“मुलांना लग्नासाठी मुली का मिळत नाहीत?”, भाजपावर टीका करताना शरद पवारांचं विधान

0 128

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेला पुण्यातून सुरूवात झाली आहे. महागाई आणि बेरोजगारीविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर जोरदार टीका केली आहे. सामान्य माणसापुढे महागाईचे संकट उभे आहे. बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात धोरण आणि निर्णय घेण्यास राज्यकर्ते तयार नाहीत. सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. देशातील तरुणांना लग्नासाठी मुली न मिळण्याचं कारणही पवारांनी सांगितलं. ते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सध्या मुलांना लग्नासाठी मुली का मिळत नाहीत? याचं कारण सांगितलं. बीडवरून येत असतानाचा किस्सा शरद पवारांनी सांगितला.

 

‘मी एकेदिवशी बीड वरून येत होता. तेव्हा दुपारच्या वेळी 25 ते 30 तरुण बसली होती. मी तिथं माझी गाडी थांबवली अन त्यांना विचारलं असं का बसला आहात. ते म्हणाले आम्ही पदवीधर, उच्च पदवी घेतलेली आहे. मग तुम्ही काय करता तुमची लग्न झालेली आहेत का? ते म्हणाले, आम्ही बेरोजगार आहोत त्यामुळे मुली विचारतात तुम्ही काय करता? यावर आमच्याकडे उत्तर नाही. हीच बेकारी घालवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा, त्यासाठी या सरकारची तयारी नाही,’ असं शरद पवार म्हणाले.

 

या कार्यक्रमातून शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. महाराष्ट्रातील माणूस कधीही भीक मागत नाही. महापुरुषांनी भीक मागितली, असं एका नेत्याने सांगितलं. पण महाराष्ट्रातील माणूस मोठ्या हिमतीने, कष्ट करून संकटावर मात करतो, असं विधान शरद पवारांनी केलं. सामान्य माणसाला महागाईच्या गर्तेत ढकलून देण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत. या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे, अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायची नाही, असंही पवार म्हणाले.

error: Content is protected !!