थेट बांधावरूनच विकले ६ लाखांचे खरबूज; कोरोनाच्या संकटातही शोधली अविनाश कोरडेंनी संधी

0 102

माजलगांव, धनंजय माने – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दीड महिन्यापूर्वी संपूर्ण देशात घोषित केलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे . अनेक शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा भाजीपाला , फळे बांधावर सडत असताना फुले पिंपळगावच्या शेतकऱ्याने मात्र अडचणीवर मात केली . लॉकडाउन असतानाही अडीच एकरांतील खरबुजाची थेट बांधावरून विक्री करीत चार लाख ८० हजार रुपयांचा नफा मिळवीत कोरोनाच्या संकटातही संधी शोधली .

संपूर्ण देश कोरोना महामारीच्या विळख्यात सापडल्याने दीड महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे . यामुळे देशातले सर्व व्यापार , धंदे थांबले , सार्वजनिक , मालवाहतूकही ठप्प झाल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे . उन्हाळ्यात विक्रीसाठी शेतातील विविध भाजीपाला , फळांना ग्राहक , व्यापारी मिळत नसल्याने बांधावरच माती झाली . देशातल्या बाजारपेठा बंद असल्याने शहरातही विकायला संधी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना फुले पिंपळगावच्या अविनाश कोरडे या शेतकऱ्याने मात्र अशा स्थितीतही संधी शोधली . त्यांनी जानेवारी महिन्यात अडीच एकरांत लागवड केलेले खरबूज ऐन लॉकडाउनच्या काळातच तोडणीला आले होते . सर्वकाही बंद असताना रडत बसण्यापेक्षा कोरडे यांनी शक्कल लढवून ग्राहकाला थेट बांधावर यायला भाग पाडले . त्यांचे गाव शहरापासून जवळच असल्याने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत खरबुजाची जाहिरात केली . अगदी ताजे , सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले खरबूज २० रुपये किलोने विक्री असल्याचे व्हायरल केल्याने अनेक ग्राहक थेट बांधावर हजर झाले अन् त्यांनी खरबुजाची खरेदी केली . कोरडेंनी दररोज अंदाजे दोन टन खरबुजाची विक्री करीत दीड महिन्यात अडीच एकरांतील सर्व खरबूज विक्री केले . यातून त्यांना सहा लाख रुपयांचे उत्पन्न झाले . लागवड , खत , फवारणी आदींसह एक लाख रुपयांचा खर्च वजा जाता त्यांनी ४ लाख ८० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला . एकीकडे लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या मालाला खरेदीदार मिळत नसताना अविनाश कोरडेंनी थेट बांधावरून फळविक्री करीत आदर्श निर्माण केला आहे .

कोरोनाचे नियम पाळून विक्री कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या सर्व उपाययोजना कोरडे यांनी राबविल्या . बांधावर बांबू बांधून ग्राहकांपासून ठराविक शारीरिक अंतर ठेवून सर्व खरबुजांची विक्री केली .

लॉकडाउनच्या काळात हातातोंडाशी आलेला घास जातो की काय , याचा विचार करीत असताना मला सोशल मीडियाची कल्पना सुचली . शहर जवळ असल्याने याचा मोठा फायदा झाला अन् सर्व खरबुजांची विक्री झाली .

-अविनाश कोरडे , खरबूज उत्पादक शेतकरी .



error: Content is protected !!