कोरोना संकटकाळातील पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

0 108
  • उपमुख्यमंत्र्यांनी साधला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद
  • पोलिसांच्या रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्र्यांची भेट
  •  पोलिसांना चांगली घरे बांधून देण्यासाठी शासन प्रयत्नशील
  •  कोरोना नियंत्रणासाठी पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे व उपक्रमांचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

पुणे  : कर्तव्य पार पाडताना माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलीसांप्रति नागरिकांचा आदर वाढला आहे. सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि राज्य पोलिसांच्या कामगिरीचा गौरव केला.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच पुणे शहर पोलीस कर्मचारी बॅच 2012 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भेट देऊन पोलीसांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी हे गौरवोद्‌गार काढले.

लॉकडाऊन कालावधीतील पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीची माहिती देणाऱ्या फलकाची पाहणीही उपमुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या संकटाचा धैर्याने सामना करीत उत्कृष्ट जनसेवा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांच्या कामाचे विशेष कौतुक केले.

कर्तव्य बजावत असताना स्वच्छता, सुरक्षिततेची काळजी घ्या. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. सॅनिटायझरचा वापर करा. आदी सूचना त्यांनी केल्या. यावेळी ‘फील द बिट’ पुस्तिकेचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पोलिसांचे विशेष कौतुक करताना सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील पोलीसांनी संवेदनशीलता दाखवत कोरोना नियंत्रणासाठी निरंतर काम करुन पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढच्या काळातही सर्वांच्या एकजुटीतून कोरोनाला राज्यासह देशातून हद्दपार करण्याचा निर्धार करुया.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे तसेच लॉकडावून कालावधीत पोलिसांनी प्रभावीपणे केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन ते म्हणाले, पोलिसांना चांगली घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यावेळी म्हणाले की, लॉकडाऊन कालावधीत सोशल पोलिसिंगला प्रोत्साहन दिले पाहिजे. जनतेपर्यंत अधिकाधिक पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतांना पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षिततेची, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

यापुढच्या काळातही कंटेन्मेंट झोन परिसरात कडक निर्बंध राबवण्याबरोबरच जनजागृती करण्यावर भर द्यायचा आहे. पोलीस शिपायांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संकटकाळात कर्तव्यभावनेने, सामाजिक जाणीवेतून व अगदी मनापासून काम करुन कोरोना नियंत्रणासाठी योगदान दिले आहे, त्याबद्दल त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे.

सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी लॉकडाऊन कालावधीत पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरणातून माहिती दिली.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व स्थलांतरित मजुरांसंदर्भात पोलिसांनी बजावलेली कामगिरीबद्दल माहिती दिली. अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे यांनी सोशल पोलिसिंग सेलबाबत, उपायुक्त बच्चन सिंग यांनी प्रवासी पासबाबत, उपायुक्त संभाजी कदम यांनी सोशल मीडिया चित्रफिती बाबत व जनजागृती पुस्तिकांबद्दल, तर उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी पोलीसांच्या कल्याणकारी योजनांबाबत, उपायुक्त मितेश घट्टे यांनी क्वारंटाईन प्रक्रिया व ड्रोनद्वारे नियंत्रणाबाबतची माहिती दिली.

संबंधित विभागांच्या पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या परिमंडळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी उपमुख्यमंत्र्यांना दिली.

नॅशनल इन्स्टिटयुशनल रॅकिंग फ्रेमवर्क या राष्ट्रीय मानांकन क्रमवारी देशात पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यलयाला तिसरे स्थान प्राप्त

 

error: Content is protected !!