काही मनातले – मैत्रीचा झरा
आज सकाळी खुप कामे झाले म्हणुन मला जरा थकल्या सारखे वाटले. मग थोडा गरम चहा बनवला व मोबाइल घेऊन बसले. काही मिनीटांत एक अनोळखी फोन आला. मी घेतलाच नाही. पण दोन मिनीटांनी परत त्याच नंबर वरुन फोन आला. बघु तरी कोण आहे म्हणत फोन घेतला व हॅलो बोलले…
“कांय गं ओळखलेस कां…” म्हणत एक खळाळते हसू ऐकु आले. मी जरा विचारात हरवले व ते टिपीकल हसू आठवु लागले.
तेवढ्यात तिची बडबड सुरू झाली. आणि अचानक ट्युब पेटली माझी आणि मी ही मनसोक्त हसले.
शाळेतल्या मैत्रीणीचा फोन होता. कित्ती वर्षांनी तिचा आवाज ऐकला मी.
आम्ही दोघी ही एकाच बाकावर बसत होतो. तिने माझ्या बरोबर अनुभवलेल्या बालपणीच्या खुप आठवणी सांगितल्या. अगदी भरभरुन बोलत होती ती.
तीचे हसणे खळाळते होते तेव्हा, तसेच आत्ता ही बोलताना मधेच हास्याचे कारंजे उडायचे तिचे. तिच्या बरोबर बोलताना तास कसा गेला कळलेच नाही. शाळा व त्याच्या रम्य आठवणींत दोघी अगदी लहान मुलीं सारख्या बोलत होतो व लवकर भेटुया म्हणत दोघींनी जड मनाने फोन ठेवला.
आणि चहा पिऊन ही जी तरतरी आली नाही तो तजेला मैत्रीणी बरोबर बोलुन आला. काही वेळ मी बालपणीतल्या आठवणींत मनाने विहार करून आले. आणि ती सर्व अल्लड, निष्पाप स्वच्छंदी सुखद चित्रे नव्याने माझ्या नजरे समोर फेर धरुन नाचु लागली. मी जणु स्वप्नात हरवलेली होती. तेवढ्यात बेल वाजली म्हणुन मी तंद्रीतुन जागी झाले व वर्तमानाची जाणिव क्षणभर सुन्न करून गेली. पण जुनी मैत्रीण भेटल्याचा आनंद खुप मोठा होता. ज्याचे उगमस्थान शाळेपासुन होते तेच कायम खरी सोबत करत होते.
मैत्रीला ना वयाचे बंधन असते ना अपेक्षांची बंदिश. मैत्री केव्हा, कधी, कशी आणि कुणाशी होईल हे कुणालांच सांगता येणार नाही. कारण मैत्री ही जोडलेले नाते नसते तर दोन जीवांच्या स्नेहाचे सूर जुळून त्यातुन मित्रत्वाचे सुरीले गीत वाजते. आणि ह्या आपुलकीच्या संगीतात मन चिंब सुखांत भिजुन जाते.
काही लोक स्वार्था करीता मैत्री करत असतात, त्यांच्या जगात मित्र रहातात. पण खरे मित्र असतात त्यांना मित्रांमध्येच जग दिसते. कारण ख-या मैत्रीत ना अटी असतात ना शर्ती, त्याच बरोबर ते कितीही दूर असले तरी ही त्यांची गहरी यारी कमी होत नाही.
मैत्री हे दोन किंवा अधिक लोकांमधील मौल्यवान नाते म्हणून ओळखले जाते. त्याला वय, लिंग, धर्म किंवा स्थान याची कोणतीही सीमा माहित नसते. मित्रांना आपल्या जीवनात आशीर्वाद मानले जाते. ते गरजेच्या वेळी आपल्यासाठी एकनिष्ठ समर्थन म्हणून कार्य करतात. आपल्या कठीण काळातही ते कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपल्या पाठीशी उभे असतात. “A friend in need is a friend indeed” हे म्हणणे आपण सर्वांनी ऐकले असेलच.
महाभारतातील दुर्योधन जो वाईटाच्या मार्गी लागला होता आणि कर्णाचा मित्रासाठी केलेला स्वार्थ त्याग यांची मैत्री ही गाजलेली होती. यामुळेच कर्णाला दानशूर या विशेषणाने अलंकृत केले आहे. कर्णाने मैत्रीसाठी स्वतःच्या भावंडांशी युद्ध केले. मैत्री खातर स्वत:ची ओळख विसरून जीव ही पणाला लावणा-या कर्णाने मैत्रीला सर्वात मोठया शिखरावर नेऊन ठेवले.
रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे.
असे म्हणतात की मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात.
पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत.
शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही,
हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,
निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही, अन नाजुक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात मात्र होत नाही. तो एक जिवंत झरा असतो आणि त्याच्या झुळूझुळू वाहणा-या प्रवाहात तन, मन भिजुन जाते आणि तिथे धन हे अर्थहिन बनुन जाते.
ज्योती कुलकर्णी, मुंबई