जिंतुरात विजय भांबळे यांचे अफाट शक्तिप्रदर्शन,हजारो जनसमुदायाच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल

0 99

परभणी,दि 29 ः
जिंतूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार विजय भांबळे यांनी मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी  अफाट शक्तिप्रदर्शन करत हजारो जनसमुदायाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

जिंतूर विधानसभेत माजी आमदार विजय भांबळे यांचे मोठे वलय आहे.जिंतूर सेलू या तालुक्यात प्रत्येक गावात भांबळे यांचे समर्थक असून त्यामुळे भांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी बहाल केली.2019 मध्ये अवघ्या काही मतांनी  पराभव झाल्यानंतर ही न खचता  सातत्याने पाच वर्षापासून मतदार संघ पिंजुन काढत आहेत. त्यामुळे जनसामान्यांची भावना ओळखून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. मंगळवारी मोठे शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भांबळे  यांच्या संपर्क कार्यालयापासून ते जिल्हा परिषद मैदानापर्यंत मोठी रॅली काढण्यात आली. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारी अशी रॅली निघाली.जिल्हा परिषद मैदानावर तुफान जनसमुदायाच्या उपस्थित विजयी निर्धार सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार, शिवसेना खासदार संजय जाधव, खासदार डॉ.फौजिया खान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजयराव चौधरी, प्रेक्षा भांबळे यांच्यासह  महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर कडाडून टीका केली, राज्यात गुंडगिरी वाढली आहे, सरकारचा आणि कायद्याचा धाक उरला नाही. मागील पाच वर्षात जिंतूर मतदारसंघ कुठे नेऊन ठेवला असा प्रश्न करत त्यांनी जोरदार टीका केली. यावेळी खासदार जाधव,फौजिया खान यांनी देखील महायुतीवर घनाघात केला.

error: Content is protected !!