आठवण जुन्या दिवसांची

0 311

गेले ते दिन गेले म्हणत आज आपण सर्व मराठी सणसोहळ्यांचे, व्रतवैकल्यांचे स्वागत करतो. आषाढ तळला की निरनिराळे पदार्थ खाण्यासाठी जिभेचे चोचले सुरू होतात. आमच्या बालपणी मोठ्या वाड्यात मोठे काका, बाबा नि छोटे काका अशांची एकत्रच घरे होती.सोयीनुरूप आत खोल्या पाडल्या होत्या. पावसाळ्यात सारी लहानथोर मंडळी मोठ्या हॉलमध्ये बसत. दुसऱ्या दोन्ही ऋतुत सारेजण पडवीतच बसत.

आजी पोथी वाचायची, आजोबांचे पेपर वाचन किंवा काकांसोबत धंद्यातील बोलणी चालत. तिन्ही भाऊ वडिलोपार्जित व्यवसायात चांगलेच नामांकित होते. दिवसभर काम किंवा प्रवास यामुळे संध्याकाळ हक्काची मिळायची. आम्ही मुले ओटीवर बसून अभ्यास करायचो. अभ्यास झाला की सारी सारखी, चुलत भावंडे गजगे,कवड्या किंवा गोटया खेळत असू. आई नि काकू स्वयंपाकाच्या लगबगीत असत. अधून-मधून आजीही आत जाऊन त्यांना सूचना देऊन येई.

श्रावणात तरी सण नि व्रतवैकल्यांची रेलचेलच. आठवड्यातील दोन- तीन दिवस घरातील कोणाचे ना कोणाचे उपवास असत. मुलांना राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की विशेष आवडे.साबूदाण्याची खिचडी तरी उपवास करणाऱ्यांपेक्षा इतरांच्याच पोटात अधिक जाई. आषाढ अमावस्येला घासुन पुसून लख्ख केलेली तांब्या-पितळेची भांडी, देवाचे तबक,कलश,समया, पंचारती श्रावणात उपयोगी पडत. श्रावणातील पहिल्या सोमवारी आमच्या घरात सत्यनारायण पूजा असायची. वाड्यातील नि गावातील शंभर-दीडशे लोकांना जेवणाचे आमंत्रण असे. त्यानिमित्ताने अन्नदानाचे पुण्यही पदरी पडायचे. गावातील मंदिरातही सप्ताह चाले.

हरिविजय, शिवमहात्म्य यासारख्या धार्मिक ग्रंथांचे पारायण होई. श्रावण सुरू होण्यापूर्वी उदबत्त्या, अष्टगंध, हळदीकुंकवाची तसे धूप कापराची जोरदार तयारी होई. आणि घरातील सर्व स्त्रिया कापसाच्या वेळूपासून वाती वळून ठेवत असत. त्या वाती गणपती विसर्जनपर्यंत पुरत. मंदिरात होणारा घंटानाद, घराघरातील मंगलमय प्रसन्न वातावरण श्रावणातील सात्विक पणाचे दर्शन घडवते. श्रावणात रोजच प्रत्येक घरात काही ना काही पंचपक्वान्नांचा नैवेद्य शिजवला जाई. घरातील स्त्रियां, मुली मोठ्या निगुतीने वाटपाचा स्वयंपाक करीत.

संध्याकाळी घरांघरांतून गोड, तिखट पदार्थांचा घमघमाट सुटे. मुलांना श्रावण महिन्यात खाऊची मेजवानीच असायची तसेच इतर वाड्यातूनही जेवायला आवतनं असायची. पुरणपोळ्या, सांजा ,शेवयाची खीर, भजी,सजुऱ्या नि पुऱ्या श्रीखंड अशा पदार्थांची रोजच वर्णी लागत असे. देव्हाऱ्याकडचे नि देवाचे काम आजी मोठ्या प्रेमाने नि मनापासून करायची. दिवसातला जास्तीत जास्त वेळ तिचा देवघरातच जायचा. श्रावणातील ऊन-पावसाचा लपंडाव पहात मोठी झालेली आमची ही पिढी. ‘श्रावणमासी हर्षमानसी’ म्हणत सरींमध्ये भिजुन चिंब होत असू. कोणाला शिंका सुरू झाल्या की आजी तिच्या बटव्यातील औषधीचा काढा करून प्यायला द्यायची नि कपाळाला विक्स चोळायची. सर्दी खोकला तू पळून जात असे .ताप आला की आजीच्या उबदार गोधडीत झोपण्याची मजा काही औरच वाटायची.

आळीपाळीने आम्ही भावंडं ‘आजी ताप येतोय,डोके दुखतंय’ म्हणत रात्री हळूच आजीच्या गोधडीत शिरत असू.आजीही ‘हो रे लबाडा’ म्हणत गालगुच्चा घेऊन आम्हाला कुशीत घेऊन झोपायची. झोपताना आठवणीने खडीसाखर किंवा गुळाचा खडा हातावर ठेवायची तो खातानाही स्वर्गसुख भेटल्याचे समाधान वाटायचे. श्रावणातील रोजचा दिवस सोहळ्यांचा असल्यामुळे स्त्रियां- मुलींना नटण्याची हौस पुरवून घ्यायला मिळायची. सोन्या-चांदीचे दागिने आधीच धुवून पुसून चमकवायला लावायचे. स्त्रियांच्या पैठण्या, बनारसी साड्या उन्हं दाखवून कपाटात नीट घड्या करून ठेवलेल्या असायच्या.

महिन्यातील कोणत्या सणाला कोणती साडी, दागिने घालायचे याचा मनाची ठोकताळा करत या स्त्रिया सज्ज रहात.
नागपंचमीला नवविवाहिता माहेरी येत ते थेट गणपती गौरी करूनच परतत. त्या माहेरी आल्या की कासाराला आमंत्रण जायचं. तो जाड कासऱ्यात बांधलेल्या निरनिराळ्या रंगांच्या नि डिझाईनच्या बांगड्या घेऊन वाड्यात हजर होत असे.आत्या किंवा मोठ्या काकांच्या मुलीही माहेरी आलेल्या असायच्या पण वाड्यातील सर्व स्त्रिया पहिल्या बांगड्या उतरवून नव्याचा साज चढवत.

प्रत्येक जण ‘तुला या बांगड्या, मला या’ असे म्हणत दिवसभर कासाराजवळून उठतच नसत.बांगड्यांनी भरलेले हात पाहायला नि कुणाच्या बांगड्या छान आहेत हे सांगायची परस्परात अहमहमिका लागायची. नागपंचमीच्या आदल्या दिवशी बांगड्या भरून हाताला मेहंदी लावून मुली बायका तयार असायच्या. नागपंचमी दिवशी नागोबाला पुजून त्याला लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवून साऱ्याजणी वडाच्या झाडाकडे पळायच्या. तिथे साऱ्या फांद्यां- वर झोपाळे लटकलेले असायचे.गगनाला टेकणारे उंच-उंच झोपाळे खेळून दमून भागून घरी यायच्या. दूध लाह्याचा आस्वाद घेत.

लहान मुलींना मात्र फ्रॉक, परकर ,पोलकं असा नवा पोशाख मिळे. काही घरात तरी आजीच्या नऊवारी साडीच्या पदराचे घागरेही शिवुन मुली घालत.त्यात त्या खूप सुंदर सुंदर दिसत.त्यावेळी श्रावणी सोमवारी शाळेला सुट्टी असायची. लहान मुले मुली शेताकडे उगवणारे बेलपत्र, आघाडा, दूर्वा आणायला पळत.त्यामुळे दर सोमवारी शिवामूठ घेऊन शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीवर दुधाचा अभिषेक करत असत. दिवसभर कपाळावरचा भटजींनी ओढलेला नाम एखाद्या पदकासारखा मिळवला जात असे .मंदिरात १०८ वेळा ‘ॐ नमः शिवाय ‘चा जप करून घरी परतत असू. १५ ऑगस्ट दिवशी येणारा स्वातंत्र्यदिनही मोठ्या जल्लोषात पार पडे.

गावात मध्यवर्ती स्थानी सरपंचाकडून झेंडावंदन होई. चॉकलेट्स, बिस्कीट्स वाटली जात.समूदायात ‘जन गन मन’ हे राष्ट्रगीत अभिमानाने घालून ‘भारतमाता की जय’हा नारा लावायचो.दिवसभर राष्ट्रभक्तीपर गीते वाजवली जात. पौर्णिमेला एकमेकांच्या हातात नारळ फोडून मैत्रीचे संबंध घट्ट करत. रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला पवित्र सण. सासरहून आलेली बहिण भावाला राखी बांधतांना रक्षणाचे सूत्र बांधत असे. डोळ्यातून अश्रूचा एक थेंब तरी भावाच्या हातावर पडायचा. गोडाधोडाचे पक्वान होऊन कोपराभर राख्या हाताला बांधलेले बंधूराज गावभर हिंडून आपला हात दाखवून येत.

कृष्ण जन्माष्टमी दिवशी घरातले लहान-थोर सगळे जण उपवास करत. रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म पाळणा गावून साजरा होई. छोट्याशा पाळण्यात कृष्णाची इवलीशी मूर्ती मखमली कपड्यावर ठेवून पाळण्याला फुलांची आणि दिव्यांची आरास केली जाई. रात्री बारा वाजता सर्वांना सुंठवडा वाटला जाई.सूंठवडा खाऊन उपवास सोडला जाई. दुसऱ्या दिवशी दहीहंडी असायची. दहीहंडी एकेरी किंवा दुहेरी असायची. त्यात निखळ आनंद असायचा. दुसऱ्या थरावर एक छोटा मुलगा चढून हंडी फोडायचा. साऱ्यांनी मिळून रस्सीला बांधलेले काकडी, केळी, फळे वाटून खायचे. खापराचा तुकडा घरातल्या धान्याच्या कणगीत ठेवायला आणायचा.

असे मानतात की खापराचा तुकड्याने धान्याला कीड लागत नाही आणि धान्याची बरकत ही होते. श्रावण महिन्यात नवविवाहितांची मंगळागौर, हळदीकुंकू समारंभापूर्वी रोज पंचमीची गाणी गावून,नाचून सराव करत. मंगळागौरदिवशी त्या नवविवाहितेला फुलांनी नि मोत्यांच्या दागिन्यांनी सजवले जाई. तिला फुलांनी मढवलेल्या झुल्यात बसवून मंगळागौरीची गाणी गायली जात. काही हौशी स्त्रिया मुली सूप किंवा घागरी फुंकत. झिम्मा फुगड्या खेळत त्यामुळे अंगमेहनत होई नि निखळ मनोरंजन होत असे. प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा आनंद वर्णातीत असे.

श्रावण महिन्याची अखेर पिठोरी अमावस्येने होई. बैलपोळा सणही घराघरांत बैलाच्या प्रती असलेली कृतज्ञता दाखवून साजरा होई. खेड्यापाड्यात बैलांना सजवून रंगवून मिरवणूक काढत.संध्याकाळी बैलगाड्यांच्या शर्यती चालत. वर्षातील एक दिवस बळी नि त्याचे बैल आराम करत. बैलांचे आपल्या जीवनातील महत्त्व ध्यानी घेऊन त्यांना त्या दिवशी तुपात भिजवलेले रोट चारत नि पुरणपोळीही खाऊ घालत. संध्याकाळी पंचारतीने त्यांना ओवाळून त्यांची दृष्टही काढत. पिठोरी अमावस्या आगामी गणेशोत्सवाची द्वाही फिरवत संपते. आता वेध लागतात गणेशाच्या आगमनाचे.

हिंदूंची व्रतवैकल्ये आणि सणसोहळ्यांची रेलचेल असणारा हा श्रावण धार्मिकतेचे प्रतिक आहे. शुद्ध आचरणात बनविलेले खान-पान म्हणजेच पावसाळ्यातील आजार नि रोगराईला नियंत्रण होण्यासाठी साजरे होतात. त्यातून धार्मिक- ताही जपली, जोपासली जाते.

सौ.भारती सावंत
मुंबई

परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट

 

error: Content is protected !!