अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावणे अत्यावश्यक:डॉ.आनंद भालेराव
पुणे : ‘आयआयटीसारख्या दर्जेदार शिक्षण संस्थांच्या संयुक्त प्रवेश परीक्षेत अनिवार्य असलेले भौतिकशास्त्र व गणित हे विषय अभियांत्रिकी साठी बारावीला मात्र ऐच्छिक हा नवा नियम विचित्र आहे,सद्य:स्थितीत भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने नियमावली मागे घेतली असली तरी अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावणारा निर्णय होणे गरजेचे आहे’,असे मत भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी व्यक्त केले आहे.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या नव्या निर्णयावर पत्रकाद्वारे प्रतिक्रिया देवून डॉ आनंद भालेराव यांनी मत मांडले आहे. ते म्हणतात,’ दोन दिवसांत सुधारित मसुदा जाहीर करू असे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने सांगितले आहे. मात्र, बदललेले पात्रता निकष मागे घेणार की त्याबाबत स्पष्टीकरण देणार हे अजून समोर आलेले नाही.एकीकडे,पदवीधर अभियंते आणि बाजाराच्या, उद्योगांच्या गरजा यांची सांगड नाही म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयांवरच गदा येते आहे. ही स्थिती असताना, अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावणे अत्यावश्यक ठरते. विद्यार्थीही तावूनसुलाखून निवडलेले असणे ही अशा वेळी किमान गरज ठरते’.
‘एआयसीटीई’ या विद्यार्थ्यांना निवडस्वातंत्र्याच्या नावाखाली भौतिकशास्त्र व गणितासारख्या विषयांमधून सवलत देऊ पाहाते आहे,यामुळे अभियांत्रिकी शिक्षण धसाला लागणार आहे.
निवडस्वातंत्र्य देणे ठीक असले तरी ते कसे हवे,कशासाठी हवे, त्यामागचा हेतू काय, याविषयी स्पष्टता आवश्यक आहे. नाही तर, आधीच शिकलेल्या विषयांचे वास्तवात उपयोजन कसे करावे या गोंधळात असलेली पिढी निवडीच्या स्वातंत्र्याचे काय करायचे या नव्या गोंधळात सापडेल,असेही डॉ भालेराव यांनी सांगितले.