तुका म्हणे : भाग ३६ : चांगली सुरवात ते सातत्य

0 78

 

एक पंचवीस वर्षाचा तरुण इंजीनियरिंगची डिग्री पूर्ण झाल्यानंतर एका नामांकित कंपनीत कामास लागला परंतु मन लागत नसल्याचे कारण देऊन तो परत गावी आला. वडिलांना सांगितले मी गावी व्यवसाय चालू करतो. व्यवसायात गुंतवणूक केली परंतु दोनच महिन्यात त्याने तोही बंद केला. परत शहरांमध्ये जाऊन नोकरी करण्यास सुरुवात केली परंतु मन काही लागेना आपण अपयशी ठरत आहोत याची भावना निर्माण होत होती त्यामुळे तो आता परत गावी आला. गावामध्ये गरिबीतून श्रीमंत झालेला एक शेतकरी होता त्याने आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली व यावर उपाय विचारला. ते म्हणाले, तुकाराम महाराजांनी खूप अगोदरच याबाबत उपाय सांगून ठेवला आहे. तो असा ,
तुका म्हणे,
वंदिलें वंदावें जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभींच ॥१॥
स्वहिताची चाड ते ऐका बोल । अवघेंचि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥
सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया पुरे कोंभ नये ॥२॥
तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, आपण आरंभापासूनच ज्या दैवताला – कर्माला वंदन करतो त्याच्याविषयी नेहमी वंदनीय भावना ठेवली तर चांगले , नाही तर त्यापेक्षा त्याबाबत सुरुवातच न केलेली बरी. ज्याला आपले स्वहित करायचे आहे त्याने हे माझे बोलणे ऐकावे. मनुष्याच्या अंगी धैर्य असणे हा मोठा मौल्यवान गुण आहे. एखाद्या रोपट्याला वरच्यावर नेहमी पाणी घालावे लागते, नाही तर ते एकदा वाळले तर मग त्यावर कितीही पाणी वाहिले तरी त्याला कोंब फुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, दगडाला देवपण येण्यासाठी अनेक टाकीचे घाव सोसावे लागतात व मूर्ती तयार होते परंतु मूर्ती तयार करत असताना मध्येच दगड फुटला तर तो घाण पुसण्यासाठी वापरतात. तात्पर्य कोणतेही कार्य करताना सुरवातीपासून धीराने, सातत्यपूर्ण करावे.
आपण बऱ्याच वेळा एखादे काम हाती घेतो व ते मध्येच सोडून देतो. अशा वागण्यामुळे आपली ऊर्जा, वेळ वाया जातो व योग्य ते परिणाम न मिळाल्यामुळे आपण अस्वस्थ होतो. त्यामुळेच तुकोबाराय कार्याची सुरुवात चांगली करण्यास सांगतात.
चांगली सुरवात ते सातत्यपूर्ण कर्म :
१) कार्याची निवड : एखाद्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्याबाबत हडसुन- खडसुन चिकित्सा करावी. ज्यावेळी निर्णय करण्याची वेळ येते त्यामध्ये नक्कीच काही फायदा व काही तोटा येतोच. आपल्याकडे असलेल्या जमेच्या बाजू कोणत्या व कमकुवत बाजू कोणत्या याबद्दल सारासार विचार करून काम हाती घ्यावे. निर्णय घेण्यास अवघड जात असल्यास अनुभवी लोकांशी चर्चा करावी, त्यातील फायदे तोटे जाणून घ्यावे.
२) चांगली सुरवात: ‘ वेल बीगिन इज हाफ डन ‘ असे म्हणतात. त्यामुळे कामाची सुरवात चांगली करावी. चांगल्या सुरवातीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. सुरवात करते वेळी आपले शॉर्ट टर्म प्लॅन आणि लाँग टर्म प्लॅन निश्चित करावे आणि आपल्या एक एक ध्येयास पार करण्याचा प्रयत्न करावा.
३) कार्याबद्दल दृढ निष्ठा : कोणतेही कार्य हाती घेतल्यानंतर त्यामध्ये अडथळे येणे सहाजिकच. एखादा मोठा अडथळा आला की बऱ्याचवेळा आपण ते कार्य सोडून देतो व मला ते जमणारच नाही असे मनाशी ठाम ठरवतो. उलट संकटांच्या वेळी आपण चांगल्यात चांगली कोणती गोष्ट करू शकतो यावर भर द्यावा, आपल्या आवाक्यातील गोष्टींबाबत विचार करून एक एक टप्पा पुढे सरकावे. आपण आपल्या कार्याबाबत दृढ निश्चयी असलो की आपण कार्य सोडून देण्याचा विचार मनातून काढून टाकतो व सर्व तन-मनाने त्यात स्वतःला झोकून देतो.
जसे तुकोबाराय एका ओवीमध्ये म्हणतात, ‘ मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहो ॥१॥
तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥’ ते म्हणतात, कुणबी लोकांची पेरणी विषयी इतकी दक्षता असते की, त्यावेळी घरात कोणी मेलेले असेल तरी त्याचे मढे झाकून ठेवतात आणि पेरणी करतात. त्याप्रमाणे मानवाने हा जन्म दुर्लभ आहे असे जाणून इतर सर्व गोष्टीला बाजूला ठेवून आपले हित ज्यात आहे अशा गोष्टी तत्परतेने कराव्या. या ओवीत तुकाराम महाराजांनी ‘मढे झाकुनी’ असे म्हटले आहे ते मोठ्या संकटास दर्शवून..म्हणजेच कितीही मोठे संकट शेतकऱ्यासमोर आले तरीही ते तत्परतेने, निष्ठेने पेरणी – स्व:कार्य करतात.
४) सातत्य : आपण बऱ्याच वेळा कोणतेही कार्य हाती घेतले की धरसोडवृत्तीने ते काम थोड्याच दिवसात सोडून देतो. उदा. एखादा व्यवसाय चालू केल्यानंतर तो त्वरित चालावा व नफा मिळावा अशी आपली इच्छा असते परंतु अस्तित्वात तसे होत नाही. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो व आपणास तो जमणार नाही असे सांगून तो व्यवसाय बंद करतो. खरे पाहिले तर कोणतीही गोष्ट हाती घेतल्यानंतर एकाएकी पूर्णत्वास जात नाही त्यासाठी एक एक पायरी पुढे जावे लागते. जसे तुकाराम महाराज म्हणतात,

‘ ओटीच्या परिस मुठीच्या तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥’
पाभरिने मूठभर दाणे सोडले तर ते पेरल्या जातात. त्यास खत पाणी व्यवस्थित केल्यास त्याची वाढ होते व त्यास संरक्षण दिल्यास पीक हाती येते. तसेच प्रत्येक कार्यास सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असते. मध्येच आपण थांबलो , कंटाळा केला की कार्यसिद्धी होत नाही.
५) कार्याचे फलित : आपण एखादे काम हाती घेतले की त्याच्या फलिताचे आजच स्वप्न रंगवत असतो- मला इतका इतका फायदा होणार , मी श्रीमंत होणार… बहुतांशी चांगली सुरवात, कामातील दृढनिश्चय व सातत्य ठेवल्यास कार्यसिद्धीस फलित चांगलेच मिळते. परंतु कामाचे आउटपुट इतर बाबींवर ही अवलंबून असते जसे निसर्ग, परिस्थिती अशा आपल्या आवाक्याबाहेरील गोष्टी. काही परिस्थितीमध्ये खूप कष्ट करूनही आपणास मनाजोगे फलितही प्राप्त होत नाही. अशावेळी आपण अस्वस्थ होतो. मग अस्वस्थता दूर करायची असेल तर त्या परिस्थितीचा स्वीकार करून परत कामास लागणे हाच चांगला उपाय. यासास तुकाराम महाराज धैर्य म्हणतात.
त्यामुळेच तुकाराम महाराज कोणतेही कार्य सुरुवात करतानाच त्याबद्दल वंदनीय भावना / दृष्टीकोण ठेवण्यास सांगतात. अन्यथा ते काम सुरवातच करू नये असे ठामपणे सुचवतात. तुका म्हणे,वंदिलें वंदावें जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभींच ॥

डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
मनोविकारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल, परभणी ९४२२१०९२००

error: Content is protected !!