोंग असते. भोजन करून तृप्तीने दिलेला ढेकर अनुभव असतो तर जेवण न करता दिलेला ढेकर फोलपटाप्रमाणे असते.
२) इतरांचे अनुभव : जगातील सगळ्याच गोष्टींबाबत स्व:अनुभव येणे अशक्यच . आपणास बऱ्याच गोष्टी इतरांच्या अनुभवानुसार शिकाव्या लागतात. अनु-रेणू हे प्रत्येक पदार्थाचे मुल घटक.. आपण सर्वांनी अनु-रेणू प्रत्यक्ष डोळा पाहिले नाही. परंतु महर्षी कणादांपासून ते जॉन डाल्टन पर्यंतच्या शोधानंतर अनु-रेणू चा सिद्धांत आपण सर्वजण अनुभवू शकतो. इतरांचे अनुभव फक्त ऐकीवावर मान्य न करता ते आत्मसात करण्यापूर्वी हवा तो विवेकी दृष्टिकोन, विज्ञानवाद, सिद्धांत पूर्तता..
३) इतिहास अनुभव : इतिहास हा आपणास चिंतन-मनन , अनुभव व त्यातून शिकवण शिकवतो. इतिहास आपणास देतो अनुभवांची शिदोरी. आदिम कालखंडापासून ते आजच्या दिवसापर्यंत इतिहास घडत असतो व तो आपणास सतत शिकवत असतो परंतु त्यासाठी हवी ती त्याकडे सर्वांगाने पाहण्याची दृष्टी. बराच वेळा इतिहासाचे एकांगी चिंतन मनन केल्यामुळे तो त्याच दृष्टिकोनातून मांडला जातो व त्यातून चुकीचे अनुभव मिळतात. त्यामुळेच शालेय अभ्यासापासून ते समाजमाध्यमांवर दाखवल्या जाणाऱ्या इतिहासास सर्वांगी दृष्टिकोन असावा..
४) फोलपट अनुभव नको, सिद्धांत अनुभव हवे : स्व:अनुभव, इतरांचे अनुभव किंवा इतिहास अनुभव असो ते सिद्धांतांवर खरे उतरणारे असावे. कोणतेही अनुभव डोळे झाकून इतरांच्या सांगण्यावरून मान्य करणे चुकीचेच. म्हणूनच तुकोबाराय एका ओवीमध्ये म्हणतात, “बोलाचिच कढी बोलाचाचि भात । जेवुनियां तृप्त कोण झाला॥१!! कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥२!! म्हणजेच नुसत्या बोलण्यातील कडी भाताने कोणाचेही पोट भरत नाही. तसेच साखर हा शब्द कागदावर लिहिण्याने व कागद चाटून साखरेची गोडी येणार नाही त्यास खऱ्या साखरेची चवच घ्यावी लागेल.
परंतु त्याच बरोबर एखाद्या गोष्टीबद्दल आपण स्वतः अज्ञानी असू, तर दुसऱ्यांच्या अनुभवास विरोध म्हणून विरोध करणे ही तेवढेच चुकीचे..
आयुष्य यशस्वी, सुखकर, समाधानकारक बनवायचे असेल तर आवश्यक असते अनुभवांची शिदोरी.. मात्र अनुभव असावे विवेकी, सिद्धांतावर खरे उतरणारे तुकोबाराय म्हणतात,
अनुभवे आलें अंगा । तें या जगा देतसे ॥
नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥

     डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
                                            मानसोपचरतज्ज्ञ, मन हॉस्पिटल, परभणी

error: Content is protected !!