ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी मिशनमोड कार्यक्रम राबवा -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सुचना
शब्दराज ऑनलाईन,दि 15ः
यापूर्वी महाराष्ट्रातील ग्रामीण भाग हागणदारी मुक्त करण्यासाठी ज्या प्रमाणे मिशन राबवले गेले अगदी त्याप्रमाणे गावा गावात स्वच्छतेची चळवळ निर्माण होण्यासाठी मिशन मोड मध्ये कार्यक्रम राबविण्या बाबत पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
दि. 15 जून 2021 रोजी औरंगाबाद, नाशिक, पुणे विभातील तालुका स्तरावर स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात काम करत असलेल्या गट समन्वयक, समूह समन्वयक, जिल्हा कक्षातील सल्लागार यांच्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, मुंबई यांच्या वतीने SBM टप्पा 2 अंतर्गत गाव पातळीवर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन राज्यस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.पुढे बोलतांना ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात यापुढे स्वच्छतेचे अभिनव कार्यक्रम राबविले जाणार आहेत यासाठी तालुका स्तरावरील व ग्रा.पं.चे सरपंच यांनी मिळून काम करावे. तालुका पातळीवर टोल फ्री क्रमांक उपलब्ध करावा जेणेकरून लोकांना मार्गदर्शन करता येईल. तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य यांना विश्वासात घेऊन कामकाज करावे आणि या अभियानाची व्यापक प्रमाणात प्रचार – प्रसिद्धी करण्यात यावी.यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, खासदार, आमदार, अप्पर मुख्य सचिव संजय चहांदे, सह सचिव अभय महाजन, प्रकल्प संचालक राहुल साकोरे, राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे श्री वाडेकर यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षण कार्यक्रमात कचऱ्यामुळे होणारे धोके, सांडपाणी व कचऱ्याचे प्रकार, मैला गाळ व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाचे पंधराशे पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांसाठी प्रारूप अंदाजपत्रके तयार करणे, घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणी विषयक शासनाचे धोरण, सांडपाणी कचरा व्यवस्थापन आराखडा तयार करणे, निधी स्त्रोत आणि तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आदी विषया बाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून युनिसेफ मुंबई चे युसूफ कबीर, राज्य सल्लागार जयंत देशपांडे, विजय गवळी, अपर्णा कुलकर्णी, मंगेश भालेराव, महेश कोडगिरे, आकाश गायकवाड, अभय राठोड यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले