काही मनातले : ताटातुटीची झळ
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला,
अधुरी एक कहाणी…
कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहीलेले व प्रसिद्ध गायक अरूण दाते यांनी गायलेले हे भावगीत ऐकताना डोळे पाणावतात. आपल्या जोडीदाराची होणारी ताटातुट जीवंतपणी माणसाला दु:खाच्या खायीत लोटते. त्यातुन बाहेर येणे अशक्य असते कारण ती पोकळी कधीच भरून निघत नाही. पण संसारात थांबुन चालत नाही. इंग्रजीत म्हणतात ना की “Show must go on” तसेच संसार रथाचे एक चाक निखळले तरी ही जीवनाचा गाढा जमेल तसा ओढावाच लागतो.
गेले कित्येक महिने करोना या महामारीने जग होरपळुन निघत आहे. कित्येकांच्या घरावर दु:ख, दारिद्र्याचे सावट आलेले आहे. कष्टकरी सामान्यांना दोन घासाची ही चणचण भासत आहे कारण नोक-या गेल्या आहेत किंवा पगार कपात होत आहे. त्यात भरीस भर म्हणजे प्रकृतीची दुर्दशा व कुटुंबातील सभासदांचा अकाली होणारा मृत्यु हा वर्तमाना सोबत भविष्याचे सारे गणितंच बदलुन टाकतो.
अकस्मात आपलं माणुस आपल्याला अर्ध्या वाटेतंच सोडुन गेले की कुटुंब उद्धवस्त होते आणि त्यात ती जाणारी व्यक्ती घरची मुख्य कमवती असेल तर वेदना व विवंचनांना पारावारंच उरत नाही. मग न सुटणारे कोडे बनुन आयुष्य कायम सतावु लागते. आणि चिंता ही मनुष्याचा मोठा शत्रु आहे.
संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई
विठ्ठलपंत तीर्थयात्रा
करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्
आई वडीलांचे अकाली छत्रछाया सुटल्याने या भावंडांनी हार न मानता एकमेकांच्या सोबतीने व स्वकर्तृत्वाने महान ग्रंथ संपदा निर्मिली व जगाला कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग याचे ज्ञान व मार्गदर्शन दिले.
विधात्याचे लिखीत टाळणे कोणालाच शक्य नाही. पण म्हणतात की जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा नवीन दहा दरवाजे उघडतात. म्हणजे आपल्याला जीवन समजुन घ्यायला नवीन पर्याय किंवा संधी मिळते. आणि या परिक्षेत खरा तोच उतरतो जो जगण्याचा सुकाणू योग्य दिशेने करतो जेणे करून त्याची बोट वा-याच्या सोबतीने सागराचा किनारा गाठेल.
स्पर्धेच्या युगामुळे ताण- तणावाची व्याप्ती वाढत असून लहान मुले असो किंवा तरुण-तरुणी, पुरूष असो किंवा महिला, या सर्वांसह वृध्दांना देखील याने आपल्या कवेत घेतलं आहे. पण त्याच संगतीने अर्थार्जनाचे नव नवीन पर्याय व संधी निर्णय उपलब्ध होत असतात. श्रीमंत आणि गरीब ही दोन्ही माणसं बघता सारखीच आहेत. दोघांवरही तो परमेश्वर दया करतो. कारण संकटं आणि त्रास हे सगळ्यांनाच असतात. त्याला सामना कसा, केव्हा व किती करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो.
कहाँ तक आँख रोएगी
कहाँ तक किसका ग़म होगा
मेरे जैसा यहाँ कोई न कोई
रोज़ कम होगा…!
— वसीम बरेलवी
आयुष्य हा निरंतर प्रवास आहे. वाटेवर सरळ चालताना कधी विश्रांतीचे थांबे येतील तर कधी घाटाचा अवघड प्रवास असेल. क्वचित सोबती हात सोडुन जाईल तर अकस्मात कोणी तरी देवमाणुस बनुन संगत करेल.
ज्याच्याजवळ ध्यैर्यरुपी धन नाही, त्याच्यासारखा निर्धन मनुष्य दुसरा कोणीही नाही.
-असे विल्यम शेक्सपियर सांगुन गेले.
असे म्हणतात की बदल हाच शाश्वत आहे. बाकी सारेच अकल्पित आहे. मग सर्वात महत्वाचे आहे की आपण स्वत:ला आधी संकटसमयी गंभीर बनवावे व स्वत:च स्वत:चे मार्गदर्शक बनावे. हे बोलणे सोपे आहे. कारण आयुष्य जगणे हे मृत्यु पेक्षा ही अवघड आहे. पण म्हणतात ना….
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे…!!
ज्योती कुलकर्णी, मुंबई