उद्धव ठाकरेंचे आमदार-खासदार फोडले, आता जेष्ठ नेतेही गळाला लावण्याचे प्रयत्न

0 41

राज्यात आमदारांसोबत बंड पुकारत सत्तांतर करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. लिलाधर डाके यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे आमदार, खासदार फोडल्यानंतर आता ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे मनोहर जोशी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले –

“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची ही सदिच्छा भेट होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस कऱण्यासाठी आलो होतो. शिवसेना वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान असून, ते मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांसोबत सुरुवातीपासून जे नेते होते त्यामध्ये लिलाधर डाकेदेखील होते. आनंद दिघे आणि त्यांचे जवळचे संबंध होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. शिवसेनेच्या वाढीत त्यांच्यासारख्या नेत्यांचं फार मोठं योगदान आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मंत्रीपद मिळूनही त्यांची राहणी अगदी साधी असून, स्वत:साठी काही निर्माण केलं नाही. पण जे केलं ते शिवसेना या चार अक्षरांसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी काम केलं. अशा सर्व नेत्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेली आहे. एक ज्येष्ठ नेते म्हणून कार्यकर्त्याच्या रुपाने त्यांना भेटण्यासाठी आलो होतो,” असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

मनोहर जोशींची भेट घेणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेसाठी फार मोठं योगदान असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहे. यांच्या अनुभवाचा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी जितका उपयोग करुन घेता येईल तितका करुन घेणार”.

मुख्यमंत्री शिंदेंनी काल रामदास कदम यांची भेट घेतली

“रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राज्यात शिवसेना, भाजपा व सहयोगी पक्षांचे युती सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा मंत्रालयावर डौलाने फडकत आहे. रामदास भाई कदम ही मुलुखमैदानी तोफ पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात धडाडावी अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या राजकीय आयुष्याची ही नवी इनिंग त्यांनी पुन्हा एकदा जोशात सुरू करावी”, अशा शुभेच्छा याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास भाईंना दिल्या.

error: Content is protected !!