चारही खुनाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करा
परभणी,दि 20 (प्रतिनिधी)ःज्येष्ठ विचारवंत कॉ.गोविंद पानसरे, डॉ.एन.एम. कलबुर्गी, डॉ.नरेंद्र दाभोळकर, पत्रकार गौंरी लंकेश यांच्या निर्घृण खुनाच्या तपासाबाबत टोकाची दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत या चारही खुनाच्या तपासासाठी एक विशेष टीम गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या परभणी जिल्हा शाखेने आज गुरुवार दि.20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ.रविंद्र मानवतकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले, जिल्हा प्रधान सचिव डॉ.सुनिल जाधव, मुंजाजी कांबळे, प्रा.चंद्रकांत गांगुर्डे याची उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक यांचे होणारे खून थांबविण्यासाठी एका कडक कायद्याची गरज असल्याचे मत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी निवेदनात मांडले आहे. सध्या समाजात सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असल्याचेही त्यात नमूद केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ विचारवंत पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर व पत्रकार गौंरी लंकेश यांच्या खुनात सहभागी असलेल्या संघटना आणि सुत्रधारांना अटक करावी, त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी. चारही खटल्यामध्ये चांगल्या वकिलाची नियुक्ती करावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत.