लष्कराच्या मदतीने पुर अडकेल्या सहा जणांची सुटका,एनडीआरएफचे पथक दाखल

0 130

परभणी, दि. ०२,
सेलू तालुक्यात मौजे वाई बोथ येथे शेतात ६ लोकांना भारतीय सेना दलाच्या पथकामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील २३ गावांचा संपर्क तुटला असून, एनडीआरएफची टीम व जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा प्रशासन व एनडीआरएफचे पथक पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३८.४ मि.मी. पाऊस पडला असून, दिनांक १ जून २०२४ ते आजपर्यंत ७१८.७ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळांची संख्या ५० आहे. सर्वात जास्त पाऊस जिल्ह्यातील पाथरी मंडळात (३१४.५ मि.मी.) झाला आहे.

जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यामध्ये पाण्याची आवक चांगल्या प्रमाणात झाली असून येलदरी धरणामध्ये ५३ टक्के, लोअर दुधना ६२ टक्के, ढालेगाव उच्चपातळी बंधारा, तारुगव्हाण, व मासोळी धरण १०० टक्के क्षमतेने भरलेले आहेत.

रेस्क्यू ऑपरेशनबाबत सद्यस्थिती

सेलू तालुक्यात मौजे वाई बोथ येथे शेतात ६ लोकांना भारतीय सेना दलाच्या पथकामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच भारतीय सेनेच्या टीममार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

जिंतूर तालुक्यातील बोर्डी गावात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकला असून, सोनपेठ तालुक्यातील मौजे शेळगाव येथे सहा लोकांना रेस्कू करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून, जिंतूर तालुक्यातील करपरा नदीच्या पाण्यामुळे निवळी बु., कडसावंगी, वर्णा, नागापूर, बोरी, मुडा, आसेगाव, बोर्डी, डोहरा, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव, शिरोरी, थडी पिंपळगाव, मानवत तालुक्यातील मानोली, वझुर बुद्रुक, पालम तालुक्यातील आरखेड, उमरखेड, सायाळा, सेलू आणि सेलू तालुक्यातील बोथ, ब्रम्हवाकडी, रोहिना काजळे, रावा अशा एकूण २३ गावांचा संपर्क तुटला आहे.

जिल्ह्यात लहान दुधाळ जनावरे २२२, मोठे दुधाळ जनावरे २१५, लहान ओढकाम करणारे २, मोठे ओढकाम करणारे १४ असे एकूण २५३ जनावरे मृत झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळून आले आहे. तसेच १५२ घरांची पडझड झाल्याचे प्राथमिक अहवालात नोंद झाली आहे. तसेच परभणी जिल्ह्यात तहसील स्तरावरील विविध पथकामार्फत शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी, पुर्णा, दुधना व करपरा या प्रमुख न‌द्यावरील येलदरी व निम्न दुधना हे धरणे तर ढालेगाव, तारुगव्हान, मुदगल, दिग्रस, उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे मध्यम प्रकल्प हे प्रमुख जलाशय असून त्यामधून वेळोवेळी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असतो. जिल्ह्यातील नागरिक, पर्यटक वर्षा विहार (जल पर्यटन) साठी जात असतात. अशा ठिकणी अनुचित घटना, अपघात घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच अशा ठिकाणी साथीचे रोग पसरण्याची ही शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

***

error: Content is protected !!