जलव्यवस्थापन : काळाची गरज

0 132
             पानी रे पानी
             तेरा रंग कैसा
             जिसमे मिले
             होता है तैसा
                 खरेच आहे! स्फटिकासारखे शुभ्र पाणी डोळ्यांना आणि मनाला समाधान देतेच, परंतु तहानलेल्याची तहान भागवून मनाला आणि घशाला ही सुख देते.पाणी म्हणजे जीवन. पाणी नसेल तर जीवनात काहीच अर्थ नसेल. पाण्याची तहान दुसऱ्या कशानेही मिटु शकत नाही. म्हणूनच खळखळ वाहणारे निर्झर,ओढे, ओहळ आणि उंचावरून पडणारे जलप्रपात कवी, कवयित्री यांना साद घालत असतात. त्यांच्या खळखळाटावरच साहित्यिक आपल्या काव्याची अप्रतिम निर्मिती करतात. झुळझुळ वाहणारे झरे, नद्या आपल्या सभोवतीचा सर्व परिसर हिरवागार करून सोडतात आणि त्या पोपटी तृणपात्यांचे  तुरे वाऱ्यासंगे डोलदार हालताना मनोहारी दिसतात.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा पूर्वापार ज्ञात आहेत. पण सर्वात महत्वाची गरज म्हणजे पाणी. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. मनुष्याची लोकसंख्या अफाट वेगाने वाढते आहे व त्यासाठी पाण्याचा वापरही वाढत आहे. पिण्यासाठी, दैनंदिन व्यवहारासाठी, कारखान्यांसाठी आणि शेती उद्योगधंद्यांसाठी पाण्याची आवश्यकता असते. पण लोकसंख्या वाढीमुळे जंगले नष्ट होत आहेत. त्याऐवजी सिमेंट-काँक्रीटची जंगले वाढत आहेत.इमारती, रस्ते, पुल आणि कारखाने यांसाठी जंगले साफ केली जात आहेत व त्याचाच परिणाम म्हणून पावसाचे प्रमाणही घटले आहे. मनुष्यासह प्राणिमात्रांनाही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाण्यावाचून जीवानिशी तडफडावे लागत आहे.
          पृथ्वीवरील एकूण जलसंपत्तीपैकी ९७% जलसंपत्ती महासागर स्वरूपात आहे. त्यामुळे तिचा उपयोग पिण्यासाठी, शेती किंवा उद्योगधंद्यांसाठी होऊ शकत नाही. आणि ३% पैकी २-२.५०% पाणी स्थायुरूपात आहे त्यामुळे पिण्यासाठी असे १%पाणी उपलब्ध आहे. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणात हा जलसाठा अतिशय तोकडा आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनाच्या दुसऱ्या सुविधा पुरविणे अतिशय गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात खुप मोठ्या समस्यांना समोरे जावे लागेल.पाणी साठवून ठेवण्यासाठी सर्वात प्रथम गरज आहे. ती हिरवळीची, वृक्षारोपणाची व त्यांची जोपासना करण्याची. झाडाची मुळे जमिनीत खोलवर जावून माती घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे पाणी जमिनीत झिरपण्यास व तेथेच साठवण्यास मदत होते. झाडांचा वाळलेला पालापाचोळा तिथेच पडू दिल्यास पाणी वाहून न जाता तिथेच झिरपते. मातीची धूप टाळली जाते. डोंगर टेकड्यांमध्ये पिके तसेच तत्सम झाडेझुडपे असतील व त्यांना बांध घातले तर पाणी अडवण्यास मोलाची मदत होते. त्यामुळे डोंगर टेकड्यांवरील माती तिथेच टिकून राहते.
               पाणी अडवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जागोजागी तलाव बांधणे. त्यामुळे पावसाळ्यानंतरही हे साठवलेले पाणी वापरता येते. धरणे-बंधारे बांधूनही आपण पावसाचे पाणी अडवू शकतो. मोठमोठ्या इमारती तसेच घराच्या छताला पन्हाळ्या लावून ते पाणी घरगुती वापरासाठी वापरता येते. जमिनीत ओलावा टिकविण्यासाठी शेताच्या बांधावर गवतासारखी तृणधान्ये तशीच वाढू द्यावीत. हिरवळ वाढवावी, त्यामुळे भूजलसाठा वाढविण्यास मदत होते. जमिनीत झिरपलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपसा न करता पावसाच्या पाण्याचा व जमीनीवरील ओहोळ,नद्यांचा वापर करावा. त्यामुळेजमिनीतील ओलावा टिकून राहतो. जमिनी उजाड, वाळवंटासारख्या वैराण, उघड्याबोडक्या न राहू देता जास्तीत जास्त शेतीसाठी व लागवडीखाली ठेवल्यास जलसंवर्धन करता येते. समुद्र व महासागरातील अफाट जलसंपत्तीचे गोड्या पाण्यात रूपांतर करणे हाही जलव्यवस्थापनातील प्रमुख फायदा आहे. आपले माजी मुख्यमंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी देखील या योजनेला पाठिंबा दिला होता. दुसरा पर्याय हा की नद्यांचे, ओढे, ओहोळांचे पाणी समुद्रापर्यंत जावू न  देता अगोदरच जागोजागी अडवून ठेवणे. त्यामुळे खाऱ्या पाण्याचा साठा न वाढता गोड्या पाण्याचा साठा वाढेल. व वर्षभर ते पाणी शेती ,कारखाने आणि घरगुती वापरासाठी टिकून राहील.
         जल है तो कल है जीवन
         पाण्याचा गैरवापर टाळा
         मंत्र बचतीचा सर्वांसाठी
         शासनाचे नियम पाळा
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835
error: Content is protected !!