देशमुख, परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर; भाजप नेत्याचा दावा
शब्दराज ऑनलाईन,दि 29ः ‘महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख व मंत्री अनिल परब यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नंबर लागणार असून ते लवकरच भ्रष्टाचाऱ्यांच्या यादीत असतील,’ असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते सोलापूरात बोलत होते.
एका खासगी दौऱ्यानिमित्त सोमय्या सोलापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी मनपा, कोविड सेंटर्स, रुग्णालयांना भेटी देत आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सचिन वाझेंसोबत पाच ऑफिसर निलंबित झाले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली, परमबीर सिंग घरी गेले, आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर आहे, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
वेळी सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांना 55 लाख रुपये परत करावे लागले आहेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरए चे गाळे ढापल्याचं हायकोर्टात सिद्ध झालं आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड आता रांगेत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असं म्हणत सोमय्यांनी संकेत दिले.
कोरोना लसीकरणावरून मुंबईमध्ये काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्धव ठाकरे सरकारमुळं झालेल्या कोविड हत्याकांडावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत असल्याची टीकाही किरीट सोमय्या यांनी केलीय. एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झालं आहे त्याचा आणि लस चा काय संबंध आहे असा प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केलाय. भाजप भविष्यात महाराष्ट्रातील कोविड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणारं असल्याचंही सोमय्या म्हणाले. तसंच 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येक भारतीयाचं लसीकरण झालेलं असेल असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.