उद्धव ठाकरे राजीनामा देणारच होते… पण इतक्यात चार नेत्यांनी फोन केले अन् त्यांचं मन परिवर्तन झालं, वाचा ‘त्या’ फेसबुक लाईव्हपूर्वी नेमकं काय घडलं…

0 118

परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेलं फेसबुक लाईव्ह आठवतंय का? या फेसबुक लाईव्हला 37 मिनिटं उशीर झाला होता. अन् हे लाईव्ह पुढची 18 मिनीटं चाललं. या लाईव्हलाउशीर का झाला? याबाबत बरेच तर्क वितर्क लावले गेले. पण उद्धव ठाकरे यांचं ते फेसबुक लाईव्ह करण्याचं प्रयोजन आणि त्याला झालेला उशीर याच्याशी संबंधित सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या रिपोर्टमध्ये वाचायला मिळणार आहे, स्टेप बाय स्टेप…

ही बातमी आम्ही सुत्रांच्या माहितीच्या आधारे देत आहोत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्ष प्रमुखांना आव्हान दिलं होतं. आमदारांची फौज घेऊन ते सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यांच्याकडचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचं एव्हाना स्पष्ट झालं होतं. त्यामुळे नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी सामाजिक, राजकीय वर्तुळातील जाणकारांची धारणा होती. उद्धव ठाकरे यांचं व्यक्तीमत्व पाहता अधिक चर्चा होण्यापेक्षा राजीनामा देणं, असंच त्यांनी उचित समजलं असतं. अन् तसंच झालं…

उद्धव ठाकरे यांनी ठरवलं की सध्याची परिस्थिती पाहता राजीनामा देणंच योग्य आहे. त्यांनी मनाची संपूर्ण तयारी केली. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला राजीनामा जाहीर करण्याचा निर्धार त्यांनी केला. पण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा म्हणजे आपल्या मित्रपक्षांशी चर्चा तर करावीच लागणार… त्याप्रमाणे मविआचे शिल्पकार शरद पवार यांना त्यांनी फोन केला. आपल्या मनातील इच्छा त्यांना बोलून दाखवली. नेमकी परिस्थिती काय आहे याची जाण शरद पवारांना होतीच. त्यांनी उद्धव ठाकरेंचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. अन् म्हणाले, उद्धवजी तुमचं म्हणणं मला पटतंय. तुमची तत्व योग्य आहेत. पण राजकारणात जरा सुबुरीनं घ्यावं लागतं. तुम्ही इतक्यात धीर सोडू नका, अधिकृतपणे अजून काहीही झालेलं नाही. परिस्थिती कधीही पलटू शकते. तुम्ही राजीनामा देऊ नका.

पुढे सुप्रिया सुळेंचा फोन आला त्या म्हणाल्या, उद्धवजी इतक्यात हरू नका. 2019 च्या परिस्थितीचे आपण सारे साक्षिदार आहोत. तेव्हाही बऱ्याच गोष्टी घडूनही आपलं सरकार आलं. तेव्हा तुम्ही इतक्यात राजीनामा देऊ नका.
काँग्रेसचे महाराष्ट्र निरिक्षक कमलनाथ यांच्याशी दूरध्वनी झाला. त्यांनीही सांगितलं अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. तुम्ही राजीनामा देऊ नका. आपलं सरकार स्थिर आहे. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. शिवसेनेचे आमदारही परत येतील. काळजी करू नका.एवढा मोठा निर्णय पक्षातील नेत्यांना न सांगता घेता येणार नव्हता. आपल्या विश्वासू शिवसैनिकांना त्यांनी आपली मनोकामना बोलून दाखवली. सुभाष देसाई यांच्यासह इतर काही नेत्यांनी तर, काहीही झालं तरी तुम्ही राजीनामा द्यायचा नाही, अशीच भूमिका मांडली. गुवाहाटीला गेलेले सगळे आमदार आपले आहेत. एकनाथ शिंदेंही आपलेच आहेत. सगळे परत येतील. आपलं सरकार आणि पक्ष पुन्हा नव्याने उभा राहिल, असं या नेत्यांनी म्हटलं अन् उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ‘जान’ आली. त्याचं मन परिवर्तन झालं. राजीनामा द्यायला नको, असं त्यांनी मनाशी ठरवलं. पण राजीनाम्याची सल त्यांनी आपल्या संबोधनात बोलून दाखवली. या सगळ्याला बराच वेळ झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह उशीरा सुरू झालं.

पुढे काहीच वेळात फेसबुक लाईव्ह सुरु झालं. अवघा महाराष्ट्र त्यांच्या भाषणाकडे कान लावून बसला होता. उद्धव ठाकरे काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. सुरुवातीला सध्याच्या कोरोना परिस्थितीवर बोलून मग उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मोर्चा वळवला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातल्या कुठल्याही एका आमदाराने माझ्या समोर येऊन मला सांगावं की मी राज्यकारभार करण्यासाठी लायक नाही, मी आता राजीनामा देतो. त्यांचं हे विधान शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलं. तर जनतेलाही त्यांच्या या विधानाने धक्का दिला. याच दिवशी रात्र उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला अन् आपला मुक्काम पुन्हा एकदा मातोश्रीकडे वळवला.

error: Content is protected !!