जीवनाचे संगोपन
निसर्गाची योग्य निगा राखली की सुंदर व आकर्षक कलाकृती सारखी वसुंधरा ही बहरते व सुरेख बाग निर्माण होते.
पण त्या करता त्याची निगराणी राखावी लागते…. खत, पाणी, खुरपणे, आकार देणे, संगोपन करणे. मातीचा कस पाहुन सकस बी पेरणे पासुन ते पिकांची राखण करणे. येवढे सारे कष्ट व मेहनती नंतर उत्तम धन-धान्य प्राप्त होते.
तसंच आपल्या व्यक्तीमत्वाच आहे….
देवा ने सर्वांना बुद्धी दिलेली आहे. भले त्याचे प्रमाण व दर्जा कमी जास्त असु शकतो. पण त्या बुद्धीचा वापर कसा, केव्हा व किती करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
ते घडवण्या करता… आपल्या नैसर्गिक गुणांना समजुन … त्यांना खुलवणं….योग्य मार्ग निवडणं. ..दोष दूर करणं… चांगली संगत धरणं… सतत प्रयत्नशील राहणं… हे सारेच
आवश्यक आहे…
मग आलेला आत्मविश्वास हा अनमोल असतो…. आणि तो यशाचा मार्ग दाखवतो.
संस्कृत सुभाषित
शरीरस्य गुणानां च दूरमत्यंतमंतरम् ।
शरीरं क्षणविध्वंसि कल्पांतस्थायिनो गुणाः॥
हितोपदेश, मित्रलाभ.
अर्थ
शरीर आणि गुण यांमध्ये खूप अंतर आहे. शरीर क्षणभंगुर आहे पण गुण कल्पांतापर्यंत टिकतात. शरीर नाश पावते, पण गुण चिरायु असतात.
हेच सद्गुण ती व्यक्ती हयात नसली तरी ही तिच्या कतृत्वाला व कार्याला अमरत्व देतात.
आणि इतिहास रूपाने ती व्यक्ती लोकांच्या मनात वास करते.
ज्या प्रकारचे विचार मनात घोळत राहतात त्या प्रकारचा आकार जीवनाला प्राप्त होत असतो. सामान्य मनुष्याच्या मनात किती तरी विचार श्रृंखला असतात. जगण्याच्या धडपडीत नको ते विचार ही बोलके होतात व जीवन घेरून दुश्कर्मांचा विळखा करुन टाकतात.
एक सांबर एकदा पाणी पीत असताना त्याला आपले प्रतिबिंब दिसले. तो मनाशीच म्हणाला, ‘माझी ही शिंगं किती सुंदर आहेत. तसंच माझं तोंड, डोळे फुलासारखं अंग सगळं कसं सुंदर आहे. पण माझे पायही असेच सुंदर असते तर काय मजा झाली असती. हे इतके बारीक पाय असण्यापेक्षा नसलेले बरे !’ असे तो म्हणत आहे तेवढ्यात एक सिंह तेथे आला. त्याची चाहूल लागताच सांबर आपल्या बारीक पायांनी जोरजोरात पळू लागले. सिंहही त्याच्या मागे लागला. परंतु रस्त्यातच सांबराची शिंगे एका झाडात अडकली. त्यामुळे त्याला पळता येईना. सिंहाने त्याच्यावर झडप घातली. तेव्हा सांबर म्हणाले, ‘अरेरे ! ज्या पायांना मी वाईट म्हणत होतो त्यांनी संकटातून माझी सुटका केली. पण ज्या शिंगांचा मला गर्व वाटत होता त्यांनी मात्र मला ऐनवेळी दगा दिला.
“मन चिंती ते वैरी न चिंती ” अशी एक उत्कृष्ट म्हण आहे. काळजी, चिंता, दुःख, खेद, निराशा, द्वेष, त्वेष, भय अशा प्रकारच्या रुपांनी आपल्या मनात हे विचार सतत थैमान घालीत असतात. परिणामी तशाच प्रकारचे जीवन आपल्या वाट्याला येते. याच्या उलट सुख, समृद्धी, शांती, समाधान, आनंद, उत्साह वगैरे प्रकारच्या सकारात्मकतेने नटलेले विचार जर मनात नांदत असतील तर त्याच प्रकारच्या जीवनाचा आपल्याला लाभ होतो.
श्री लालबहादुर शास्त्री कारागृहात होते. कारागृहात कडक पहारा होता. कोणालाही भेटण्याची अनुमती दिली जात नव्हती. महत् प्रयत्नाने आई रामदुलारी किंवा पत्नी ललितागौरी यांपैकी एकीला भेटण्याची अनुमती मिळाली. लालबहादुर शास्त्री यांच्या पत्नी त्यांना भेटण्यासाठी कारागृहात आल्या, त्या वेळी नाव सांगताच पडताळणी (तपासणी) न करता त्यांना आत सोडण्यात आले. शास्त्रींसोबत गप्पा मारून झाल्यानंतर जातांना त्यांनी लपवून आणलेले दोन आंबे पतीला देऊ केले. त्या शास्त्रींना म्हणाल्या, तुम्हाला आवडतात; म्हणून लपवून आंबे आणले आहेत.
शास्त्रीजी म्हणाले, मला अतिशय वाईट वाटले. तू असे करायला नको होतेस. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवून न पडताळता (तपासता) तुला आत सोडले; पण तू त्यांचा विश्वासघात केलास. मला काय आवडते ? याचा विचार करण्यापूर्वी मला काय आवडत नाही, याचा विचार तू करायला हवा होतास. कारागृहाचे नियम मोडणे मला आवडणार नाही. ते आंबे परत घेऊन जा. खरी तत्त्वनिष्ठता यालाच म्हणतात.
सुख-दुखाचे धागे विणुन आयुष्य परिपूर्ण बनते. पण कुठला धागा कुठे कसा आणि किती वापरतो त्यावर आयुष्याचे यश ठरते.
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा म्हणजे जीवन अर्थपूर्ण होईल व आसपासचे जग ही आपोआप सुंदर बनत जाईल.
ज्योती कुलकर्णी, मुंबई