खेड तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे अनंतात विलीन

कोरोनाने घेतला बळी, खेड तालुक्यावर शोककळा

0 104

राजगुरूनगर, प्रतिनिधी – खेड तालुक्यातील शिवसेनेचे प्रथम आमदार सुरेशभाऊ नामदेव गोरे ( वय ५५) यांचे आज (दि. १० ऑक्टोबर) रोजी सकाळी ९.१५ वाजता पुण्यातील रुबी हॉल या हॉसिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी, चुलते, पुतणे असा परिवार आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून मागील २० दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या शांत व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. ‘भाऊ’ या टोपण नावाने ते खेड तालुक्याला परिचित होते.

एक संयमी नेतृत्व म्हणून भाऊंची ओळख तालुक्याला होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आलेल्या भाऊंनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवले होते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे विरोधक म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले होते. राजकीय गणिताच्या समीकरणात सुरेश गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी तीस हजारांवर मतांनी भाऊ यांनी दिलीप मोहिते पाटील यांना मात दिली होती. त्यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची नोंद झाली. विरोधकांवरही संयमी टीका करणारा हा नेता सदैव हसतमुख असायचा. कार्यकर्त्यांच्या कायम गराड्यात असणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने खेड तालुक्याला धक्का बसला असून मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!