चला झिम्माड होऊ
श्रावणमास आला सयांनो
चला मिळूनी नाचू गाऊ
फांद्यावरती झोके घेऊ
माहेराच्या गावी जाऊ
खरंच! श्रावण आला की मन कसं प्रफुल्लित होतं. सकाळचा चहा पीत खिडकीजवळ उभे राहिले की श्रावणसरी खिडकीतूनही थेंबांचे सिंचन करतात. सकाळचा थंडगार वारा अंगावर शहारा फुलवतो नि मन प्रसन्न होऊन उठते. निसर्गही हिरवाईने फुललेला असतो. वसुंधरा हिरव्या रंगाचा मखमाली गालीचा ओढून नवपरिणीत वधुप्रमाणे सजलीय असे वाटते. झाडेवेली,वृक्ष, लतिका हिरव्या पानांनी चकाकलेल्या दिसतात. नवीनच पालवी फुटलेली रोपे पोपटा प्रमाणे भासतात. मधूनच कोकिळेची सुरेल तान आनंदाला द्विगुणित करते. डोंगर, टेकड्या हिरवळीमुळे शोभायमान दिसतात. काळेनिळे ढग दाटल्यामुळे आभाळ जरी बरसून गेले तरी एक जोरात सर आली की पुन्हा निरभ्र होते. भास्कर जणू आकाश निरभ्र होण्याची प्रतिक्षा करत असतो. निळ्या आकाशात सोनेरी किरणांनी चमकवत रुपेरी लकाकी चढवितो आणि ते टपोरी दवबिंदू हिर्या प्रमाणे चमकतात.किती मनोहारी दृश्य! डोळ्यांचे पारणे फिटावे असा हा श्रावणातील निसर्ग! सजीव सृष्टीसाठी जसे वरदानच आहे.
पांढर्या पंखांची बलाकमाला आकाशात झेपावताना दिसणारे विहंगम दृश्य नयनरम्य वाटते. दूरवरच्या रानां मधून म्याओचा टाहो फोडत मोर जेव्हा सप्तरंगी पिसारा फुलवत नृत्य करू लागतो तेव्हा वाटते स्वर्गही याहूनी निराळा नसेल ना! खरोखर, विधात्याने निर्मिलेला हा निसर्ग श्रावणात निरखून पहावा. आबालवृद्धांना घराबाहेर पडून अशी ही मनोहारी सौंदर्यदृष्टी पाहण्याचा मोह होणार नाही हेच नवल! दर्याखोर्यातून दुधाळ फेसाळणारे झरे नि उंचावरून पडणारा पाण्याचा लोट.अहाहा! असे वाटते तिथून हलूच नये. अरसिक मनालाही काव्यस्फूर्ति व्हावी असा हा श्रावण सर्वांनाच खूप आवडतो. चित्रकार, कवी, कवयित्री आणि छायाचित्रकार यांनातरी श्रावणात या सौंदर्यदृष्टीची मेजवानीच असते. आनंदाने किलबिल करणारे पक्षी जणू हे सूचित करतात की ’बेधुंद जगा आणि आम्हालाही जगू द्या’.
नका ठेवू पिंजर्यात आम्हां
जगू द्या स्वैर स्वच्छंद जीवन
निसर्गच आमचा असे सखा
घरकुल आम्हां हेच रान वन
पशुदेखील आनंदाने भावविभोर होताना दिसतात. आपल्या जोडीदाराला ते साद घालत असतात. पर्जन्यधारांत भिजलेली पाडसे,मनमौजी हूंदडत असतात. सर्वांसाठी श्रावण म्हणजे आनंदाचीच पर्वणी. कुणी खाण्याचा तर कुणी फिरण्याचा आनंद लूटत जीवनाचाही आनंद व्यक्त करत असतो. रिमझिम सरींना अंगावर घेत पावसाची गाणी गात गोल गोल गिरक्या घेताना दिसतात. मुली वडाच्या झाडाला उंच-उंच झुलत राहतात.श्रावणमास म्हणजे व्रतवैकल्ये आणि सणसोहळ्यांची पर्वणीच! नागपंचमी, बेंदूर, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी अशा अनेक सणांची परंपरा सांगणारा हा मास गोडधोड आवडणार्या खवय्यांसाठी चंगळच. विविध पक्वान्नांची रेलचेल असतेच. परंतु पावसात भिजून आल्यावर भजी, वडापाव आणि चहा पिण्याची मजा काही औरच! मक्याचे भाजलेले कणीस खात, श्रावणसरी अंगावर घेत, कुडकुडत फिरणारी प्रेमी युगुले पावसाची पुरेपूर अनुभूती घेताना दिसतात.
लोकांना अनेक ग्रंथांचे पठण करण्याचा हा मास.देवपूजा नि व्रतांची सांगता करत हा महिना पवित्र मास म्हणून साजरा केला जातो. नागपंचमीला सासुरवाशिणी मुराळी येऊन माहेराला घेऊन जाईल म्हणून वाट पाहतात. माहेरी गेल्यावर रोज पंचमीची गाणी म्हणत फेर धरतात. तसेच फुगडी, झिम्मा आणि विविध खेळांना ऊत येतो. रक्षाबंधनाला बहिणी बंधूराजाच्या हातात राखी बांधून संरक्षणाची जबाबदारी सोपवतात. भावाच्या आवडीचे पक्वान्न बनवून त्याच्याकडून घसघशीत ओवाळणी वसूल करण्याची मजा लुटतात. नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांसाठी जास्त महत्त्वाचा. त्यांचा चरितार्थ पूर्णतः सागरावर अवलंबून असल्याने नारळी पौर्णिमेला सागराला हळदीकुंकू नि नारळ वाहिला जातो. तुझ्या भरोशावर नाव सोडून वल्ही मारतोय दर्याराजा, आमचे रक्षण कर असे सागराला आवाहन करतात. तेव्हापासून त्यांच्या मासेमारीचा प्रारंभ होतो.
दह्यादुधाची लावू हंडी
आला मथुरेचा कान्हा
मारुनी खडा घड्यांवरी फुटती यशोदेला प्रेम जन्मदिन दहीहंडी बांधून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आयोजकांकडून जास्त जाते परंतु तरुण मुली मुले पावसात हंडी फोडण्याचा आनंद लुटतात याच दरम्यान 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे तोही दिवस आनंदाने साजरा केला जातो.देशावर असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवसभर देशभक्तीपर गाणी ऐकली गायली जातात आणि स्वातंत्र्योत्सव साजरा केला जातो. स्वातंत्र्याचे महत्त्व प्रतिपादले जाते. ’जनगणमन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले राष्ट्रगीत प्रसारित होत राहते. आणि या सोहळ्याची सांगता होते.
निसर्गसौंदर्याने नटलेला हा ऋतू सर्वांनाच वेड लावणारा आहे. वरूणाची कृपा झाल्याने जगाचा पोशिंदा, बळीराजा सुखावलेला असतो. पेरणी करून तरू चांगलेच फोफावल्याने तोही आपला आनंद साजरा करत असतो. मनातल्या मनात मालाला चांगला भाव येईल याचे गणित मांडत असतो. असा हा ऋतू चराचराला आनंद देणारा मनसोक्त जगायला शिकवणारा तसेच दुनियेचे ज्ञान मिळवून देणारा सर्वांचाच आवडता आहे.
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835