…आणि वृक्ष बोलू लागला
वृक्ष लावा नि जोपासा
देती झाडेवेली गारवा
लेऊनि साज मखमाली
वसुंधरेचा साज हिरवा
थंडीचे दिवस होते. सारे अंग थंडीने कुडकुडत होते. मी आणि माझे मित्र आमच्या घरामागच्या बागेत खेळत होतो. अंधार पडू लागला होता. त्यामुळे खेळ संपवून एक एक मित्र निघून गेला. मी माझे खेळाचे साहित्य घेऊन घरी परतत होतो, इतक्यात एक हळुवार आवाज ऐकला. मी दचकुन इकडे तिकडे पाहिले तर दोन वृक्षांमधून वाऱ्याची हळुवार लहर येत होती. वृक्षांची पाने थरथर करत सळसळत होती. कुणीतरी बोलल्यासारख्या आवाजाने घाबरून मी पळ काढणार इतक्यात पुन्हा पानांची सळसळ झाली आणि माझ्या नावाचा उच्चार ऐकू आला.”ऐकलेस का कुणाल? आता आमचा पानगळीचा मोसम सुरू झाला आहे”. मी आश्चर्याने इकडेतिकडे पाहिले तर प्रत्यक्ष आम्रवृक्ष बोलताना दिसला. त्यांने पुढे म्हटले, ” तुला मी बोलताना ऐकून आश्चर्य वाटले असेल” आणि तो स्वतःची कथा सांगू लागला, “आम्ही देखील सजीव आहोत. तुम्हाला असणाऱ्या भावना, संवेदना आम्हालाही आहेत. तुमच्या जगदीशचंद्र बोसनी हे सप्रमाण सिद्ध केले आहे की आम्हालाही हृदय आहे. सुखदुःखाची जाणीव आहे. आम्ही वृक्ष अंगप्रत्यांगाने तुमच्यातरी उपयोगी पडतोच. सर्व पशुपक्षी आमच्या आसऱ्याला राहतात. सुखाने झोप घेतात. आम्ही तुम्हाला भाज्या, फळे, फुले आणि धनधान्य तसेच कडधान्यही देतो. तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू पुरवतो.
तुमच्या परिसरातील मातीची धूप कमी करतो. तुम्ही अनेक कारखाने उभारून वाढविलेले हवेचे प्रदूषण कमी करतो. त्याचे हवेतील प्रमाण कमी करतो. या सर्व उपयोगितेचा लाभ घ्यायचं सोडून तुम्ही मानव आमच्यावरच कुऱ्हाड चालवता. आमच्या आश्रयाला राहणाऱ्या आणि आपल्या मधुर आवाजाने साऱ्या सजीव सृष्टीचे मनोरंजन करणाऱ्या चिमुकल्या पक्ष्यांची शिकार करता, प्राण्यांना मारून टाकता. तुमच्या सुख सोयींसाठी आम्हाला तोडता. वृक्षतोड करून त्या जागी इमारती, रस्ते, पूल, धरणे बांधून ठेवता. तुम्ही स्वतःला “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” म्हणणाऱ्या तुकारामांचे वंशज म्हणता आणि आमची हत्या करता. रात्री आम्ही निद्रावस्थेत असताना आमच्या छोट्या कळ्या, आमची अपक्व फळे तोडून इतस्ततः फेकता. आमची कच्ची फळे मिळण्यासाठी आमच्यावर दगडांचा मारा करता. तुम्ही मनुष्य नसून आमचे हत्यारे आहात. आमची मुळे जमिनीची धूप होऊ न देता मातीला घट्ट धरून ठेवतात. जोराची वादळे झाली तरी आपली जागा सोडत नाहीत. झाडांच्या आधाराने छोटे प्राणी, पक्षी सुरक्षित जीवन जगू शकतात. फांद्यावर बांधलेल्या घरट्यांचे आणि पिलांचे रक्षण होते. तुम्ही लोक सणाला, विवाहप्रसंगी आमचाच जास्त वापर करून घेता. फुलांच्या माळा एकमेकांच्या गळ्यात घालून वधू-वर लग्न बंधनात अडकतात. देवाच्या गळ्यात फुलांच्या माळाच सजतात. शुभप्रसंगी,सणाला घर सजविण्यासाठी तुम्ही आमची फुले, पाने व त्यामुळे कितीतरी कळ्या व कोवळी पाने तुटतात आणि आम्हाला खूप वेदना होतात. मंगलप्रसंगी आमच्या पानांचे तोरण बनवून तुम्ही चौकटीला बांधता. तुम्हां मनुष्यासाठी आम्ही चवदार फळे, सुवासिक फुले आणि औषधी पदार्थांबरोबरच सौंदर्यप्रसाधने पुरवतो. इमारतीसाठी, सरपणासाठी लाकूड, इंधन देतो. आमच्या फुलांतील मध शोषून फुलपाखरे, मधमाशा,भुंगे आपले जीवन जगत असतात.
मधमाशा तो मध साठवून मेण व मध गोळा करून ठेवतात. संतांनी तरी आमच्याशी सगे सोयऱ्यांचे नाते मानले होते. तुम्ही मात्र आमचा सर्वस्वी फायदा घेता आणि आमच्याशी कृतघ्नतेने वागता. कुर्हाडीने आमचे तुकडे करता. पण आम्ही आमचा धर्म व प्रेमभाव सोडत नाही. तुमचा अन्याय सहन करून तुम्हाला तन-मन-धन अर्पण करतो. तुमची अहोरात्र सेवा करतो. दमलेला पथिक आमच्या छायेत विसावल्यावर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. जन्माला येऊन सार्थक झाले असे आम्ही मानतो. तुमच्या कोटी-कोटी अपराधांकडे आम्ही कानाडोळा करतो. वृक्ष असे सांगत असतानाच आईची हाक ऐकू आली आणि मी घराकडे धूम ठोकली.
जे वृक्ष लाविती सर्वकाळ
तयांवरी छत्रांचे छल्लाळ
जे ईश्वरा अर्पिती फळ
नानाविध ते निर्मळ
सौ. भारती सावंत
मुंबई
9653445835