आजपासून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू
अशोक डक यांच्या पाठपुराव्याला यश
माजलगांव, प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये हमी भावाने कापूस खरेदी सुरू करण्याबाबत माजलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीला शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. सहाय्यक निबंधक यांच्या उपस्थितीत हमी भावाने कापूस खरेदी संबंधित सर्व घटकांची बुधवारी बैठक झाली. हमी भावाने कापूस खरेदी केंद्र आज दि. २३ एप्रिल पासून सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सभापती अशोक डक यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
माजलगांव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलेपिंपळगाव येथील टीएमसी आवारात बीडचे जिल्हाधिकारी यांचे दि. २० एप्रिल रोजीचे लेखी पत्र, जिल्हा उपनिबंधक बीड यांचे दि. २१ एप्रिल रोजीचे लेखी पत्र व पणन संचालक यांचे दि. १७ एप्रिल रोजीचे पत्र यांच्या आदेशाने आज दिनांक २३ एप्रिल पासून शासकीय कापूस खरेदी करणे संबंधी सहाय्यक निबंधक शिवाजीराव घुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला माजलगांव बाजार समितीचे सभापती अशोक डक, संचालक प्रभाकरराव होके, सचिव हरिभाऊ सवणे आणि सर्व जिनिंगचे चालक – मालक यांची उपस्थिती होती. या बैठकीत कापूस खरेदीसंदर्भात सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सहायक निबंधक व सभापती यांनी कापूस खरेदी त्वरीत सुरू करावी असे सांगितले. बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे, कोरोना बाबतच्या सर्व आचारसंहितेचे पालन करूनच ही खरेदी करण्याच्या सूचनाही जिनिंग मालकांना देण्यात आल्या. तसेच बाजार समितीकडे पूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीकडून भ्रमणध्वनीद्वारे सांगितल्यावरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणावा असेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले.