आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

0 396

         मुलगी असते घराचं
हसतं खेळतं हे लेणं
स्वहिमतीवर करील
तीच घरादाराचं सोनं
फार पूर्वीपासून मुलींना दुय्यम लेखण्याची आपल्या समाजाची रीत आहे.हल्ली थोडासा काळ बदलला, परिस्थिती पालटत आहे. शहरात मुलींना मुलांच्या बरोबरीने सर्व हक्क दिले जातात. परंतु खेड्यांचे काय! आजही बऱ्याच खेड्यांत, आदिवासी पाड्यातुन घरांघरांत विद्युत सेवा नाही. समाजातील  कार्यकर्ते त्यांच्या घरी जातात. त्यांच्या मुलांना शिकवितात किंवा शिक्षणाचे महत्त्व समजून देतात. काही लोक समजू शकतात परंतु परिस्थिती इतकी हलाखीची असते की ते उमजू शकत नाहीत.जिथे दोन वेळच्या पोटाची खळगी कशी भरावी ही भ्रांत असताना शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून आणणार? वाहतूक सुविधा, शाळेतील गरजु वस्तू कशा पुरवू शकणार? कसाबसा दिवस रेटणारा हा समाज शैक्षणिक गरजा पुरवण्यासाठी असहाय ठरतो. आज कोरोनामुळे सर्वांवरच हतबल होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. महिन्याला चार आकडी पगार कमवणारेही कंगाल होण्याची वेळ आली आहे. नोकऱ्या गेल्या आहेत. शासनाने १५ जूनपासून ऑनलाईन शाळा सुरू केली आहे.शहरांत थोड्या फार प्रमाणात मोबाईलचे नेटवर्क असते किंवा एका घरात दोन मोबाईल असू शकतात. परंतु खेड्यात पूर्ण कुटुंबात एकच मोबाईल.  अँड्रॉइड नसलेला असतो. तोही वडील कामावर जाताना घेऊन जातात. तिथे मुलांना दिवसभरात ऑनलाइन शाळा शिकण्याचे कसे शक्य होणार आहे? त्यामुळे पगार,पैसा हातात नसताना मोबाईल घेणे कसे जमणार? त्यातही दुकाने, बाजार बंद आहेत. कर्ज किंवा उसनेपासने पैसे घेऊनही मोबाईल विकत घेऊ शकत नाहीत.

शिवाय एका घरात दोन, तीन मुले वेगवेगळ्या इयत्तेतील असताना त्यांची ऑनलाइन शाळा आणि शिक्षण ते कसे शिकणार? शिक्षकांचा निरुपाय अन् पालक, विद्यार्थी असहाय. त्यामुळे ऑनलाईन शाळा शिकणे हे शहरातील श्रीमंत लोकांचे फॅड आहे.खेड्यांत चाळवजा पत्र्याचे छत असणाऱ्या गावच्या शाळेत जिथे पहिली ते चौथीपर्यंत एकच गुरुजी असतात.छत पावसाळ्याचे चार महिने गळत असताना ती मुले ओल्या झालेल्या जमिनीवर पोते किंवा बस्कर टाकून शाळा शिकतात. तिथे मोबाईल, लॅपटॉप कुठून सूचणार नि मिळणार!…… आता पावसाळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी घाम गाळण्याचा ऋतू. दिवसभर शेतात मरमर कष्ट केल्याशिवाय वर्षभराचा खाण्याचा, अन्नधान्याचा साठा कसा जमवू शकणार! त्यातून ही मुले शेतीच्या कामाला हाताखाली घेऊन राबणारी! ही कामकरी लोकं मुलांच्या शिक्षणाकडे आणि तेही ऑनलाइन लक्ष  देऊ शकणार हे कितपत पटते? मुले पाचवीला गेली की आई बाबांच्या बरोबरीने ते दिवसभर शेतातील कामात मदत करत असतात. अंगावर पुरेसे कपडे नाहीत, दोन्ही वेळचे खायला अन्न नाही तिथे ऑनलाइन शाळेचे हे शासनाचे धोरण शेतकरी कुटुंबात कसे अवलंबले जाणार!
थांबवा ऑनलाईन शाळेचा
वेंधळेपणाचा हा पोरखेळ
नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी
देऊया सर्वांनाच आता वेळ

त्यातही मुलाला पदरमोड करून शिक्षणसेवा पुरवण्यात आई-वडील थोडातरी रस दाखवतात परंतु मोठी होऊन “चूल आणि मूलच सांभाळायचे” अशी समजूत असलेला समाज मुलीच्या शिक्षणासाठी अनभिज्ञच असतो. मुलगी घरातील, शेतातील कामाची पूर्ण जबाबदारी सांभाळत असताना सर्व कामावर फाटा देऊन पुस्तक हातात घेऊन वाचत बसलेली मुलगी कोणत्या खेड्या-पाड्यात दिसणार! शासनाच्या नियमानुसार आजही बऱ्याच खेड्यांमधून शिक्षक घरोघरी जाऊन मुलांना शिकवतात. त्यांच्या पालकांना मुलांच्या भवितव्याबद्दल, शिक्षणाचे महत्त्वाबद्दल पटवून देतात. काही शिक्षक पारावर बसून दहा-पंधरा मुलांना एकत्र बसून शिकवतातही. परंतु काही ठिकाणी मात्र या शिक्षणाचा ‘बाऊच’ जास्त केला गेला आहे. असले शिक्षण योग्य नाही किंवा त्यात काही अर्थ नाही हे त्यातून साध्य झालेले आहे. त्यातून ना विद्यार्थ्यां योग्य मार्गदर्शन होते, ना मुलांचे ज्ञानोपार्जन! त्यामुळे फक्त शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत असे शिक्षण देणारे शिक्षक खऱ्या अर्थाने शिक्षण देत नसून स्वतःची रोजीरोटी वाचावी म्हणून प्रयत्न करत आहेत. शिक्षणापेक्षा दिखावाच करण्यात आपला वेळ वाया घालवत आहेत. काही ठिकाणी अशा शाळांतील फोटो काढून झाले की मुले शेतीच्या कामात व्यस्त होतात आणि शिक्षकांना बाकी उद्योग करायला वाव मिळतो.ऑनलाइन शाळांमधील हा सावळा गोंधळ थांबवण्याची आता गरज निर्माण झाली आहे.प्रत्येकाने समाज सुधारण्याचे आपले कर्तव्य समजून थोडातरी हातभार लावणे आणि सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. महात्मा फुल्यांनी मुलींची ही परिस्थिती जाणून घेऊनच अठराव्या शतकात देखील मुलींसाठी शाळा उघडली होती.आता एकविसाव्या शतकातही मुलींची हीच अवस्था रहाणार असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि आम्ही विकसनशील झालोत असे छातीठोकपणे सांगणाऱ्याचा नाकर्तेपणा दिसून येतो. अंदाधुंदी आणि बेताल वागणुकीमुळे आधीच देशात आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यात या महामारीच्या संकटाने अजूनच नुकसान झाले आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी आता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उडण्याची तयारी ठेवायला हवी.ही जी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे तिच्यासाठी तोडगा काढणे हेच आपल्या प्रगतीचे फलित आहे. शाळा नसल्याने पालक आपल्या मुलांना दिवसभर शेतातील काम करण्यासाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे शासनाने आत्तापर्यंत साक्षरतेसाठी केलेले प्रयत्न आणि खर्च वाया गेला आहे. याप्रमाणे आज लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होऊन शाळा बंद होण्याची वेळ आली आहे. त्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे’ बेटी बचावो बेटी पढावो’ हा सरकारचा प्रयत्न करण्याचा हेतू मागे पडणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

शिकून-सवरून मुलगी
बनवील घराचाही स्वर्ग
चढवूया तिला दरवर्षी
वरच्या इयत्ता अन् वर्ग

     “आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास” अशी परिस्थिती आली आहे नाकाम शाळा, नाकर्ते राज्यकर्ते, नाराज पालक आणि उदासीन विद्यार्थीवर्ग यांचा मेळ लागणे जिकिरीचे होऊन बसले आहे. शैक्षणिक धोरणावर शासनाने पुनर्विचार करून शहरातील नि खेड्यातील शाळांसाठी निराळे नियम लागू करून गावातील शाळा सुरू केल्या तर मुलांचे हे शैक्षणिक वर्ष तरी पदरात पडेल. आधीच तळागाळांत  बुडालेला हा वर्ग थोडातरी वर येईल नाहीतर पूर्ण गाळात रूतुन जाईल.त्याचा विपरीत परिणाम आपल्या विकासावर होणार आहे. विकसनशील भारत देश पुन्हा अविकसित म्हणून वाटचाल करू लागेल याचा अभ्यास व्हावा. मुलींना शिक्षणाच्या संधी पुन्हा नव्याने प्राप्त करून देण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत नाहीतर पुरुषी वर्चस्वामूळे मुली पुन्हा पडद्याच्या आत बंद होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनाही गगन भरारी मारण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे नाही काय?……..

    शिकवूया शाळा लेकीला
करूनीच तिजला सज्ञान
मेहनतीच्या जोरावरच ती
मारील अवकाशात उड्डाण

सौ. भारती सावंत
मुंबई

error: Content is protected !!