कोरोनाच्या सावटात खरीप हंगामाची तयारी, लॉकडाउनमुळे शेतकरी करताहेत अडचणींचा सामना
माजलगांव, धनंजय माने – कोरोनाच्या सावटात परिसरात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरवात केली आहे. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने, तर काही ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची नांगरणी, वखरणी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकऱ्यांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. टाकरवणसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले जाते; मात्र यावर्षी लॉकडाउनमुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात कापूस भरून आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
खरीप तसेच रब्बी हंगामही तोट्यात गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याची खरीप हंगामावर मदार आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामाला लागले आहे.
बैलजोड्या मिळेनात
दिवसेंदिवस शेती करणे कठीण झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास बैलजोडी, चारा, शेती साहित्य आदी घ्यावे लागते. खरीपपूर्वी अनेक शेतकरी नवीन बैलजोडी बदल करण्यास खरेदी – विक्री करतात. तर बरेच शेतकरी हंगाम संपल्यावर बैलजोडी विकून नव्या खरिपात नवी बैलजोडी खरेदी करतात. यंदा २४ मार्चपासून लॉकडाउनमुळे बैलबाजार भरलेच नाही. त्यामुळे बैलजोडीचे दर कमालीचे वधारले आहेत. त्यामुळे आता शेतकरी कमीत कमी त्रासामध्ये शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीचा वापर करीत आहे; मात्र प्रत्येक शेतकऱ्यालाच आधुनिक पद्धतीने शेती करणे शक्य नसल्याने ते कमी पैशामध्ये पारंपरिक पद्धतीनेच शेतीची मशागत करीत आहेत.
शेणखत टाकण्यावर भर
भरघोस उत्पन्नासाठी शेतकरी आजही शेणखताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहेत. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आवश्यक असणारे सेंद्रिय घटक शेतातच असतात. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे. यावेळी विविध कंपन्यांच्या रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले आहेत. या खताचा उपयोग शेतकऱ्यांच्या बजेटबाहेर जात आहे. ग्रामीण भागात पाळीव जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
लॉकडाउनमुळे कंबरडे मोडले
यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही. प्रथम खरीप आणि त्यानंतर रब्बीनेही होत्याचे नव्हते झाले. यातून कसेबसे सावरत नाही तोच कोरोनामुळे सर्व भारत लॉकडाउन झाले आणि आठवडे बाजारासह सर्वच बाजारपेठा बंद पडल्या. त्यामुळे फळवर्गीय पिकांना यंदा कवडीमोल भाव मिळाला. अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस तसाच पडून आहे. परिणामी खरीप हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करायची, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे.