दुध उत्पादकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा- शिवराज थेटे
निफाड,दि 29 (प्रतिनिधी)ः
अस्मानी सुलतानी संकटांनी जगाचा अन्नदाता चिंतातुर झाला असून सातत्याने येत असलेल्या संकटांनी शेतकऱ्याची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालेली आहे. गत दीड वर्षांपासून कोरोणाच्या वैश्विक महामारी ने सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून यातून सावरण्याचा तो प्रयत्न करत आहे. परंतु निसर्गाच्या अवकृपेने व खर्चाच्या तुलनेत उत्पादित मालाला भाव मिळत नसल्याने शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळू लागला असतानाच दुधाला मिळणाऱ्या अत्यल्प भावांनी त्याची मनस्थिती झाली आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी बँकांना आदेश द्यावेत अशी मागणी रासाका बचाव कृती समितीचे विश्वस्त शिवराज थेटे (पालखेड) यांनी केली आहे
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शेती व्यवसायाला अवकळा आली गेल्या ४ महिन्यांपासून दुधाचे भाव १० ते १२ रुपयांनी घसरल्यामुळे दूध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे.तर दुसऱ्या बाजूला पशुखाद्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.तर दुधााला भाव नसल्याने दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. खाद्याचे भाव ३०० ते ३२५ रुपयांनी वाढले आहे.त्यामुळे दूध व्यवसाय संकटात आला आहे.एक लिटर दूध निर्मितीसाठी २६ ते ३० रुपये खर्च येत आहे.याउलट उत्पादन केलेले दूध २२ रुपये प्रमाणे विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुध पदार्थ पेढे,लस्सी,ताक,आईस्क्रीम, श्रीखंड यांची दुकाने बंद असल्यामुळे दुधाला मागणी घटली आहेत.त्याचा परिणाम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाच्या पावडरचा साठा तयार आहे.त्यामुळे दुधाला पर्याय म्हणून दूध पावडर आहे.त्याचा परिणामही दूध मागणी ही घटली आहे.सध्या उन्हाळा असल्यामुळे चारा देखील महागला असुन घास, ऊस,मका व अन्य खाद्य पदार्थांचे भाव वाढले आहेत.त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने लक्ष घालून बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी आदेश देऊन दुग्धव्यवसायाचा वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे.आज मिळत असलेल्या दुध दरांमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शासनाने दुध दर प्रश्नी लक्ष देत किमान शेतकऱ्यांना दूध व्यवसायात आर्थिक नुकसान होणार नाही याचा विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती भूमिका घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी शासनाने बँकांना आदेश द्यावेत.अशी मागणी थेटे यांनी केली आहे.