दारु विक्रीला परवानगी मिळताच चंद्रपुरात बार मालकाने मंत्री विजय वडेट्टीवारांची केली आरती
शब्दराज ऑनलाईन,दि 10ः
6 वर्षांच्या बंदीनंतर आता पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारु विक्रीला सुरुवात झाली आहे. दारु विक्रीची परवानगी मिळाल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या ‘बार’मध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्रीविजय वडेट्टीवार आणि दारुच्या बॉटल्सची आरती केली आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जो व्हिडिओ समोर आला आहे, तो चंद्रपूर शहरातील ग्रीन पार्क परिसरातील एका बार आणि रेस्तरॉचा आहे. बारमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा फोटोही लावण्यात आला आहे. बार मालक पहिले वडेट्टीवारांची आरतो करतो आणि नंतर दारुच्या बॉटल्सची पूजा करतो. चंद्रपुरात दारुबंदी उठवल्यानंतर पासून लोकांनी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे.
बार मालक गणेश गोरडवार यांनी सांगितले की, ‘गेल्या 6 वर्षांदरम्यान मी आणि माझे कुटुंब उपासमारीच्या परिस्थिती पोहोचलो होतो. मी घरातील दागिणे विकून कर्मचाऱ्यांना पगार देत होतो. आमच्यासाठी वडेट्टीवार साहेब देवापेक्षा कमी नाहीत. त्यांच्या प्रयत्नाने शहरात पुन्हा एकदा दारु विक्री सुरु झाली आहे. यामुळे मी त्यांची आरती आणि पूजा केली आहे. आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर फेडू शकत नाहीत.’
गेल्या तीन दिवसांमध्ये 1 कोटी रुपयांची दारु विक्री
उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारू बंदी उठवल्यानंतर गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात सुमारे एक कोटी रुपयांची दारूची विक्री झाली आहे. गेल्या 6 वर्षात बार मालकांवर उपासमारीची वेळ आली होती.