तुका म्हणे : भाग ३१ : मन वोळी मना

0 41

 

एकदा एका महाविद्यालयमध्ये बौद्धिकचा वर्ग चालू होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले, आपले मन अस्वस्थ का होते व ती अस्वस्थता कशी कमी करावी ? काही विद्यार्थी म्हणाले, आपल्या आजूबाजूच्या वाईट परिस्थितीमुळे आपण अस्वस्थ होतो तर काही जण म्हणाले, इतरांनी दिलेल्या त्रासामुळे आपण अस्वस्थ होतो. एकजण म्हणाला मनावर ताबा मिळवणे अशक्यच आहे कारण ते चंचल आहे. सर्व चर्चा संपल्यानंतर त्याच वर्गामध्ये महाविद्यालयाचे ग्रंथपाल बसले होते, ते म्हणाले याचे वर्णन तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये खूप छान केले आहे. ते असे,
मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणां ॥१॥
मीच मज राखण जालों । ज्याणें तेथेचि धरिलों ॥ध्रु.॥
जें जें जेथें उठी । तें तें तया हातें कुंटी ॥२॥
भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, माझे मन माझ्या मनाला व बुद्धी बुद्धीला वळवीत आहे. अशाप्रकारे मीच माझा राखणदार झालो आहे व इंद्रिय विषयांकडे धाव घेणार तोच मी त्यांना थांबवीत आहे. मन ,बुद्धी , चित्त , अहंकार यांच्या ठिकाणी जे काही विकार निर्माण होतात त्यांचे मन व बुद्धी हेच त्यांना खुंटी घालतात. तुकाराम महाराज म्हणतात, मनातील विचारांची भरती आणि ओहोटी उदय आणि विलय यांचा मी साक्षी राहिलो आहे.
बऱ्याच वेळा आपण अस्वस्थ होतो त्यावेळी त्या अस्वस्थतेचे मुळ कारण आजूबाजूची आपणास वाटणारी त्रासदायक परिस्थिती किंवा इतर व्यक्तींना ठरवतो. परंतु हे पूर्णतः सत्य नाही. परिस्थितीचा किंवा इतर व्यक्तींचा आपल्या अस्वस्थतेसाठी काही प्रमाणात हातभार असू शकतो परंतु अस्वस्थ होते ते आपले मन तेही आपल्याच विचारांमुळे.. म्हणूनच तुकोबाराय माझे मन माझ्या मनाला वळविता आहे असे म्हणतात. आजच्या वैज्ञानिक युगात आपण मन आणि मेंदू (बुद्धी) यास एकच भाग बनतो. म्हणजेच मेंदूमध्येच मनाचे कार्य चालते.
१) आपण अस्वस्थ का होतो ? : बहुतांश वेळा आपण आपल्या अस्वस्थतेचे कारण आजूबाजूची परिस्थिती किंवा इतर लोक असे म्हणतो. परंतु विवेकाने विचार केल्यास असे कळते की, आपण अस्वस्थ होतो ते आपल्या विचारांमुळेच. आपले विचार हे बाहेरच्या गोष्टींपासून बहुतांशी स्वतंत्र असतात ते आपल्या हातात असतात. बाहेरच्या वातावरणाचा किंवा इतर व्यक्तींचा स्वतःवर किती परिणाम होऊ द्यायचा हे बऱ्याच वेळा आपल्या हातात असतं. अप्रिय परिस्थितीकडे किंवा व्यक्तीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर त्याबद्दल आपल्या भावना तयार होतात तसे वर्तन करतो. कोरोना कालखंडात पाहण्यात आले की , एकाच घरात एकाच वातावरणात राहणाऱ्या व्यक्तींचे विचार ,भावना व वर्तन हे वेगवेगळे होते. त्यामागील मूळ कारण म्हणजे त्यांचा स्वतःचा त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन.. कोणी खूप घाबरलेले होते , तर कोणी अगदी शांतपणे काम करत होते, तर कोणी निष्काळजीपणाने वागत होते ते आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे..
२) मनाला शांत कसे करावे ? : आपण अस्वस्थ होतो ते आपल्या विचारांमुळे आणि शांतही होतो तेही आपल्या विचारांमुळेच . अप्रिय परिस्थितीमध्ये कोणत्या विचारांची निवड करायची हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. अप्रिय परिस्थितीत असे विचार निवडायचे की जे मला अडचणीतून पुढे जायला मदत करतील व मार्ग दाखवतील. हे काम सर्वस्वी आपल्या मनाचे म्हणजेच आपल्या दृष्टिकोनाचे असते. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात “मन वोळी मना” म्हणजे माझ्या मनाला मनच वळवीत आहे.
अप्रिय परिस्थितीला बर्‍याच वेळा आपली अस्वस्थता वाढते त्यातून राग, द्वेष, बेचैनी, मत्सर ई अशा अनेक भावनांचा उद्रेक होतो. अशा भावनांमुळे आपल्या मनाची अस्वस्थता आणखीनच गुणाकाराने वाढीस लागते. ही अस्वस्थता कमी करण्यासाठी आवश्यक असतो तो जाणीवपूर्वक दृष्टीकोणबदल. जेव्हा आपण कोणत्याही कारणामुळे का होईना पण स्वतःचा दृष्टिकोन तपासून पाहतो , त्याची चिकित्सा करतो व त्यात चिंतनाने बदल करतो व जुन्या दृष्टीकोनाची जागा नव्या दृष्टिकोनाने घेतो आणि तो नवीन दृष्टिकोनच परिवर्तनाचे कारण ठरतो. परंतु हा बदल होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला बदल व्हावा असं मनापासून वाटणं. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, “मीच मज राखण जालों । ज्याणें तेथेचि धरिलों !!” म्हणजे मीच माझा राखणदार झालो आहे व इंद्रिय विषयांकडील धाव मीच थांबवित आहे.
मग सर्वात महत्त्वाचे हा दृष्टीकोण असावा तरी कसा ? आपल्या मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी आपला दृष्टिकोन हा विवेकी असावा. तुकोबाराय ओवीमध्ये शेवटी म्हणतात, “भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥” म्हणजेच मनातील विचारांच्या भरती-ओहोटी, उदय- विलय यांना मी साक्षीभावाने पाहत आहे. म्हणजेच तुकोबाराय हे एखाद्या परिस्थितीकडे पाहतांना सांगतात की, अशा परिस्थितीस ना भयगंडाच्या दृष्टीने , ना शुल्लकीकरणाचा दृष्टीने पहावे तर अशा वेळी त्यास साक्षीभावाने म्हणजेच विवेकी दृष्टीकोनाने पहावे.
आपल्या आयुष्याचे सर्वात महत्त्वाचे ध्येय म्हणजे आनंदी जगणे व इतरांना आनंद देणे असे आपण म्हणतो. या आनंदापर्यंत पोहोचण्याचे मूळ साधन म्हणजे आपले मन. म्हणूनच तुकोबाराय एका ओवीत म्हणतात, “मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।”. मात्र मनाला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो तो जाणीवपूर्वक प्रयत्न , स्वतः विवेकी दृष्टिकोनातून. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात ,
मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणां ॥१!!
मीच मज राखण जालों । ज्याणें तेथेचि धरिलों ॥ध्रु.॥

                                     डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
                       मानसोपारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल, परभणी ९४२२१०९२००

error: Content is protected !!