मंत्र्यांच्या दाव्यामुळे पुन्हा खळबळ..विस्तारात कोणता नेता महायुतीत येणार ?

काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सहभागी होताच अजित पवार गटाच्या नऊ आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागली. अजित पवार गटाने अचानक सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे.

अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार गटातील नेते महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत. संबंधित नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे धमाका सुरू झाला आहे, असा खुलासा शंभूराज देसाई यांनी केला.

दाव्यात तथ्य कसे?

राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हा विस्तार काही ना काही कारणाने पुढे जात गेला. विस्तार होणार एवढीच माहिती मीडियाला वारंवार दिली गेली. पण कधी होणार हे सांगितलं नाही. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील इच्छूक चांगलेच अस्वस्थ झाले होते. मात्र, एक दिवस अचानक मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण त्यात शिंदे गट किंवा भाजपचे इच्छूक आमदार नव्हते. तर थेट अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शपथविधी झाला. अजितदादा यांचा गट भाजप सरकारला येऊन मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराला का विलंब होत होता याचं उत्तरही मिळालं होतं. आताही मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. केवळ विस्तार होणार एवढंच सांगितलं जातं.

आता, शरद पवार गटातील आणखी नेते महायुतीसोबत येणार आहेत. त्यामुळेच कदाचित विस्ताराला विलंब होत असावा, असं देसाई यांनी सांगितलं. त्यामुळे देसाई यांच्या या म्हणण्यात तथ्य वाटत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. शिवाय देसाई हवेतील गप्पा मारत नाहीत. ठोस आणि मुद्द्याचंच बोलणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळेही त्यांच्या दाव्यात तथ्य असल्याचं मानलं जात आहे.

Comments (0)
Add Comment