तुका म्हणे : भाग ३९ : सुयोग्य संधी

0 58

एकदा एका इंजिनीयर मुलांस एका कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली परंतु त्याने त्यास नावडती म्हणून नकार दिला. तो गावी आला कोणाचाही सल्ला न घेता शेती करू लागला. सुरवातीस खूप काबाडकष्ट केले , पेरणी केली त्यानंतर मात्र तो थकून गेला. पीक काढणीच्या वेळी त्याने दुर्लक्ष केले, पक्षांनी सर्व पीक खाऊन टाकले त्यामुळे खूप तोटा सहन करावा लागला. त्यानंतर मात्र त्याने आपल्या काकांना त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, तुकाराम महाराजांनी याबद्दल खूप छान सांगितले आहे, ते असे

तुका म्हणे,

उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥
नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥
जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें शोभे ॥२॥
पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे घरी । सेज जमा शेवटीं ॥३॥

तुकाराम महाराज म्हणतात, योग्य वेळ आल्यानंतर आपले हित साध्य करण्यासाठी बुद्धीच्या बळाचा वापर करून प्रसंगानुरूप त्या बुद्धीबळाचा वापर केला पाहिजे. लाभ आणि हानी केव्हा घडेल याचा नेम नाही अचानक दोन्हीपैकी एक काहीतरी घडते त्यामुळे आपला लाभ कशात होईल यासाठी मनाशीच विचार करावा आणि योग्य त्या कार्याचे प्रयोजन म्हणजेच त्याची युक्ती करावी. अन्न शिजवताना अग्नि तर लागतो परंतु काहीवेळेस अग्नी लागतो तर काही वेळेस लागत नाही त्यामुळे अन्न शिजवताना अन्न करपले नाही पाहिजे याची खात्री घेतली पाहिजे. त्याप्रमाणे अन्नग्रहण करताना आपण जेवताना आपल्या स्थितीप्रमाणे आपल्या अधिकाराप्रमाणे योग्य त्या ठिकाणी बसून सेवन केल्यास शोभते. शेती करत असताना अगोदर पाळी घालने नंतर नांगरणे आणि नंतर पेरणी करायची असते. त्यानंतर तण काढून शेतमालाचे रक्षण करायचे असते. मग शेतमाल आला की खळे करून ते घरी न्यायचे असते.

आपण नेहमी म्हणतो संधीचं सोनं करणे परंतु बऱ्याच वेळा त्या संधी शोधनच आपणास अवघड जाते. संधी मिळाल्यास कुठेतरी आपण कशात कमी पडतो आणि नंतर कृती असाध्य झाल्यास अस्वस्थ होतो.

१) सुयोग्य बुद्धिबळ : प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे त्यानुसारच त्याचे गुणविशेष, कमतरता, ज्ञान, शारीरिक क्षमता यादेखील वेगळ्या. आपले हित जाणायचे असेल तर एखादी विशिष्ट कृती करताना ती उचित की अनुचित आहे ते पाहावे. काळवेळ पाहून पाऊल टाकावे. परिस्थितीचा अंदाज घ्यावा. औचित्य, तारतम्य व विवेक या गोष्टींनी कृती करण्यास सुरुवात करावी त्यासाठी फक्त हवे ते सुयोग्य बुद्धिबळ.. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ ।

२) सुयोग्य संधी : आपण दैनंदिन जीवनात जगत असताना आपल्यासमोर अनेक संधी येतात त्यातील काहींचा आपण फायदा घेतो तर काही निघून जातात. सुयोग्य संधी म्हणजे आपल्या ज्ञानानुसार, ताकदीनुसार, कमतरतेस जाणून ज्यावेळी कार्य करण्यास परिस्थिती अनुकूल असते आपण त्यास सुयोग्य संधी म्हणतो. स्वहित जाणून, दूर दृष्टिकोनाने, विवेकाने जी गोष्ट योग्य वाटते त्याचा अवश्य लाभ घ्यायला हवा. त्यामुळेच तुकोबाराय हित साध्य करण्यासाठी प्रसंगानुरूप बुद्धिबळाचा वापर करण्यास सांगतात.

३) सुयोग्य कष्ट : कमी-जास्त प्रमाणात आपण सर्वच जण कष्ट करत असतो. एखादी कृती करत असताना किती प्रमाणात बळ लावायचं याचंही भान ठेवणं गरजेचं असतं. काहीच बळ न लावल्यास कामच होणार नाही त्याउलट आवश्‍यकतेपेक्षा जास्त बळ लावलं तर ते काम बिघडूनही जाईल. प्रयत्नाविना काहीच मिळत नाही त्यामुळे प्रयत्न तर आवश्यकच परंतु कष्ट ही सुयोग्य असावे म्हणजेच परिस्थितीनुरूप, तारतम्य ठेवून, सातत्यपूर्ण , मेहनत वाया न घालवणारे आणि कृतीचा आनंद देणारे. त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात, जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें ।

४) लाभ आणि हानी : कृती करत असतांना आपणास एखाद्या संधीचा लाभ मिळतो तसेच अचानकपणे आपणासमोर क्लेशकारक हानी ही येऊ शकते. अशा दोन्ही प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता आपणामध्ये असावी असे तुकाराम महाराज म्हणतात. ते म्हणतात, नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥

काहीच दिवसानंतर वैद्यकीय NEET ची प्रवेश परीक्षा आहे. हे पहा ना बरीचशी मुले निकाल लागल्यानंतर म्हणतात, मी फिजिक्स विषयालाच खूप वेळ दिला त्यामुळे बायलॉजी राहून गेले किंवा शेवटी शेवटी अभ्यासातील सातत्य तुटले असे अनेक विद्यार्थ्याकडून ऐकतो. कृती करताना अचूक वेळ साधने, सर्व गोष्टी वेळेवर करण्याचा प्रयत्न करणे, प्रत्येक कृतीमध्ये प्रमाणबद्धता ठेवणे यासारखे कृती पूर्णत्वास नेण्यास मदत करतात व स्वहित आपण साधू शकतो. यासाठी तुकोबाराय सुयोग्य बुद्धीबळ वापरण्याचा सल्ला देतात, ते असे , तुका म्हणे,

उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ ।

डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक, मनोविकार तज्ज्ञ , परभणी ९४२२१०९२००

error: Content is protected !!