अशी असावी शाळा

0 280
चालू वर्षातला पहिला पाऊस कोसळत होता. त्या थंडगार पावसात भिजलेलं अंग कोरडं करून  मी अंथरुणावर पोटाशी पाय दुमडून झोपलो होतो. रात्रीच्या वेळेला बेडकांचे डराव डराव डरावणे माझ्या कानावर पडत होते. पहाटेच्या साखर झोपेतून उठून मी शाळेचा रस्ता धरला होता.  मंदिरावर सुरू झालेल्या काकड आरतीचे स्वर आणि मस्जिदेवरून आवाज येणारा बांगीचा स्वर कसा एकत्र मिसळून गेला होता. बाया बापुडे सडासंमार्जन करून दारापुढे रांगोळी चा शेवटचा हात फिरवीत होते. गवळी दूध घेऊन विकायला निघाला होता. आज शनिवार असल्याने सकाळच्या शाळेत जाण्यासाठी मुलं झोपेतून लवकरच उठून बसली होती. माझी सायकल थोड्याशा संथगतीने शाळेच्या दिशेने निघाली होती. रस्त्याने जाणारा येणारा प्रत्येक जण रामराम गुरुजी जय-भीम, वाहेगुरू तर दाढीवाले मौलाना सलाम आलेकुम म्हणून मला लक्षित करत होते. मीही ज्याला त्याला तसाच प्रतिसाद देत होतो.
 शाळेच्या मैदानावर  येताच नळाला आलेले पाणी झाडांना लावून मी कार्यालय उघडले. तोपर्यंत इतर शिक्षक शिक्षिका आल्याच होत्या. त्या त्या वर्गातील मुले स्वयंपाकी मदतनीस ताईंना मदत म्हणून मैदानावर वर्ग सफाई करून रांगा करण्यात तरबेज होती. प्रत्येक वर्गनायक  आपापल्या वर्गाची उंचीनुसार रांग करून   एक साथ सावधान शब्दासाठी मुले-मुली तयार केली होती.
                माझी शाळा होतीच तशी नावाजलेली. गावात येईल त्याला त्याचा सोयरा शाळा दाखवायला घेऊन यायचा. पाहणारा चक्क तोंडात बोट घालून शाळा असावी तर अशी असे उद्गार काढायचा. परिपाठ झाल्यावर मुलं वर्गात गेली तेव्हा गेटजवळून नुकतेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कंपाऊंडच्या आत आले होते. मुख्याध्यापकांना भेटून शाळा पाहण्याची सूचना त्यांनी केली. जवळजवळ दोन तास वर्ग तपासणी केली व परिसर पाहून त्यांनी  अभिप्राय वही मागितली. वरिष्ठांनी या नोंदवहीत  खालील मुद्यांचा अंतर्भाव केलेला होता.
 (१) इमारत=  या शाळेची इमारत इंग्रजी एल या अक्षराच्या आकाराची असून इमारतीची उंची खोली व रुंदी पुरेशी आहे बांधकामाचा दर्जा उत्तम आहे.
 (2) प्रकाश व्यवस्था= वर्गात मुलांना भरपूर सूर्यप्रकाश मिळावा यासाठी प्रकाश व्यवस्था चांगली आहे. समोरा समोर खिडकी असून प्रत्येक वर्गात विजेच्या बल्ब ची व्यवस्था आहे.
 (3)खेळती हवा= प्रत्येकाला प्रकाशाबरोबर खेळती हवा मिळावी म्हणून समोरा समोर खिडकी व वर्गात एक विजेवर चालणारा फॅन आहे. (४) वर्ग फळा= वर्गातील फळा पुरेशा उंचीवर असून मुलांना सहज दिसेल अशी रचना केलेली आहे.
 (५) बैठक व्यवस्था= प्रत्येकाला बसण्यासाठी बैठकीची व्यवस्था केलेली आहे. बसण्यासाठी बँचेस आहेत.
(६) वर्ग सजावट= वर्गाच्या भिंतीना आतून व बाहेरून रंग देऊन पताका लावलेल्या होत्या. वर्ग सजावट करताना मुलांची मदत घेतली होती. (७) शैक्षणिक साहित्याची उपलब्धता= मिळालेल्या शिक्षक अनुदानातून प्रत्येकाने आपापल्या वर्गात वर्गातील मुलांना स्वयं अध्ययनास पूरक असे साहित्य तयार केलेले होते.  साहित्य मुलांना हाताळण्या जोगे होते.
(८) शिक्षक= सर्व  उत्साही शिक्षक होते .सर्व विषयांचे वर्गाचे शिक्षक मनाने तरुण आणि उत्साही वाटले.
 (९) बोलक्या भिंती= सर्व वर्गाच्या भिंतीवर आतल्या व बाहेरच्या बाजुला वेगवेगळे मूलभूत संकेत संबोध व वेगवेगळे चित्र भिंतीवर लावण्यात आलेली होती. चित्रे काढण्यात आली होती. (10 )गणवेश = प्रत्येक वर्गातील मुलामुलींना एकसारखा गणवेश पाहून मला आनंद वाटला.
(११) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन= इयत्ता चौथी वर्गासाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत असेल, इयत्ता तिसरी वर्गासाठी प्रज्ञाशोध, इयत्ता सहावी, सातवीसाठी प्रज्ञाशोध,इयत्ता पाचवीसाठी नवोदय, इयत्ता सातवी साठी शिष्यवृत्ती सराव अप्रगतासाठी उपचारात्मक वर्गाचे नियोजन केलेले आढळते.
 (१२) मैदान = मुलांना व्यवस्थित  खेळण्यासाठी भरपूर मोठे मैदान असून मैदानात खो-खो कबड्डी व लांब उडी  यांची मैदाने आखलेली आहेत.
 (१३)  शाळा बाग= शाळेची स्वतःची वनौषधी व सर्व प्रकारच्या फुलझाडांची बाग तयार केली आहे.  बागेत रंगीबेरंगी फुले पाहून मन प्रसन्न होते.
 (१४) केर कचरा व सांडपाणी व्यवस्था= शाळेत दररोज सफाई केल्यानंतर कचरा कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकून त्यात सांडपाणी सोडले जाते. प्रत्येक वर्षी त्या गांडूळ खताचा वापर शालेय बागेसाठी केला जातो.
 (१५) शौचालय= मुला-मुलींसाठी व शिक्षकांसाठी स्वतंत्र मुतारी व शौचालयाची व्यवस्था केलेली आहे. यावर सुंदर अक्षरात स्वच्छता संदेश लेखन केलेले आहेत.भरपूर पाणी व्यवस्था आढळते. मुलांना तिथंपर्यंत सहज जाता यावे याकरिता रस्ता केलेला आहे.
 (१६)पिण्याचे पाणी=  पिण्याच्या पाण्याच्या पुरेश्या टाक्या आहेत व त्या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र बसवलेले आहेत.
आपल्या शाळेची “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” या पुरस्कारासाठी निवड करण्यास काहीच हरकत नाही असे माझे मत आहे. आपण प्रस्ताव तयार करून  माझ्या कार्यालयाकडे पाठवा मी स्वतः आपली त्यासाठी शिफारस करेल असा शेरा अभिप्राय पुस्तिकेत साहेबांनी नोंदविला.
 तेवढ्यात मी रात्री लावलेला अलार्म वाजला आणि झोपेतून खडबडून जागा झालो आणि माझी शाळा या स्वप्नातल्या शाळेसारखी करण्याची प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण कामाला लागलो.
श्री. रज्जाक मजनुभाई शेख 
पंचायत समिती शिक्षण विभाग श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर
9665778558
error: Content is protected !!