लोअर दुधनातील पाणी पातळीमुळे सेलू शहराचा पाणीप्रश्न बनणार गंभीर; तीव्र पाणी टंचाईचे संकट

शहरातील बहुतांशी हापसे देखील बंद

 

 

सेलू / नारायण पाटील – यावर्षी झालेल्या अत्यंत कमी पर्जन्यमान मुळे सेलू शहराची पाणीपुरवठ्याची दारोमदार असलेल्या लोअर दुधना प्रकल्पातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे .त्यामुळे हा एक चिंतेचाच विषय असून उन्हाळ्यात सेलू शहराला निश्चितच पाणी टंचाई सारख्या गंभीर प्रश्नाला तोंड द्यावे लागणार . हे मात्र नक्की.

 

 

पूर्वी सेलू शहराचा पाणीपुरवठा हा राजवाडी येथील दुधना नदीच्या पात्रातील विहिरी मधून होत होता . व यावेळी नगर परिषदेला उन्हाळ्यात पाणी पुरवठा करतांना जिकरीचे प्रयत्न करावे लागत होते .यावेळी शहरातील असलेल्या जवळपास ३०० हापसे हाच नागरिकांना एकमेव आधार होता . व नगर परिषद प्रशासनाकडून उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच शहरातील सर्व हापसे दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर केळी जात होती .जास्त पाणी टंचाईच्या काळात तर पाण्याचे टँकर देखील घ्यावे लागत होते .व हा पाणी टंचाईचा प्रश्न नगर परिषदेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत ऐरणीवर येत होता .व नगरसेवकांना प्रचार करतांना अडचणींचा ठरत होता .
परंतु लोअर दुधना धरणाची निर्मिती झाल्या पासून धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जाऊ लागला .व हा पाणी टंचाईचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागला होता . व नगर परिषद प्रशासनाने व नगरसेवकांनी सुटकेचा श्वास सोडला होता .पुरेसा पाऊस होऊन प्रकल्पातील पाणी साठ्यात झालेल्या वाढीमुळे शहराचा पाणी पुरवठा अगदी उन्हाळ्यात देखील व्यवस्थित होत होता .नगर परिषदेच्या वतीने होणारा पाणीपुरवठा सुरळीत व पुरेसा असल्यामुळे या काळात शहरातील जवळपास ९०% हापसे बंद पडले आहेत .बऱ्याच ठिकाणी तर यामधील पाईप काढुन ते बुजून देखील टाकण्यात आलेले आहेत .कांही तुरळकच हापसे चालू अवस्थेत दिसून येत आहेत .

 

 

यावर्षी झालेल्या अत्यंत कमी पर्जन्यवृष्टीमुळे या लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली असून गेल्या वर्षी या दिवसात असलेली ७५% पाणी पातळी यावर्षी केवळ २६% वर आली आहे .त्यातही प्रकल्पाच्या बॅकवॉटर मधील शेतकऱ्यांच्या पाणी उपस्यामुळे यामध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे दिसून येत आहे .परतीच्या पावसाची अजूनही सुतराम श्यकता दिसून येत नाही .त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठा वाढण्याची शक्यता दुरावली आहे .उन्हाळ्यातील तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचा परिणाम देखील या उपलब्ध पाणी साठ्यावर होऊन तो कमी होऊ शकतो .त्यामुळे यावर्षी निश्चितच सेलू शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ नक्कीच येणार आहे .शहरातील हापसे देखील जवळपास पूर्णपणे बंद झाल्यामुळे पाण्याचा तो श्रोत देखील नागरिकांना मिळू शकणार नाही .त्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा अपव्यव टाळणे अत्यंत गरजेचे आहे .तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर उपाय करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने देखील आतापासूनच काहीतरी उपाय योजना करणे आवश्यक आहे .

Comments (0)
Add Comment