जेव्हा रुद्रचा तिसरा डोळा उघडतो…
डोळ्यांवर पट्टी बांधून पुस्तकवाचन : 'मिडब्रेन ॲक्टीव्हेशन'ने साधली किमया
अहमदनगर – डोळ्यावर चक्क पट्टी बांधून कोणतेही पुस्तक वाचन, डोळे बंद करून लीलया इकडून तिकडे विहार, एवढेच नव्हे तर लपलेली व्यक्तीसुद्धा वासाने शोधून काढणे… ही कुठली जादू किंवा चमत्कार नाही तर मिडब्रेन ॲक्टीव्हेशन’ची किमया असून लोणी बुद्रुक येथील रुद्र आसावा याने ती साध्य केली आहे.
रुद्र रामकिसन आसावा हा लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथील विद्यार्थी असून तो पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत आहे. या चिमुरड्याने लॉकडाऊनच्या काळात अवघ्या दीड महिन्यात एक आगळी-वेगळी कला साध्य केली आहे. प्रथम पाहणाऱ्याला ती एखादी जादू किंवा चमत्कार असल्यागत भासते. परंतु त्यामागील वास्तविकता समजल्यानंतर समोरील व्यक्ती आश्चर्याने तोंडात बोट घालते.
मिडब्रेन ॲक्टीव्हेशन’ (प्रज्ञा जागृती) असे या कलेचे नाव आहे. यात कपाळाच्या मध्यभागी असलेल्या ज्ञानाचा तिसरा डोळा उघडला जातो. त्यामुळे शरीरातील बलस्थाने व कल्पनाशक्तीचा जास्तीत जास्त वापर होऊन डोळे बंद असतानाही दिसायला लागते. प्रज्ञाजागृती केल्याने बंद डोळ्यांनी वाचणे, वासावरून वस्तू ओळखने, गाडी चालवने शक्य होते. रुद्रला मिडब्रेन अँक्टिव्हेशनसाठी वडील रामकिसन आसावा यांनी मार्गदर्शन केले. वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्मळवाडी (निर्मळपिंप्री, ता.राहाता) येथे प्राथमिक शिक्षक असून शिक्षक परिषद राहाता तालुक्याचे कार्याध्याक्ष आहेत. या कलेच्या मदतीने रुद्र हा डोळ्यावर पट्टी बांधून विविध चलनी नोटा ओळखणे, चित्र रंगवने, बौद्धिक क्यूब सोडवणे, तसेच लपलेल्या व्यक्तीला वासाने शोधून काढतो. रुद्रचा सोशल मीडियावरील व्हिडिओ सध्या अनेकांना अचंबित करत आहे.
सध्या नवीन शैक्षणिक धोरणात आर्टिफिशयल इंटेलिजन्स या नवीन संकल्पनेचा समावेश केला आहे. मिडब्रेन अँक्टिव्हेशनमुळे विद्यार्थ्यांमधील स्मरणशक्तीचा विकास होतो. अवघड घटकाचे लवकर आकलन होते. त्यामुळे ही कला दैनंदिन अभ्यासक्रमासह स्मरणशक्ती विकसित करण्यासही उपयोगी ठरत आहे.
मिडब्रेन अँक्टिव्हेशन एक बौद्धिक विकासाची कला आहे. योग, प्राणायाम, तसेच ध्यानधारणेतून आणि दैनंदिन सरावातून ही कला साध्य होते. कपाळाच्या मध्यभागी असलेल्या ज्ञानाचा तिसरा डोळा यात उघडला जाऊन शरीरातील बलस्थाने व कल्पनाशक्तीचा वापर होत कला विकसित केली जाते.
– रामकिसन आसावा, रुद्रचे मार्गदर्शक